आयुष मंत्रालय
आयुष मंत्र्यांनी राष्ट्रीय आयुष अभियान आणि आयुष आरोग्य आणि कल्याण केंद्रांच्या परिचालनाचा घेतला आढावा
प्रविष्टि तिथि:
30 JUL 2020 9:40PM by PIB Mumbai
नवी दिल्ली, 30 जुलै 2020
आयुष राज्यमंत्री (स्वतंत्र कार्यभार) श्रीपाद येसो नाईक यांनी आज राष्ट्रीय आयुष अभियानाच्या केंद्र पुरस्कृत योजनेचा आणि आयुष आरोग्य आणि कल्याण केंद्राच्या परिचालनाचा आढावा घेण्यासाठी सर्व राज्ये / केंद्रशासित प्रदेशांच्या आरोग्य / आयुष मंत्र्यांच्या वेबिनारचे अध्यक्षपद भूषवले.
राज्य वार्षिक कृती योजना, उपयोग प्रमाणपत्रे, फिजिकल आणि आर्थिक प्रगती अहवाल, थेट लाभ हस्तांतरण संबंधित माहिती मंत्रालयाला ऑनलाईन पद्धतीने सादर करण्यासाठी नाईक यांनी राष्ट्रीय आयुष अभियानासाठी समर्पित वेब पोर्टल सुरु केले. आयुष मंत्रालयाच्या या उपक्रमामुळे सरकारच्या धोरणानुसार माहिती तंत्रज्ञानाचा वापर करुन पारदर्शकता येईल आणि काम करणे सुलभ होईल. आयुष आरोग्य आणि कल्याण केंद्रे स्थापन करण्यासाठी मार्गदर्शक सूचनांसह 4 प्रकाशनेही त्यांनी जारी केली.

वेबिनारमध्ये, 15 आरोग्य / आयुष मंत्र्यांनी आयुष आरोग्य आणि कल्याण केंद्रांचे परिचालन आणि त्यांच्या राज्ये / केंद्रशासित प्रदेशात राष्ट्रीय आयुष अभियानाची प्रगती आणि अंमलबजावणी याबाबत आपले विचार मांडले. आरोग्य / आयुष मंत्र्यांनी आयुष आरोग्य कल्याण केंद्र कार्यान्वित करण्यासाठी आणि राष्ट्रीय आयुष अभियानांतर्गत मंजूर केलेल्या कामांबाबत लक्षणीय प्रगती करण्यासाठी आपले संपूर्ण सहकार्य सुनिश्चित केले.
व्हिडिओ कॉन्फरन्सला संबोधित करताना श्रीपाद नाईक यांनी आरोग्य / आयुष मंत्र्यांना सद्य परिस्थितीत प्राथमिक आरोग्य सेवा प्रणाली बळकट व्हावी आणि आयुष आरोग्य सेवा गरजूंपर्यंत पोहचावी यासाठी आयुष आरोग्य आणि कल्याण केंद्रांची लवकर स्थापना आणि कार्यान्वयन करण्याकडे लक्ष देण्याची विनंती केली राष्ट्रीय आयुष अभियान आणि आयुष आरोग्य आणि कल्याण केंद्र अंतर्गत मंजूर झालेल्या कामाना गती देण्याची गरज त्यांनी अधोरेखित केली, जेणेकरून त्याचा फायदा सर्वसामान्यांपर्यंत पोहोचेल.
राज्य / केंद्र शासित प्रदेशांचे आरोग्य / आयुष मंत्री, प्रधान सचिव / सचिव (आरोग्य / आयुष), आयुक्त / संचालक या वेबिनारमध्ये सहभागी झाले होते.
या वेळी आयुष सचिव राजेश कोटेचा म्हणाले की, आयुष आरोग्य आणि कल्याण केंद्र ही सार्वजनिक आरोग्य यंत्रणेत सार्वजनिक आरोग्यासाठी आपली कार्यक्षमता स्थापित करण्याची एक संधी आहे. राज्ये / केंद्रशासित प्रदेशांना देण्यात आलेल्या निधीचा वेळेवर वापर करण्यावर त्यांनी भर दिला. आयुषचे सहसचिव, रोशन जग्गी यांनी राष्ट्रीय आयुष अभियान आणि आयुष आरोग्य आणि कल्याण केंद्रांबाबत माहिती दिली आणि सर्व राज्ये आणि केंद्रशासित प्रदेशांना त्यांना दिलेल्या उद्दिष्टानुसार आयुष आरोग्य आणि कल्याण केंद्रे वेळेवर कार्यान्वित करण्याची विनंती केली.
* * *
M.Chopade/S.Kane/D.Rane
सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा
@PIBMumbai
/PIBMumbai
/pibmumbai
pibmumbai[at]gmail[dot]com
(रिलीज़ आईडी: 1642454)
आगंतुक पटल : 275