वाणिज्य आणि उदयोग मंत्रालय

औद्योगिक मंजुरी आणि परवानग्यांसाठी लवकरच एक खिडकी योजना स्थापित केली जाणार

सरकार लँड बँक तयार करण्याचे काम करीत आहे, यासाठी सहा राज्यांची संमती : पीयूष गोयल

Posted On: 27 JUL 2020 9:40PM by PIB Mumbai

नवी दिल्ली, 27 जुलै 2020


  
देशात औद्योगिक मंजूरी आणि परवानग्यांसाठी सरकार लवकरच एक खिडकी योजना सुरु करणार आहे. वाणिज्य आणि उद्योग मंत्री पीयूष गोयल यांनी सार्वभौम संपत्ती फंड, परकीय पेन्शन फंड आणि इतर गुंतवणूकदारांशी व्यवसाय सुलभतेबाबात बोलताना सांगितले की, ही एक वास्तविक एक खिडकी असेल आणि यासाठी संबंधित राज्य सरकारे आणि केंद्रीय मंत्रालयांना विश्वासात घेतले आहे.

मंत्री म्हणाले की, सरकार भू बँक (लँड बँक) तयार करण्यावर काम करत आहे, यासाठी सहा राज्यांनी मान्यताही दिली आहे. संभाव्य गुंतवणूकदार या लँड बँकेतून आपल्या दूरस्थ कार्यालयातूनच उद्योगांचे स्थान निश्चित करण्यासाठी जागा शोधतील, ज्यामुळे त्यांना जमीन मालकी संस्थांच्या कार्यालयांना वारंवार भेट द्यावी लागणार नाही.

पीयूष गोयल पुढे म्हणाले, सरकारने सुरुवातीला 12 औद्योगिक क्षेत्रांवर लक्ष केंद्रित केले आहे आणि त्यात आता 20 पर्यंत वाढ झाली आहे. यामुळे गुंतवणूक वाढण्यास मदत होईल आणि देशातील स्पर्धेला लाभ होईल. या क्षेत्रांमध्ये, फर्निचर, वातानुकूलन, चामडे, पादत्राणे, कृषी-रसायने, खाण्यासाठी तयार अन्नपदार्थ, पोलाद, अॅल्युमिनिअम, तांबे, वस्त्रोद्योग, इलेक्ट्रीक वाहने, सुटे भाग, टीव्ही सेट टॉप बॉक्स, सीसीटीव्ही, क्रीडा साहित्य, इथेनॉल निर्मिती आणि जैव-इंधन आणि खेळणी यांचा समावेश आहे. ते म्हणाले, आत्मनिर्भर भारत म्हणजे भारताने जगासाठी आपले दरवाजे बंद केले नाहीत तर दरवाज्यांचा विस्तार करुन गुणवत्तापूर्ण भारतीय उत्पादनांवर लक्ष केंद्रीत करुन, भारतातील उत्पादनासाठी मोठ्या प्रमाणात अर्थव्यवस्था वृद्धिंगत करणे होय.      

मंत्री म्हणाले, आरोग्य आणि शैक्षणिक क्षेत्रात परकीय गुंतवणूकीसाठी अनुकूल वातावरण निर्माण करण्यात येईल. गुंतवणूकदारांना धोरण, प्रक्रिया, नियमन यासंबंधी पूर्ण पाठिंबा दिला जाईल आणि प्रत्येक बाब पारदर्शी, खुली आणि न्याय्य असेल. श्रम सुधारणांच्या बाबतीत बोलताना गोयल म्हणाले, कामगार आणि गुंतवणूकदार दोघांच्या हितासाठी समतोल साधला जाईल.   

पीयूष गोयल पुढे म्हणाले, सरकारने नागरिकांच्या आयुष्यावर योग्य लक्ष केंद्रीत करुन जगातील सर्वात कडक टाळेबंदी लागू केली होती. कोरोना संक्रमणाचे योग्य व्यवस्थापन करताना दीर्घकालीन दृष्टीकोनातून हे महत्त्वाचे ठरले. सध्या देशाने जीवनाबरोबरच उपजिवीकेवर लक्ष केंद्रीत केले आहे आणि आपण आता अनलॉक टप्प्यात आहोत. आर्थिक कृती सन्मानजनक पातळीवर पोहोचल्याचे विविध निर्देशकांतून दिसून येत आहे.

गोयल म्हणाले, भारतात जोखीम-लाभ गुणोत्तर खूप अनुकूल आहे. देशाच्या विकासगाथेत सहभागी होण्यासाठी त्यांनी परकीय गुंतवणूकदारांना निमंत्रित केले.  


* * *

M.Chopade/S.Thakur/D.Rane
 

 

सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा@PIBMumbai   Image result for facebook icon /PIBMumbai    /pibmumbai  pibmumbai@gmail.com(Release ID: 1641665) Visitor Counter : 11