रेल्वे मंत्रालय
नरेंद्र सिंह तोमर आणि पियुष गोयल यांच्यासह इतर मान्यवरांनी पहिल्या ‘किसान रेल’ ला हिरवा झेंडा दाखविला; देवळाली (महाराष्ट्र) ते दानापूर (बिहार) पर्यंत विशेष पार्सल रेल्वे “देशभरात कृषी उत्पादनांची वेगवान वाहतूक सुनिश्चित करण्यात किसान रेलची भूमिका ठरणार महत्वपूर्ण” – नरेंद्रसिंह तोमर
“कोविड आव्हानांचा सामना करण्यात भारतीय रेल्वे आणि भारतीय शेतकरी आघाडीवर होते. कोविड साथीच्या आजाराच्या काळात अन्नधान्याची वाहतूक दुप्पट झाली. शेतकऱ्यांना अधिक समृद्ध करण्यात किसान रेल एक पाऊल अजून पुढे” - पियुष गोयल
ही रेल्वे नाशवंत उत्पादनांचा अविरत पुरवठा करणार असल्याने शेतकऱ्यांना मोठी मदत होईल; ‘पी’ स्केलवर सामान्य रेल्वेच्या पार्सल दरानुसार या रेल्वेचे भाडे आकारले जाईल
प्रविष्टि तिथि:
07 AUG 2020 7:25PM by PIB Mumbai
नवी दिल्ली, 7 ऑगस्ट 2020
भारतीय रेल्वेने देवळालीहून आज दिनांक 7 ऑगस्ट 2020 रोजी देवळाली ते दानापूर ही पहिली “किसान रेल” सुरु केली. केंद्रीय कृषी व शेतकरी कल्याण, ग्रामविकास व पंचायती राज मंत्री नरेंद्र मोदी तोमर आणि रेल्वे व वाणिज्य व उद्योग मंत्री पीयूष गोयल यांनी व्हिडिओ कॉन्फरन्सिंगद्वारे या रेल्वेला हिरवा झेंडा दाखवला.
या कार्यक्रमाला रेल्वे राज्यमंत्री. सुरेश सी. अंगडी, पंचायती राज, कृषी व शेतकरी कल्याण राज्यमंत्री, परशोत्तम रुपाला, कृषी व शेतकरी कल्याण राज्यमंत्री, कैलाश चौधरी, ग्राहक व्यवहार, अन्न व सार्वजनिक वितरण राज्यमंत्री रावसाहेब पाटील दानवे, महाराष्ट्र विधानसभेचे विरोधी पक्षनेते, देवेंद्र फडणवीस, महाराष्ट्र सरकारचे अन्न, नागरी पुरवठा व ग्राहक संरक्षण मंत्री, छगन भुजबळ आणि इतर मान्यवर उपस्थित होते.
10+1 व्हीपींसह ही ट्रेन सुरुवातीला दर आठवड्याला धावेल. 31.45 तासात 1519 किलोमीटरचा प्रवास पूर्ण करून उद्या संध्याकाळी ही ट्रेन 6:45 वाजता दानापूर येथे पोहोचेल
“शेतकऱ्यांसाठी हा एक खूप मोठा दिवस आहे. अर्थसंकल्पात किसान रेलची घोषणा करण्यात आली होती. कृषी मालाला उत्तम वितरण आणि योग्य परतावा मिळाला पाहिजे. कोणतेही संकट किंवा आव्हान हे भारतीय शेतकऱ्यांना कधीच अडवू शकत नाहीत हे त्यांनी सिद्ध केले आहे. कृषी मालाची वाहतूक एका ठिकाणहून दुसऱ्या ठिकाणी होण्याची सुनिश्चितता किसान रेल प्रदान करेल. या ट्रेनचा फायदा शेतकरी आणि ग्राहक या दोघांनाही होईल. ” असे नरेंद्र सिंह तोमर यांनी यावेळी सांगितले.
देशभरात कृषी उत्पादनांची वेगवान वाहतूक सुनिश्चित करण्यात किसान रेलची भूमिका महत्वपूर्ण ठरणार. कोविड संकटाच्या काळात अन्नधान्य पुरवठा साखळी अखंड सुरु ठेवल्याबद्दल तोमर यांनी भारतीय रेल्वेचे कौतुक केले.
