आरोग्य आणि कुटुंब कल्याण मंत्रालय

केंद्र सरकारकडून राज्ये/केंद्रशासित प्रदेशांना कोविड-19 च्या वित्तीय पैकेजचा 890.32 कोटी रुपयांच्या दुसऱ्या हप्त्याची रक्कम वितरीत

Posted On: 06 AUG 2020 4:29PM by PIB Mumbai

 

कोविड-19 साठी आपत्कालीन मदत आणि आरोग्य यंत्रणा सज्ज करण्याच्या दृष्टीने केंद्र सरकारने सर्व राज्ये/केंद्रशासीत प्रदेशांना जाहीर केलेल्या आर्थिक पैकेजचा दुसरा हप्ता म्हणून- 890.32 रुपयांचा निधी वितरीत करण्यात आला आहे. छत्तीसगड, झारखंड, मध्यप्रदेश, ओडिशा, राजस्थान, तेलंगणा, आंध्रप्रदेश, गोवा, गुजरात, कर्नाटक, केरळ, पंजाब, तामिळनाडू, पश्चिम बंगाल, दादरा आणि नगर हवेली आणि दीव दमन, अरुणाचल प्रदेश, आसाम, मेघालय, मणिपूर, मिझोराम, नागालँड आणि सिक्कीम या राज्यांना हा निधी देण्यात आला आहे. राज्यांमध्ये कोविडचे एकूण रुग्ण किती आहेत, यानुसार या निधीचा वाटा देण्यात आला आहे.

सर्वसमावेशक सरकार’ असा दृष्टीकोन बाळगत, केंद्र सरकार, कोविड-19 च्या प्रतिसाद आणि व्यवस्थापनाच्या लढाईचे नेतृत्व करत असून सर्व राज्ये आणि केंद्रशासित प्रदेशांना तांत्रिक आणि वित्तीय संसाधनांची मदत करत आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी कोविडसाठीची आपत्कालीन स्थिती आणि सुयोग्य यंत्रणा सज्जतेसाठी पैकेज देण्याची घोषणा केली होती. 24 मार्च 2020 रोजी केलेल्या भाषणात, पंतप्रधान म्हणाले होते, “ कोरोनाच्या रूग्णांवर उपचार करण्यासाठी तसेच देशातील आरोग्य यंत्रणा मजबूत करण्यासाठी  केंद्र सरकारने 15 हजार कोटी रुपयांची तरतूद केली आहे. या निधीमुळे, कोरोनाच्या चाचण्या लवकरात लवकर होऊ शकतील. तसेच PPE किट्स, अलगीकरण खाटा, आयसीयु खाटा, व्हेंटीलेटर्स आणि इतर आवश्यक उपकरणेही उपलब्ध होऊ शकतील. त्याचवेळी, वैद्यकीय आणि निमवैद्यकीय मनुष्यबळाला प्रशिक्षित करता येईल. मी सर्व राज्य सरकारांना विनंती केली आहे की सध्या केवळ आरोग्य यंत्रणा हीच त्यांची पहिली आणि सर्वोच्च प्राथमिकता असायला हवी.”

या वित्तीय मदतीचा दुसरा टप्पा, सार्वजनिक आरोग्य व्यवस्था अधिक सक्षम करण्यासाठी वापरला जाईल. यात, चाचण्यांसाठीची क्षमता वाढवणे, RT-PCR मशीन्स उपलब्ध करुन देणे, RNA किट्स, TRUNAT आणि  CBNAAT मशीन्स तसेच BSL-II कॅबिनेट तयार करण्याला प्राधान्य दिले जाईल. त्याशिवाय सार्वजनिक रुग्णालयांमध्ये अतिदक्षता खाटा, ऑक्सिजन जनित्र टाक्या आणि वैद्यकीय गैस पाईपलाईन, इत्यादी सुविधा दिल्या जातील. वैद्यकीय अधिकारी, कर्मचारी तसेच आशा कार्यकर्त्या आणि इतर स्वयंसेवकांना प्रशिक्षित केले जाईल.

या मदतीचा पहिला, 3000 कोटी रुपयांचा टप्पा, एप्रिल महिन्यात देण्यात आला होता.या पैकेजचा भाग म्हणून , राज्ये/केंद्रशासित प्रदेशांना 5,80,342 अलगीकरण खाटा, 1,36,068 ऑक्सिजन युक्त खाटा आणि 31,255 अतिदक्षता खाटा देण्यात आल्या आहेत. त्याशिवाय, 86,88,357 चाचण्या किट्स आणि 79,88,366 व्हायल ट्रान्सपोर्ट मिडीया देण्यात आले आहेत. राज्ये/केंद्रशासित प्रदेशात, सुमारे 96,557 मनुष्यबळ वाढवण्यात आले तसेच 6,65,799 लोकांना विशेष प्रोत्साहन निधी देण्यात आला. या पैकेजमध्ये 11,821 कर्मचाऱ्यांची वाहतूक करण्याची अतिरिक्त तरतूदही करण्यात आली आहे.

****

G.Chippalkatti/R.Aghor/P.Kor

***

सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा@PIBMumbai   Image result for facebook icon /PIBMumbai    /pibmumbai  pibmumbai[at]gmail[dot]com(Release ID: 1643807) Visitor Counter : 262