पर्यटन मंत्रालय

केंद्रीय पर्यटन राज्यमंत्री प्रल्हादसिंह पटेल यांनी स्वदेश दर्शन योजनेंतर्गत मिझोरममधील जागतिक दर्जाच्या “तेंझाल गोल्फ रिसॉर्ट” प्रकल्पाचे केले आभासी उद्‌घाटन

Posted On: 04 AUG 2020 6:01PM by PIB Mumbai

नवी दिल्ली, 4 ऑगस्ट 2020

 

केंद्रीय संस्कृती व पर्यटन राज्यमंत्री (स्वतंत्र प्रभार) प्रल्हादसिंह पटेल यांनी मिझोरमचे पर्यटनमंत्री रॉबर्ट रोमाविया  रोयटे आणि मिझोरम सरकारच्या पर्यटन विभागाचे आयुक्त व सचिव एस्तेर लाल रुआतकीमी यांच्या उपस्थितीत भारत सरकारच्या पर्यटन मंत्रालयाच्या स्वदेश दर्शन योजनेंतर्गत राबविल्या जाणाऱ्या तेंझाल गोल्फ रिसॉर्ट प्रकल्पाचे आभासी पद्धतीने उद्‌घाटन केले.

स्वदेश दर्शन-ईशान्य सर्कीट अंतर्गत, नवीन पर्यावरणपूरक पर्यटनाच्या एकात्मिक विकासासाठी स्वदेशी दर्शन-ईशान्य विभागातील मिझोरमच्या तेंझाल आणि साऊथ झोटे च्या सेर्शिप व रीक जिल्ह्यात 92.25 कोटी रुपये किमतीचा हा प्रकल्प मंजूर करण्यात आला. त्यापैकी 64.48 कोटी रुपये तेंझाल येथील गोल्फ कोर्ससह विविध घटकांसाठी मंजूर करण्यात आले आहेत.

बहुतेक देशांच्या तुलनेत भारतात हवामानविषयक परिस्थिती अधिक अनुकूल असल्याने भारतात गोल्फ पर्यटनाची प्रबल क्षमता आहे. देशातील नयनरम्य निसर्गस्थळे आणि एकमेवाद्वितीय अशी आतिथ्य सेवा देखील भारतातील गोल्फ पर्यटन क्षेत्रात पूरक ठरत आहे. आज भारतामध्ये एकूण 230 हून अधिक गोल्फ कोर्स आहेत. भारत सरकारचे पर्यटन मंत्रालय देशातील गोल्फ पर्यटनाच्या विकासासाठी उत्प्रेरक आणि सक्रीय समर्थक म्हणून काम करण्याचे प्रयत्न करीत आहे. आंतरराष्ट्रीय स्तरावरील अनेक गोल्फ कोर्स भारतामध्ये आहेत आणि भारतात आयोजित केलेल्या गोल्फ स्पर्धाही देशांतर्गत आणि आंतरराष्ट्रीय पर्यटकांना आकर्षित करतात. गोल्फ पर्यटनातील वाढती रुची ओळखून आंतरराष्ट्रीय आणि देशांतर्गत पर्यटकांना आकर्षित करण्यासाठी उत्पादन म्हणून गोल्फ पर्यटनाला प्रोत्साहन देण्यासाठी पर्यटन मंत्रालय एक व्यापक आणि समन्वित आराखडा तयार करीत आहे.

तेंझाल येथील गोल्फ कोर्सची रचना कॅनडामधील अव्वल क्रमांकाची गोल्फ कोर्स वास्तुविशारद कंपनी म्हणून ओळख असलेल्या ग्रॅहॅम कूक आणि असोसिएट्स यांनी केली आहे. एकूण क्षेत्रफळ 105 एकर असून 18 होल सह गोल्फचे मैदान 75 एकर क्षेत्रफळावर आहे. अमेरिकेतील रेन बर्ड यांची स्वयंचलित स्प्रिंकलर सिंचन प्रणाली आहे. आंतरराष्ट्रीय दर्जाच्या सुविधांसाठी याची रचना केली गेली आहे. तेथे जागतिक दर्जाचे सायबेरियन पाईन लाकूड वापरून 30 पर्यावरणपूरक बांबूच्या झोपड्या, उपहारगृह खुल्या हवेतील फूड कोर्ट, स्वागतकक्ष आणि प्रतीक्षागृह इत्यादी सुविधा आहेत. सर्व सायबेरियन पाइनवुडसह बांधले गेले आहेत आणि पूर्णपणे जागतिक दर्जाचे फर्निचर व फिक्स्चरसह सुसज्ज आहेत.

तेंझाल गोल्फ कोर्सचा स्पर्धात्मक फायदा म्हणजे तो वाजवी किंमतीत दर्जेदार गोल्फ खेळण्याचा अनुभव आणि आंतरराष्ट्रीय सुविधा देईल.

 

B.Gokhale/V.Joshi/P.Malandkar

 

 

 

 

सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा@PIBMumbai   Image result for facebook icon /PIBMumbai    /pibmumbai  pibmumbai[at]gmail[dot]com



(Release ID: 1643328) Visitor Counter : 198