वाणिज्य आणि उदयोग मंत्रालय
पीयूष गोयल यांनी व्यापाऱ्यांना मेक इन इंडिया वस्तुंना प्रोत्साहन देण्यासाठी ग्राहक जागरूकता मोहीम हाती घेण्याचे केले आवाहन, लॉकडाउन दरम्यान त्यांच्या भूमिकेची केली प्रशंसा
राष्ट्रीय व्यापारी कल्याण मंडळ लवकरच स्थापन केले जाईल
Posted On:
09 AUG 2020 5:53PM by PIB Mumbai
केंद्रीय वाणिज्य , उद्योग आणि रेल्वे मंत्री पीयूष गोयल यांनी आत्मनिर्भर भारत अभियानाच्या दिशेने पूर्णपणे योगदान देण्याचे आवाहन व्यापारी समुदायाला केले आहे. राष्ट्रीय व्यापारी ’दिनानिमित्त आज नवी दिल्लीत आभासी संवादाच्या माध्यमातून व्यापारी बंधूंशी बोलताना ते म्हणाले की, लोकांनी मेक इन इंडिया वस्तू खरेदी करावी यासाठी त्यांनी ग्राहक जागरूकता मोहीम हाती घ्यायला सांगितले. मित्र नसलेल्या देशांमधून कमी दर्जाच्या वस्तूंची आयात करण्याकडे कल असलेल्या अप्रामाणिक व्यापारी आणि व्यावसायिकांना सर्वांसमोर आणण्यासाठी व्हिसल ब्लोअर म्हणून काम करण्याचे आवाहन केले.
गोयल म्हणाले की, आत्मनिर्भर भारत मोहिमेमुळे व्यापार समुदायाला बराच फायदा होईल, कारण भारतात तयार केल्या जाणार्या चांगल्या प्रतीच्या उत्पादनांचे प्रमाण वाढेल , ज्यामुळे किंमती कमी होतील आणि आंतरराष्ट्रीय बाजारात आपली उत्पादने स्पर्धात्मक बनतील. यामुळे रोजगाराच्या अधिक संधी निर्माण होतील आणि लोकांची भरभराट होईल आणि क्रयशक्ती देखील वाढेल. ते म्हणाले की, सरकारने यापूर्वीच आयात केल्या जाणाऱ्या अनेक वस्तूंवर बंदी घातली आहे, जी देशात सहजपणे तयार केली जाऊ शकते, जसे की अगरबती, क्रीडा साहित्य, टीव्ही, टेलिफोन, टायर्स इत्यादी. अंदाजे 10 लाख कोटी रुपयांच्या आयातीला सहजपणे स्वदेशी उत्पादित वस्तूचा पर्याय देता येईल, असा अंदाज त्यांनी वर्तवला. पंतप्रधानांच्या ‘व्होकल फॉर लोकल’ नारा पुढे घेऊन जाण्याचे आवाहन त्यांनी व्यापाऱ्यांना केले.
गोयल यांनी कोविड महामारीच्या काळात व्यापाऱ्यांच्या भूमिकेचे आणि विशेषत: लॉकडाउन कालावधीदरम्यान देशाच्या कानाकोपऱ्यात आवश्यक वस्तूंची उपलब्धता सुनिश्चित केल्याबद्दल त्यांचे कौतुक केले. ते म्हणाले की, पंतप्रधानांनी व्यापाऱ्यांनी कठीण काळात बजावलेल्या महत्त्वपूर्ण भूमिकेची दखल घेतली आहे आणि मन की बात यामध्ये याचा उल्लेख केला आहे. ते म्हणाले की, व्यापाऱ्यांनी ग्राहक आणि उत्पादक यांच्यात महत्त्वपूर्ण सेतू म्हणून काम केले आहे.
मंत्र्यांनी व्यापाऱ्यांना देशातील विविध भागामधून आणि वेगवेगळ्या व्यापाऱ्यांकडून सूचना एकत्रित करण्यासाठी गट स्थापन करण्याचे आवाहन केले. ते म्हणाले की एकच सूत्र सर्वाना लागू होत नाही आणि म्हणूनच विशिष्ट शिफारसी केल्या पाहिजेत. अशा शिफारशींकडे सरकार अत्यंत सहानुभूतीपणे आणि विचारपूर्वक लक्ष देईल. ते म्हणाले की परवाना ऑनलाईन देणे, परवाना शुल्काचा ऑनलाइन भरणा करणे, परवान्यांचा दीर्घ कार्यकाळ, कायद्यांचे गुन्हेगारीकरण टाळणे , कायद्याची अंमलबजावणी करणार्या एजन्सींचे मुख्त्यारीचे अधिकार संपवणे आणि नियमांचे सुलभीकरण करणे या व्यापाऱ्यांच्या खऱ्या मागण्या आहेत. अधिकाऱ्यांनी दिलेल्या सुविधांचा आणि सवलतींचा गैरवापर करून व्यापारी समुदायाला बदनाम करणारे दुष्ट घटक ओळखून त्यांना दूर ठेवण्याचा इशारा त्यांनी दिला.
गोयल यांनी व्यापारी समुदायाला पूर्ण पाठिंबा देण्याचे आश्वासन देताना सांगितले की सरकारने व्यापाऱ्यांना दिलासा देण्यासाठी अनेक उपाययोजना जाहीर केल्या आहेत आणि यापैकी अनेक उपाययोजना अलिकडेच जाहीर केलेल्या आत्मनिर्भर योजनेत समाविष्ट आहेत. ते म्हणाले की, रेल्वेने पार्सल गाड्या , किसान ट्रेन चालवणे, मालगाड्यांची वेगवान वाहतूक, मालाच्या शेडचे उन्नतीकरण , विविध रेल्वे कार्यालयांमध्ये व्यवसाय विकास कक्ष सुरू करणे यासह अनेक उपक्रम राबविले आहेत, ज्यामुळे वस्तूच्या सुलभ व स्वस्त वाहतुकीस मदत होईल.
गोयल यांनी व्यापारी समुदायाला आश्वासन दिले की लवकरच राष्ट्रीय व्यापारी कल्याण मंडळ स्थापन केले जाईल. व्यापाऱ्यांनी आपल्या कर्मचार्यांनाही व्यापारी निवृत्तीवेतन योजनेत समाविष्ट करण्याचे आवाहन केले. मंत्र्यांनी सरकारी खरेदी पोर्टल जीईएम मध्ये सामील होण्यासाठी व्यापाऱ्यांना आमंत्रित केले.
****
B.Gokhale/S.Kane/P.Kor
***
सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा
@PIBMumbai
/PIBMumbai
/pibmumbai
pibmumbai[at]gmail[dot]com
(Release ID: 1644594)
Visitor Counter : 237