पंतप्रधान कार्यालय
पूरस्थितीचा आढावा घेण्यासाठी पंतप्रधानांची सहा राज्यांच्या मुख्यमंत्र्यांसोबत चर्चा
हवामानाचा अंदाज आणि पूर्वसूचना यंत्रणेत सुधारणा करण्यासाठी अत्याधुनिक तंत्रज्ञानाचा वापर करण्यावर पंतप्रधानांचा भर
स्थानिक पूर्वसूचना यंत्रणेत सुधारणा करण्यासाठी गुंतवणूक वाढवावी- पंतप्रधानांची सूचना
मुख्यमंत्र्यांकडून पूरस्थिती आणि बचावकार्याची माहिती; एनडीआरएफ सह इतर केंद्रीय संस्थांनी केलेल्या मदतीबद्दल धन्यवाद
Posted On:
10 AUG 2020 8:10PM by PIB Mumbai
नवी दिल्ली, 10 ऑगस्ट 2020
सहा राज्यातील पूरपरिस्थितीचा आढावा आणि मोसमी पावसाचा सामना करण्यासाठीची तयारी याविषयी चर्चा करण्यासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज, आसाम, बिहार, उत्तरप्रदेश, महाराष्ट्र, कर्नाटक आणि केरळच्या मुख्यमंत्र्यांशी दूरदृश्यप्रणाली द्वारे चर्चा केली. या बैठकीला, संरक्षण मंत्री, आरोग्यमंत्री, केंद्रीय गृहराज्यमंत्री, वरिष्ठ अधिकारी आणि विविध मंत्रालये तसेच संबंधित संस्थांचे अधिकारी उपस्थित होते.
पुराचा अंदाज आणि पूर्वसूचना देणारी कायमस्वरुपी व्यवस्था उभारण्यासाठी सर्व केंद्रीय आणि राज्यांच्या यंत्रणांमध्ये अधिक समन्वयाची गरज आहे, असे पंतप्रधान यावेळी म्हणाले. पुराचा अचूक अंदाज देण्यासाठी आणि हवामान तसेच पूर्वइशारा देणाऱ्या यंत्रणांमध्ये सुधारणा करण्यासाठी अत्याधुनिक तंत्रज्ञानाचा पुरेपूर वापर व्हायला हवा, अशी सूचना पंतप्रधानांनी केली.
गेल्या काही वर्षात, हवामान शास्त्र विभाग आणि केंद्रीय जल आयोगासारख्या आपल्या हवामान यंत्रणा त्यांच्या अनुमान पद्धतीत अधिकाधिक अचूकता आणण्याचा प्रयत्न करत आहेत. केवळ पावसाचाच नव्हे, तर नदीच्या जलपातळीचा अंदाज आणि पूराची नेमकी जागा देखील हे विभाग सांगू लागले आहेत. आता कृत्रिम बुद्धिमत्ता तंत्रज्ञानाच्या आधारे स्थाननिश्चित अंदाज वर्तवण्याचे प्रकल्प प्रायोगिक तत्वावर सुरु आहेत. यासाठी राज्यांनीही या यंत्रणांना आवश्यक ती सर्व माहिती पुरवायला आणि स्थानिक जनतेला, योग्य वेळी अंदाज किंवा इशारे देण्याची व्यवस्था केली जावी, असे पंतप्रधानांनी सांगितले .
स्थानिक पातळीवर, हवामानाचा अंदाज आणि पूर्वसूचना प्रणाली अद्ययावत करण्यासाठीची गुंतवणूक वाढवायला हवी, जेणेकरुन विशिष्ट भागात राहणाऱ्या नागरिकांना, नदीने धोक्याची पातळी ओलांडली असता, पूरस्थिती आल्यास, वीज कोसळणार असल्यास अशा नैसर्गिक संकटांची पूर्वसूचना मिळायला हवी, असा सल्ला मोदी यांनी दिला.
कोविड परिस्थितीच्या पार्श्वभूमीवर,मदत आणि बचावकार्ये करत असतांना, लोकांच्या आरोग्याचीही काळजी घेतली जाईल, याविषयी राज्य सरकारांनी दक्ष असावे, मास्क आणि सैनिटायझर वापर,पुरेसे शारीरिक अंतर राखणे आणि मदत साहित्याचा पुरवठा करतांनाही स्वच्छता नियमांचे पालन करण्यावर भर द्यावा, अशी सूचना त्यांनी केली. विशेषतः ज्येष्ठ नागरिक, गर्भवती महिला आणि इतर आजार असलेल्या लोकांची विशेष काळजी घेतली जावी, असे ते म्हणाले.
सर्व विकास आणि पायाभूत सुविधा प्रकल्प पूर्ण करतांना ते बांधकाम नैसर्गिक आपत्तीच्या स्थितीतही टिकून राहण्याच्या दृष्टीनेच केले जावे, असेही पंतप्रधान म्हणाले.
यावेळी, आसाम, बिहार, उत्तरप्रदेश, महाराष्ट्र , कर्नाटक आणि केरळच्या मुख्यमंत्र्यांनी आपापल्या राज्यातील पूरस्थिती, बचाव आणि मदतकार्ये यांची माहिती दिली. या राज्यांमध्ये NDRF म्हणजेच राष्ट्रीय आपत्ती व्यवस्थापन यंत्रणेच्या पथकांनी योग्य वेळी केलेल्या मदतीबद्दल सर्व मुख्यमंत्र्यांनी आभार व्यक्त केले. पूरस्थिती आणि त्याचे होणारे परिणाम कमी करण्यासाठीच्या तात्कालिक आणी दीर्घकालीन उपाययोजना त्यांनी सुचवल्या.
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी यावेळी संबधित मंत्रालये आणि संस्थांच्या अधिकाऱ्यांना राज्यांनी सांगितलेल्या सूचनांची अंमलबजावणी करण्याचे निर्देश दिले. विविध नैसर्गिक आपत्तींचा सामना करण्यासाठी केंद्र सरकार, यापुढेही सर्व राज्ये आणि केंद्रशासित प्रदेशांना सर्वतोपरी मदत करेल, असे आश्वासन पंतप्रधानांनी दिले.
M.Iyengar/R.Aghor/P.Malandkar
सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा@PIBMumbai /PIBMumbai /pibmumbai pibmumbai[at]gmail[dot]com
(Release ID: 1644913)
Visitor Counter : 268
Read this release in:
Odia
,
English
,
Urdu
,
Hindi
,
Manipuri
,
Bengali
,
Assamese
,
Punjabi
,
Gujarati
,
Tamil
,
Telugu
,
Kannada
,
Malayalam