निती आयोग

नीती आयोगाच्या अटल इनोव्हेशन मिशनकडून एटीएल टिंकरिंग मॅरॉथॉन 2019 च्या राष्ट्रीय विजेत्यांची नावे जाहीर

Posted On: 05 AUG 2020 8:26PM by PIB Mumbai

नवी दिल्ली, 5 ऑगस्ट 2020


नीती आयोगाच्या अटल इनोव्हेशन मिशनतर्फे त्यांचा पथदर्शी वार्षिक उपक्रम, राष्ट्रीय इनोव्हेशन  मॅरॉथॉन आव्हान, एटीएल टिंकरिंग मॅरॉथॉन 2019 चे निकाल जाहीर करण्यात आले. देशभरातील 5000 पेक्षा जास्त अटल टिंकरिंग प्रयोगशाळांमध्ये ही स्पर्धा घेण्यात आली. यात राष्ट्रीय स्तरावरील 150 विजेत्यांची नवे जाहीर करण्यात आली. माय गोव्ह पोर्टलच्या मदतीने, या अटल इनोव्हेशन मिशनने या मॅरॉथॉनचे आयोजन केले होते.

‘संशोधन, कल्पनाविलास, नवोन्मेश, अंमलबजावणी- अधिक उत्तमतेसाठी विचारपूर्वक संशोधन” या मध्यवर्ती संकल्पनेवर आधारित असलेल्या यंदाच्या मॅराथॉनची संपूर्ण आखणी विद्यार्थ्यांनीच केली होती. या आव्हानाच्या पहिल्या टप्प्यात, विद्यार्थ्यांना येणाऱ्या 4,300 समस्यांवर लोकांकडून मते मागवली. तर दुसऱ्या टप्प्यात, या समस्यांवर दिलेल्या निवेदनावर मतदान घेण्यात आले.

पहिल्या आणि दुसऱ्या टप्प्यांच्या आधारे, चार विविध समस्यांची निवड करण्यात आली. यात  शाश्वत पर्यावरण आणि न्याय, परिणाम देणारे दर्जेदार शिक्षण, आरोग्य आणि स्वच्छतेत वाढ, सर्वसमावेशकता आणि समानता सुनिश्चित करणे, यांचा समावेश आहे. या चार समस्या क्षेत्रातून विद्यार्थ्यांनी त्यांच्या पसंतीच्या सामुदायिक समस्यांची निवड केली आणि त्यावर, आपल्या पद्धतीने नमुनादाखल असा तोडगा शोधून काढला.  

या समस्यांवरील समाधानाबाबत 29 राज्ये आणि केंद्रशासित प्रदेशातील 1191 विद्यार्थ्यांच्या प्रवेशिका आल्या, या सर्व प्रवेशिकांचे मूल्यांकन करुन सर्वोत्तम अशा 150 चमूंची निवड करण्यात आली. निवड झालेल्या विजेत्यांपैकी 42%विद्यार्थी ग्रामीण भागातील आहेत, तर 57% टक्के सरकरी शाळांमधील आहेत. या विजेत्यांमध्ये 45 टक्के विद्यार्थिनी आहेत.  

या विजेत्या चमूंनी दिलेल्या समाधानानुसार पुढची पायरी गाठण्यासाठी मदत होईल, असे अनेक पुरस्कार या चमूंना देण्यात आले. त्यांचे संशोधन, विविध राष्ट्रीय स्तरावरील मंचांवर मांडण्याची संधीही देण्यात आली.

150 विजेत्यांची नावे एका अभिनव आभासी कार्यक्रमात जाहीर करण्यात आली. यावेळी अटल इनोव्हेशन मिशनच्या विविध भागीदार संस्थांचे प्रतिनिधी आणि सहभागी सदस्य उपस्थित होते.   

अटल इनोव्हेशन मिशनचे संचालक आर रहमान यावेळी म्हणाले की एटीएल टिंकरिंग मॅरॉथॉन 2019 मुळे विद्यार्थ्यांच्या कल्पनाशक्तीला आणि सृजनशीलतेला योग्य व्यासपीठ मिळाले आहे. यावेळी मुद्दामच आम्ही विद्यार्थ्यांनाच  या स्पर्धेची संपूर्ण आखणी करण्यासाठी प्रोत्साहन दिले.

आता या विद्यार्थ्यांचा संशोधक म्हणून प्रवास सुरु झाला आहे. या संशोधनातून बाजारात विकले जाईल, असे उत्पादन शोधून काढणे, ही पुढची पायरी असेल, असे  सांगत त्यांनी विद्यार्थ्यांना पुढच्या प्रवासासाठी शुभेच्छा दिल्या.

माय गोव्ह पोर्टलचे मुख्य कार्यकारी अधिकारी अभिषेक सिंह यांनीही विद्यार्थ्याना शुभेच्छा आणि विजेत्यांचे अभिनंदन केले.

Click here to watch the event

या एटीएल टिंकरिंग मॅरॉथॉन 2019 च्या विजेत्यांची यादी बघण्यासाठी खालील लिंकवर क्लिक करा.

https://aim.gov.in/ATLMarathon2019Announcement.pdf  

 
* * *

G.Chippalkatti/R.Aghor/D.Rane

 

सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा@PIBMumbai   Image result for facebook icon /PIBMumbai    /pibmumbai  pibmumbai[at]gmail[dot]com


(Release ID: 1643615) Visitor Counter : 190