यावेळी बोलताना पीयूष गोयल म्हणाले, “भारतीय रेल्वेने शेतकर्यांच्या सेवेसाठी गाड्या ठेवल्या आहेत. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे मार्गदर्शन आणि प्रेरणेतूनच भारतीय रेल्वेने किसान रेल सुरु केली आहे. शेतकऱ्यांचे उत्पन्न दुप्पट करण्यात ही ट्रेन मैलाचा दगड ठरेल. कोविड आव्हानांचा सामान करण्यात भारतीय रेल्वे आणि भारतीय शेतकरी आघाडीवर होते. या काळात अन्नधान्याची वाहतूक दुप्पट झाली. यापूर्वी कधीच शेतकऱ्यांच्या हिताकडे इतक्या गांभीर्याने लक्ष देण्यात आले नव्हते. काश्मीरचे सफरचंद किसान रेलने कन्याकुमारीला पोहोचण्याच्या दिवसाची मी आतुरतेने वाट बघत आहे.”

मध्य रेल्वे मधील, भुसावळ विभाग हा प्रामुख्याने कृषी आधारित विभाग आहे. नाशिक आणि आसपासच्या भागात ताज्या भाज्या, फळे, फुले, इतर नाशवंत माल, कांदे आणि इतर कृषी मालाचे मोठ्याप्रमाणात उत्पादन होते. हा नाशवंत शेतमाल मुख्यत: पाटणा, प्रयागराज, कटनी, सतना इत्यादी आसपासच्या भागात नेला जातो.
या ट्रेनला नाशिक रोड, मनमाड, जळगाव, भुसावळ, बुऱ्हानपूर , खंडवा, इटारसी, जबलपूर, सतना, कटनी, माणिकपूर, प्रयागराज छेओकी, पं. दीनदयाळ उपाध्याय नगर आणि बक्सर येथे थांबा देण्यात आला आहे.
स्थानकांसाठीचे शुल्क खालीलप्रमाणे आहे:
भाडे प्रती टन
|
नाशिक रोड/देवळाली ते दानापूर
|
4001 रुपये
|
|
मनमाड ते दानापूर
|
3849 रुपये
|
|
जळगाव ते दानापूर
|
3513 रुपये
|
|
भुसावळ ते दानापूर
|
3459 रुपये
|
|
बुऱ्हानपूर ते दानापूर
|
3323 रुपये
|
|
खांडवा ते दानापूर
|
3148 रुपये
|
किसान रेल ची सुरुवात करून शेतकऱ्यांचे उत्पन्न दुप्पट करणे हे भारतीय रेल्वेचे उद्दिष्ट आहे. या ट्रेनमुळे भाजीपाला, फळे यासारखा नाशवंत कृषीमाल अल्प काळात बाजारात आणण्यास मदत होईल.
भारतीय रेल्वेने यापूर्वी केळी स्पेशल यासारख्या एकल वस्तू विशेष गाड्या चालवल्या आहेत. परंतु डाळिंब, केळी, द्राक्षे इत्यादी फळे आणि ढोबळी मिरची, फ्लॉवर, शेवग्याच्या शेंगा, कोबी, कांदा, मिरची इत्यादी भाजीपाला यांची एकाचवेळी वाहतूक करणारी ही पहिली गाडी आहे. स्थानिक शेतकरी, हमाल, एपीएमसी आणि व्यक्तींसोबत विपणन केले जात आहे. मागणी एकत्रित केली जात आहे. या गाडीचे भाडे सामान्य रेल्वेच्या (पी स्केल) पार्सल दरानुसार शुल्क आकारले जाणार असल्याने शेतकर्यांना मोठी मदत होईल अशी अपेक्षा आहे.
* * *
M.Chopade/S.Mhatre/D.Rane
सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा
@PIBMumbai
/PIBMumbai
/pibmumbai
pibmumbai[at]gmail[dot]com
(रिलीज़ आईडी: 1644177)
आगंतुक पटल : 239