गृह मंत्रालय
अयोध्येतील राम मंदिर भूमीपूजन भारतासाठी ऐतिहासिक आणि अभिमानाचा दिवस: केंद्रीय गृहमंत्री अमित शाह
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते भूमीपूजन आणि भव्य राम मंदिराचा शिलान्यास सोहळा म्हणजे महान भारतीय संस्कृती आणि सभ्यतेच्या इतिहासातील एक सुवर्ण अध्याय आणि एका नवीन युगाची सुरुवात
"राम मंदिराच्या उभारणीमुळे अयोध्येची पवित्र भूमी पुन्हा एकदा आपल्या संपूर्ण वैभवासह जगासमोर येईल. धर्म आणि विकास एकत्रित आल्यामुळे रोजगाराच्या संधी निर्माण होतील"
‘‘सनातन धर्माच्या’ अनमोल वारशासाठी लढलेल्या सर्वांसमोर मी नतमस्तक
Posted On:
05 AUG 2020 9:52PM by PIB Mumbai
नवी दिल्ली, 5 ऑगस्ट 2020
केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांनी अयोध्येतील राम मंदिर भूमीपूजन भारतासाठी ऐतिहासिक आणि अभिमानाचे असल्याचे म्हटले आहे. अमित शाह आपल्या ट्वीट संदेशात म्हणतात, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते भूमीपूजन आणि भव्य राम मंदिराचा शिलान्यास सोहळा म्हणजे महान भारतीय संस्कृती आणि सभ्यतेच्या इतिहासातील एक सुवर्ण अध्याय आणि एका नवीन युगाची सुरुवात आहे.
अमित शाह म्हणाले, अयोध्येतील राम मंदिराची उभारणी हा जगभरातील हिंदूंच्या शतकानुशतकाच्या श्रद्धेचे प्रतीक आहे. मी पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि श्रीराम जन्मभूमी तीर्थ क्षेत्र न्यास यांनी राम मंदिराचे भूमीपूजन करुन कोट्यवधी लोकांच्या श्रद्धेचा आदर केल्याबद्दल त्यांच्याप्रती कृतज्ञता व्यक्त करतो.
केंद्रीय गृहमंत्री म्हणाले, प्रभू श्रीरामांचे आदर्श आणि विचार भारताच्या आत्म्यात वास्तव्य करतात. त्यांचे चरित्र आणि तत्वज्ञान भारतीय संस्कृतीचा पाया आहे. राम मंदिराच्या उभारणीमुळे अयोध्येची पवित्र भूमी पुन्हा एकदा आपल्या संपूर्ण वैभवासह जगासमोर येईल. धर्म आणि विकास एकत्रित आल्यामुळे रोजगाराच्या संधी निर्माण होतील.
अमित शाह म्हणाले, सरकार भारतीय संस्कृती आणि मूल्य संवर्धनासाठी कटीबद्ध आहे. आजच्या अविस्मरणीय दिवसाच्या सर्व भारतीयांना शुभेच्छा. भव्य राम मंदिराची उभारणी ही पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या भक्कम आणि निर्णायक नेतृत्वाचे प्रतिबिंब आहे.
अमित शाह पुढे म्हणाले, ‘सनातन’ (शाश्वत) धर्म संस्कृतीच्या अमूल्य वारशासाठी अनेक वर्ष लढा देणाऱ्या सर्वांसमोर मी नतमस्तक आहे.
* * *
G.Chippalkatti/S.Thakur/D.Rane
सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा
@PIBMumbai
/PIBMumbai
/pibmumbai
pibmumbai[at]gmail[dot]com
(Release ID: 1643638)