इलेक्ट्रॉनिक्स आणि माहिती तंत्रज्ञान मंत्रालय
पीएलआय योजनेद्वारे मोबाइल फोन आणि इलेक्ट्रॉनिक सुट्या भागांच्या निर्मितीमध्ये नव्या युगाची सुरुवात
पुढील पाच वर्षात 11.50 लाख कोटी रुपयांचे उत्पादन आणि 7 लाख कोटी रुपयांची निर्यात अपेक्षित :रविशंकर प्रसाद
Posted On:
01 AUG 2020 3:59PM by PIB Mumbai
नवी दिल्ली, 1 ऑगस्ट 2020
केंद्रीय इलेक्ट्रॉनिक्स आणि माहिती तंत्रज्ञान , दळणवळण, कायदा आणि न्याय मंत्री रविशंकर प्रसाद म्हणाले की जागतिक तसेच देशांतर्गत मोबाइल फोन उत्पादक कंपन्या व इलेक्ट्रॉनिक सुट्या भागांच्या उत्पादकांकडून मिळालेल्या अर्जांनुसार उत्पादन संलग्न प्रोत्साहन योजना (पीएलआय) मोठ्या प्रमाणात यशस्वी ठरली आहे. ते पुढे म्हणाले की, “आम्ही आशावादी आहोत आणि संपूर्ण मूल्य साखळीमध्ये एक मजबूत परिसंस्था निर्माण करण्यासाठी आणि जागतिक मूल्य साखळ्यांशी एकत्रीकरण करण्यासाठी उत्सुक आहोत, ज्यामुळे देशातील इलेक्ट्रॉनिक्स निर्मिती परिसंस्था मजबूत होईल. या योजनेंतर्गत इलेक्ट्रॉनिक्स निर्मितीमध्ये देशांतर्गत चॅम्पियन कंपन्यांच्या निर्मितीमुळे जागतिक स्तरावर व्याप्ती वाढवतानाच व्होकल फॉर लोकलला देखील चालना मिळेल.” पीएलआय योजनेअंतर्गत ऍप्लिकेशन विंडोचे निष्कर्ष सादर केल्यानंतर ते माध्यमांना संबोधित करत होते.
पुढील 5 वर्षांत या योजनेद्वारे निर्यातीला चालना मिळेल आणि एकूण उत्पादन सुमारे 11.5 लाख कोटी रुपये होईल. यापैकी निर्यातीचे योगदान 60% पेक्षा अधिक म्हणजे 7,00,000 कोटी रुपयांच्या निर्यात ऑर्डर स्वरूपात असेल. या योजनेमुळे इलेक्ट्रॉनिक्स निर्मितीत 11,000 कोटी रुपयांची अतिरिक्त गुंतवणूक येईल.
या योजनेतून पुढील 5 वर्षात जवळपास 3 लाख थेट रोजगाराच्या संधी निर्माण होतील आणि थेट रोजगाराच्या सुमारे 3 पट अतिरिक्त अप्रत्यक्ष रोजगार निर्माण होईल. मोबाइल फोन्सच्या बाबतीत देशांतर्गत मूल्यवर्धन सध्याच्या 15-20% वरून 35-40% पर्यंत आणि इलेक्ट्रॉनिक सुट्या भागांसाठी 45-50% पर्यंत वाढण्याची अपेक्षा आहे.
एकूण 22 कंपन्यांनी पीएलआय योजनेंतर्गत अर्ज केले आहेत. आंतरराष्ट्रीय मोबाइल फोन उत्पादक कंपन्या ज्यांनी मोबाईल फोनच्या अंतर्गत अर्ज केले आहेत (इनव्हॉईस मूल्य 15,000 आणि त्यापुढे ) त्यामध्ये सॅमसंग, फॉक्सकॉन होन है, राइझिंग स्टार, विस्ट्रोन आणि पेगाट्रॉन यांचा समावेश आहे. यापैकी फॉक्सकॉन होन है, विस्ट्रोन आणि पेगाट्रॉन या कंपन्या ऍपल आयफोनसाठी कंत्राटी उत्पादक आहेत. अँपल (37%) आणि सॅमसंग (22%) मिळून मोबाइल फोनच्या जागतिक विक्री महसुलाच्या सुमारे 60% हिस्सा आहे आणि या योजनेमुळे देशात त्यांची उत्पादन व्याप्ती अनेक पटींनी वाढण्याची अपेक्षा आहे.
मोबाइल फोन (देशांतर्गत कंपन्या) विभागाअंतर्गत लावा, डिक्सन टेक्नॉलॉजीज, भगवती (मायक्रोमॅक्स), पॅजेट इलेक्ट्रॉनिक्स, सोजो मॅन्युफॅक्चरिंग सर्व्हिसेस आणि ऑप्टिमस इलेक्ट्रॉनिक्ससह भारतीय कंपन्यांनी अर्ज केला आहे. या कंपन्या आपल्या उत्पादन कार्यात लक्षणीय रीतीने विस्तार करण्याची आणि मोबाईल फोन उत्पादनात राष्ट्रीय चॅम्पियन कंपन्या बनण्याची अपेक्षा आहे. 10 कंपन्यांनी निर्दिष्ट इलेक्ट्रॉनिक सुटे भाग विभागाअंतर्गत अर्ज दाखल केले आहेत ज्यात एटी अँड एस, असेन्ट सर्किट्स, व्हिसिकॉन, वॉलसिन, सहस्रा, व्हिटेस्को आणि नियोलिंक यांचा समावेश आहे.
मोठ्या प्रमाणावर इलेक्ट्रॉनिक्स निर्मितीसाठी पीएलआय योजना 1 एप्रिल 2020 रोजी अधिसूचित करण्यात आली होती. ही योजना पात्र कंपन्यांना उद्दिष्टित क्षेत्रांतर्गत भारतात निर्मित वस्तूंच्या वाढीव विक्री (आधार वर्षापेक्षा जास्त) वर आधार वर्षानंतर (वित्त वर्ष 2019-20) पाच वर्षांसाठी 4% ते 6% पर्यंत प्रोत्साहन देईल. अर्ज 31.07.2020 पर्यंत खुले होते. 01.08.2020 पासून प्रोत्साहन लागू आहे.
G.Chippalkatti/S.Kane/P.Malandkar
सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा@PIBMumbai /PIBMumbai /pibmumbai pibmumbai[at]gmail[dot]com
(Release ID: 1642853)
Visitor Counter : 264