पंतप्रधान कार्यालय

पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि मॉरिशसचे पंतप्रधान प्रविंद जगन्नाथ  मॉरिशसच्या सर्वोच्च न्यायालयाच्या नवीन इमारतीचे संयुक्तपणे उद्घाटन करणार

Posted On: 28 JUL 2020 8:24PM by PIB Mumbai

 

पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि मॉरिशसचे पंतप्रधान प्रविंद जगन्नाथ गुरुवारी, 30 जुलै 2020 रोजी मॉरिशसच्या सर्वोच्च न्यायालयाच्या नवीन इमारतीचे संयुक्तपणे उद्घाटन करतील. मॉरिशसमधील न्यायसंस्थेच्या वरिष्ठ सदस्यांच्या आणि दोन्ही देशांतील इतर मान्यवरांच्या उपस्थितीत व्हिडिओ कॉन्फरन्सद्वारे हा उद्घाटन सोहळा होणार आहे.  ही इमारत भारतीय अनुदानाच्या सहाय्याने बांधण्यात  आली असून, राजधानी पोर्ट लुईसमधील हा भारताने सहाय्य पुरवलेला पहिला  पायाभूत प्रकल्प असेल.

2016 मध्ये मॉरिशसला भारत सरकारतर्फे देण्यात आलेल्या 353 दशलक्ष डॉलर्सच्या ‘विशेष आर्थिक पॅकेज’ अंतर्गत राबविल्या जाणाऱ्या पाच  प्रकल्पांपैकी  सर्वोच्च न्यायालयाची नवीन इमारत हा प्रकल्प आहे. हा प्रकल्प निर्धारित वेळेत आणि अपेक्षित खर्चापेक्षा कमी खर्चात पूर्ण झाला आहे. ही इमारत 4700 चौरस मीटरपेक्षा जास्त क्षेत्रात बांधण्यात आली आहे आणि 10 मजल्यांपेक्षा अधिक  मजले असून सुमारे 25,000 चौ.मी. क्षेत्रफळ आहे. थर्मल आणि साउंड इन्सुलेशन आणि उच्च उर्जा कार्यक्षमतेवर अधिक लक्ष केंद्रित करून आधुनिक डिझाइन आणि हरित  वैशिष्ट्यांसह ही इमारत दिमाखाने उभी आहे. या  नवीन इमारतीमुळे मॉरीशसच्या सर्वोच्च न्यायालयाचे सर्व विभाग आणि कार्यालये एकाच इमारतीत येणार असून यामुळे कार्यक्षमता सुधारेल.

ऑक्टोबर 2019 मध्ये पंतप्रधान मोदी आणि मॉरिशसचे पंतप्रधान यांनी  विशेष आर्थिक पॅकेज अंतर्गत बांधण्यात आलेल्या मेट्रो एक्सप्रेस प्रकल्पाचा पहिला टप्पा  आणि मॉरिशसमधील नवीन ईएनटी रुग्णालय  प्रकल्पाचे संयुक्तपणे उद्घाटन केले होते. मेट्रो एक्स्प्रेस प्रकल्पाच्या पहिल्या टप्प्यात गेल्या वर्षी सप्टेंबरमध्ये  12 कि.मी.मेट्रो मार्गाचे बांधकाम पूर्ण झाले होते, तर दुसऱ्या टप्प्यात 14 किलोमीटर मेट्रो मार्गाचे काम सुरू आहे. ईएनटी रुग्णालय प्रकल्पाच्या माध्यमातून भारताने मॉरीशसमध्ये 100  खाटांच्या अत्याधुनिक ईएनटी रुग्णालयाच्या उभारणीत  मदत केली.

भारताच्या मदतीने मॉरीशसमधील उच्च दर्जाचे पायाभूत प्रकल्प यशस्वीपणे आणि वेळेवर पूर्ण झाल्यामुळे मॉरिशस आणि प्रदेशातील  भारतीय कंपन्यांसाठीही मोठ्या संधी निर्माण होतील. सर्वोच्च न्यायालयाची  नवीन इमारत हे दोन्ही देशांमधील मजबूत द्विपक्षीय भागीदारीचे प्रतीक असून शहरातील महत्वाचे ठिकाण  आहे.

****

B.Gokhale/S.Kane/P.Kor

***

सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा@PIBMumbai   Image result for facebook icon /PIBMumbai    /pibmumbai  pibmumbai[at]gmail[dot]com(Release ID: 1641895) Visitor Counter : 196