पेट्रोलियम आणि नैसर्गिक वायू मंत्रालय

जागतिक जैवइंधन दिनानिमित्त विशेष वेबिनारचे आयोजन


जैवइंधनाची निर्मिती वाढवण्यासाठी राज्यांनी सहकार्य करावे- पेट्रोलियम आणि नैसर्गिक वायू विभागाच्या सचिवांचे आवाहन

Posted On: 10 AUG 2020 6:09PM by PIB Mumbai

नवी दिल्ली, 10 ऑगस्ट 2020

जागतिक जैवइंधन दिनानिमित्त आज पेट्रोलियम आणि नैसर्गिक वायू मंत्रालयाने आत्मनिर्भर भारतासाठी जैवइंधन या संकल्पनेवर आधारित विशेष वेबिनार चे आयोजन केले होते. दरवर्षी 10 ऑगस्टला जागतिक जैवइंधन दिवस साजरा केला जातो. जीवाश्म इंधनाला पर्याय म्हणून बिगर-जीवाश्म इंधनाविषयी जनजागृती करणे आणि जैव इंधन क्षेत्राला उभारी देण्यासाठी सरकार करत असलेल्या प्रयत्नांची माहिती देण्यासाठी या दिवशी विशेष उपक्रम राबवले जातात. केंद्रोय पेट्रोलियम आणि नैसर्गिक वायू मंत्रालयातर्फे 2015 पासून जागतिक जैवइंधन दिवस साजरा केला जात आहे.

केंद्र सरकारच्या आत्मनिर्भर भारत अभियानाच्या एकत्रित उपक्रमांमध्ये देखील जैव इंधनाचा समावेश करण्यात आला आहे आणि त्यानुसारच यंदाच्या जागतिक जैवइंधन दिनाची संकल्पना निश्चित करण्यात आली आहे. कोविडच्या पार्श्वभूमीवर हा कार्यक्रम आज वेबिनारच्या माध्यमातून घेण्यात आला.

सुप्रसिद्ध शास्त्रज्ञ रुडॉल्फ डीझेल, यांनी याच दिवशी 1893 साली शेंगदाण्याच्या तेलावर पहिले इंजिन चालवले होते. त्यांच्या संशोधनातून त्यावेळी असे अनुमान काढण्यात आले, की पुढल्या शतकात विविध यंत्राच्या इंजिनांमध्ये जीवाश्म इंधनाऐवजी वनस्पती तेलाचा वापर होणे सुरु होईल.

यावेळी बोलतांना, पेट्रोलियम आणि नैसर्गिक वायू मंत्रालयाचे सचिव, तरुण कपूर म्हणाले, भारत हा कृषीप्रधान देश आहे, त्यामुळे साहजिकच येथे शेतीतून निघणारा कचरा मोठ्या प्रमाणात उपलब्ध आहे, म्हणूनच येथे जैवइंधन निर्माण करण्यासाठी मोठा वाव आहे. जर आपण जैवइंधनाचा विचार केला, तर आपल्याला तीन महत्वाची क्षेत्रे दिसतात- इथेनॉल, बायो-डीझेल आणि बायो गैस. जर आपण या तिन्ही प्रकारांची निर्मिती आणि वापर करु शकलो, तर आयातीत कच्या तेलावरील तसेच काही प्रमाणात गैसवरील अवलंबित्व कमी होऊ शकेल, असे कपूर यांनी सांगितले.

राज्य सरकारांनी या क्षेत्रात विशेष मदत करावी अशी अपेक्षा त्यांनी व्यक्त केली. शेतीतील कचरा आणि महापालिका घनकचरा याचे संकलन, त्याचे पृथक्करण, आणि व्यवस्थापन करुन, विविध प्रकल्पांपर्यंत तो पोहोचवण्याचे काम राज्य प्रशासनच करत असते.

जैव इंधनाचे अनेक फायदे आहेत. यामुळे, आपण आयातीवर अवलंबून राहणार नाही, तसेच स्वच्छ पर्यावरणपूरक असे हे इंधन असून यातून शेतकऱ्याना अतिरिक्त उत्पन्न आणि रोजगाराचे साधन मिळते. जैवइंधनाच्या मिश्रण आणि  निर्मितीसाठी केंद्र सरकार 2014 पासून विविध उपक्रम राबवत आहे. या कार्यक्रमाअंतर्गत तेलनिर्मिती कंपन्यांनी जैवइंधनाची खरेदी वाढवली असून 2015-16 मध्ये असलेली 1.1 कोटी लिटर्स इतकी खरेदी आता 2019-20 पर्यंत 10.6 कोटींपर्यंत पोहोचली आहे.

 

 

M.Chopade/R.Aghor/P.Malandkar

 

 

 

 

 

 

 

 

 

सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा@PIBMumbai   Image result for facebook icon /PIBMumbai    /pibmumbai  pibmumbai[at]gmail[dot]com



(Release ID: 1644837) Visitor Counter : 1102