रेल्वे मंत्रालय

रेल्वे मंत्रालयाकडून प्रथमच विविध झोन/विभाग/उत्पादन युनिट यातून सेवानिवृत्त झालेल्या 2,320 कर्मचाऱ्यांसाठी आभासी कार्यक्रमाचे आयोजन

Posted On: 02 AUG 2020 3:30PM by PIB Mumbai

नवी दिल्ली, 2 ऑगस्ट 2020

 

भारतीय रेल्वेच्या इतिहासात प्रथमच, रेल्वे मंत्रालयाने 31 जुलै 2020 रोजी सेवानिवृत्त झालेल्या 2320 अधिकारी/कर्मचारी यांच्याशी संवाद साधला. या कार्यक्रमासाठी रेल्वे, वाणिज्य आणि उद्योगमंत्री पीयूष गोयल, रेल्वे राज्यमंत्री सुरेश अंगडी, रेल्वे बोर्डाचे सचिव सुशांत कुमार मिश्रा आणि रेल्वेच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांची उपस्थिती होती.

याप्रसंगी बोलताना पीयुष गोयल म्हणाले, “हा आनंददायी आणि दुःखद दिवस आहे. आनंददायी आहे कारण कर्मचाऱ्यांनी विविध क्षेत्रांमध्ये, विविध पदांवर कार्य करत दीर्घकाळ जबाबदाऱ्या पार पाडल्या आहेत. एक चांगली रेल्वे बनवण्यासाठी तुम्ही दिलेले योगदान आणि चांगल्या भविष्यासाठी रेल्वेबाबतची तुमची भूमिका स्मरणात राहिल. गेल्या काही वर्षांत, रेल्वेच्या कार्यपद्धतीत सुधारणा झाल्याचे दिसून येत आहे. 

कोविड काळात मालवाहतूक रेल्वे, पार्सल, श्रमिक विशेष रेल्वे चालवण्यात आल्या. संक्रमण परिस्थितीत देशसेवा करण्यासाठी रेल्वेने सर्वतोपरी प्रयत्न केले. रेल्वे कर्माचारी कोरोना योद्ध्यांपेक्षा कमी नाहीत. कोविड विरोधातील लढाईत प्रयत्नांची शर्थ केल्याबद्दल मी सर्व कर्मचाऱ्यांचे कौतुक करतो”.  

पीयूष गोयल पुढे म्हणाले, सेवानिवृत्ती ही व्यक्तीच्या आयुष्याच्या प्रवासातील एक मध्यवर्ती स्थानक आहे, जर एखाद्याने देशासाठी काहीतरी चांगले करण्याचा निर्णय घेतला आणि परिवर्तनात आघाडीची भूमिका बजावली तर प्रवासातील उत्तरार्ध आनंददायी असू शकतो. सेवानिवृत्त व्यक्ती सामाजिक कार्यात हातभार लावू शकतात जसे सामान्य नागरिकांना भारत सरकारच्या धोरणे आणि कार्यक्रमांबद्दल माहिती देऊन, त्यांना शिक्षित करणे जेणेकरून सामान्य नागरिकांना फायदा होईल आणि ते स्वावलंबी होऊ शकतील. त्यांनी निवृत्तीधारकांना विनंती केली की, त्यांनी रेन वॉटर हार्वेस्टींग, ओल्या कचर्‍यापासून खत निर्मिती, कृषी उत्पादनात वाढ व्हावी यासाठी नवनवीन मार्गांबाबत विचार करावा आणि अशा छोट्या छोट्या कार्यातून समाजपरिवर्तन घडवून आणावे.

सेवानिवृत्त होणाऱ्या कर्मचाऱ्यांना संबोधित करताना सुरेश अंगडी म्हणाले, “तुमच्या सर्वांबरोबर असण्याचा मला आनंद झाला. रेल्वे आणि देश रेल्वे कर्मचाऱ्यांचे अथक परिश्रम आणि सेवा कधीही विसरणार नाही. तरुण कर्मचाऱ्यांसाठी तुमच्या सल्ले/सूचनांचे स्वागत आहे.”

 

* * *

B.Gokhale/S.Thakur/D.Rane

 

सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा@PIBMumbai   Image result for facebook icon /PIBMumbai    /pibmumbai  pibmumbai[at]gmail[dot]com


(Release ID: 1643034) Visitor Counter : 236