संरक्षण मंत्रालय

राफेलमुळे भारतीय हवाई दलाच्या क्षमतेला योग्यवेळी उत्तेजन मिळणार - संरक्षणमंत्री राजनाथ सिंह

Posted On: 29 JUL 2020 8:39PM by PIB Mumbai

नवी दिल्ली, 29 जुलै 2020

‘मिडियम मल्टी-रोल’लढाऊ विमानांच्या पहिल्या तुकडीतील पाच राफेल विमाने आज अंबाला हवाईतळावर दाखल झाली. संरक्षण मंत्री राजनाथ सिंह यांनी व्टिटरच्या माध्यमातून राफेलचे स्वागत केले.

‘‘पक्षांनी भारतीय आकाशक्षेत्राच्या कक्षेत प्रवेश केला आहे... हॅपी लँडिंग अंबाला!‘‘असे संरक्षण मंत्र्यांनी व्टिट केले आहे.

राजनाथ सिंह यांनी भारतीय हवाई दलाने राफेल अतिशय व्यावसायिकपणे चालविल्याबद्दल दलाचे अभिनंदन केले आहे. ते म्हणाले, ‘‘17 स्क्वाड्रन, गोल्डन अॅरो यापुढेही अशाच पद्धतीने आपले ब्रीदवाक्य -‘‘ उदयम् अजस्त्रम’’ याप्रमाणे कार्यरत राहतील, याची आपल्याला खात्री आहे. भारतीय हवाई दलाच्या क्षमतेला अगदी योग्यवेळी चालना मिळत आहे, दल अधिक सुद्ढ होत आहे, याचा मला अतिशय आनंद झाला आहे. 

‘‘राफेल लढावू विमानांचे भारत भूमीवर उतरणे, हा आमच्या लष्कराच्या इतिहासातला महत्वाचा टप्पा असून नवीन युगाचा प्रारंभ दर्शवत आहे. बहुउद्देशीय भूमिका निभावणा-या राफेल लढावू विमानांमुळे भारतीय हवाई दलाच्या क्षमतेमध्ये क्रांतिकारी परिवर्तन घडून येणार आहे.’’ असेही राजनाथ यांनी आणखी एका व्टिटमध्ये म्हटले आहे.

राफेल लढावू विमानाची क्षमता अधोरेखित करताना राजनाथ यांनी म्हटले आहे की,‘‘या विमानांची उड्डाणाची कामगिरी उत्कृष्ट आहे. तसेच विमानाव्दारे वापरण्यात येणारी शस्त्रे, रडार यंत्रणा आणि इतर सेन्सर तसेच इलेक्ट्रॉनिक युद्ध कौशल्य क्षमता जगामध्ये सर्वोत्कृष्ट मानले जाते. राफेलचे भारतामध्ये  आगमन झाल्यामुळे देशाला कोणत्याही प्रकारचा धोका उत्पन्न झाल्यास तो टाळता यावा, हल्ला परतवून लावण्याच्यादृष्टीने हवाई दलाला अधिक बळकटी आली आहे.’’

संरक्षण मंत्री राजनाथ सिंह यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी राफेलविषय घेतलेल्या योग्य निर्णयाबद्दल त्यांचे आभार मानले आहेत. ‘‘ पंतप्रधान मोदी यांनी फ्रान्सबरोबर आंतर-सरकारी करार केल्यामुळे राफेल विमानांची खरेदी होवू शकली. ही विमाने घेण्याचा अतिशय योग्य निर्णय आधी घेतला होता. परंतु खरेदीच्या प्रलंबित प्रक्रियेमुळे या व्यवहारामध्ये कोणतीही प्रगती होत नव्हती.’’

सध्या संपूर्ण जगभरामध्ये कोविड19 महामारीचा उद्रेक झालेला असतानाही आणि सर्वत्र निर्बंध असतानाही राफेल विमाने आणि त्याची शस्त्रास्त्रे वेळेवर भारतामध्ये पोहोचविल्याबद्दल राजनाथ सिंह यांनी डॅसॉल्ट अॅव्हिएशन आणि इतर फ्रेंच कंपन्यांचे आभार मानले आहेत.

‘‘भारतीय हवाई दलाच्या ज्या ज्या आवश्यकता आहेत, त्या पूर्ण होत आहेत, याची संपूर्ण खात्री झाल्यानंतरच सरकारने राफेल खरेदीचा निर्णय घेतला आहे.’’ असे संरक्षण मंत्री राजनाथ सिंह यांनी म्हटले आहे. या खरेदीविरूद्ध केलेले आरोप निराधार असून त्यांना योग्य उत्तरे देवून उपाय काढण्यात आले आहेत, असे सांगून राजनाथ सिंह पुढे म्हणाले, भारतीय हवाई दलाच्या या नवीन क्षमतेविषयी जर कोणाला चिंता वाटत असेल किंवा जर कोणी टीका करणार असेल तर ते आपल्या प्रादेशिक अखंडतेला धोका निर्माण करणारे आहे.’’

संरक्षण मंत्र्यांनी  भारतीय हवाई कक्षेमध्ये राफेल विमाने दाखल झालेली छायाचित्रे आणि चित्रफितही सामायिक केली आहेत.

त्यापूर्वी आयएनएस कोलकाताच्या कॅप्टनने हिंद महासागरामध्ये ‘राफेल अॅरो लीडर’चे स्वागत केले. त्यांनी म्हटले आहे की, ‘‘ या नभाला स्पर्श व्हावा, इतके वैभव तुला मिळावे’’. या पाच राफेल विमानांनी ज्यावेळी भारतीय हवाई कक्षामध्ये प्रवेश केला, त्यावेळी भारतीय ‘एसयू30 एमके आय’ या दोन विमानांनी त्यांना ‘संरक्षक सोबत’ (एस्कॉर्ट) केली.

G.Chippalkatti/S.Bedekar/P.Malandkar

 

 

 

 

 

 

सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा@PIBMumbai   Image result for facebook icon /PIBMumbai    /pibmumbai  pibmumbai[at]gmail[dot]com



(Release ID: 1642140) Visitor Counter : 156