पंतप्रधान कार्यालय

मणिपूर जलपुरवठा प्रकल्पाच्या कोनशिला समारंभप्रसंगी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केलेले भाषण


Posted On: 23 JUL 2020 3:16PM by PIB Mumbai

मणिपूरच्या राज्यपाल, श्रीमती नजमा हेपतुल्ला जी, मणिपूरचे लोकप्रिय मुख्यमंत्री एन बिरेन सिंह जी, केंद्रीय मंत्रिमंडळातील माझे सहकारी श्री गजेंद्र सिंह शेखावत जी, श्री जितेंद्र सिंह जी,खासदार रतनलाल कटारिया, विधानसभेतील सर्व सदस्य आणि मणिपूरचे माझे प्रिय बंधू आणि भगिनींनो!

आजचा कार्यक्रम हा  असा संदेश देणारा आहे की, कोरोनाच्या या संकटकाळात देखील देश थांबलेला नाही, देशाच्या विकासाची वाट थांबलेली नाही. जोपर्यंत कोरोनावरील लस येत नाही, तोपर्यंत आपल्याला कोरोनाच्या विरुद्ध मजबूत लढा देत राहायचे आहे, आणि विजयी देखील व्हायचे आहे. त्याचवेळी, विकासाच्या कामात देखील संपूर्ण ताकदीनिशी पुढे जायचे आहे. यावेळी तर पूर्व आणि ईशान्य भारताला एकप्रकारे दुहेरी संकटांचा सामना करावा लागतो आहे. ईशान्य भारतात याही वर्षी पावसामुळे खूप मोठे नुकसान होत आहे. अनेकांचा मृत्यू झाला आहे, अनेकांना आपले घर सोडावे लागले आहे. मी त्या सर्व कुटुंबांप्रति संवेदना व्यक्त करतो. या कठीण काळात, संपूर्ण देश त्यांच्यासोबत उभा आहे, असा विश्वास मी या सर्व पूरग्रस्त नागरिकांना देतो. जिथे जिथे गरज आहे, तिथे तिथे केंद्र सरकार राज्यांच्या खांद्याला खांदा लावून सर्वप्रकारची कामे करण्यात सहकार्य करत आहे.

मित्रांनो,

मणिपूर येथे कोरोना संक्रमणाची गती आणि व्याप्ती कमी करण्यासाठी राज्य सरकार अहोरात्र काम करत आहे. टाळेबंदीच्या काळात मणिपूरच्या लोकांसाठी योग्य व्यवस्था असो, किंवा मग लोकांना विविध ठिकाणांहून परत आणण्यासाठी विशेष सोय करण्याचा मुद्दा असेल, राज्य सरकारने आवश्यक ती सर्व पावले उचलली आहेत. प्रधानमंत्री गरीब कल्याण योजनेअंतर्गत, मणिपूरच्या सुमारे 25 लाख बंधू भगिनींना म्हणजे सुमारे 5 ते 6 लाख कुटुंबांना मोफत अन्नधान्य मिळाले आहे. त्याचप्रकारे दीड लाखांपेक्षा अधिक भगिनींना उज्ज्वला योजनेअंतर्गत मोफत गॅस सिलेंडर सुविधा देण्यात आली आहे. केंद्र सरकारच्या या योजना या संकटकाळात गरिबांना उपयुक्त ठरतील असा मला विश्वास आहे.

मित्रांनो,

आज इम्फाळ सह –मणिपूरच्या लाखो लोकांसाठी, विशेषतः आमच्या भगिनींसाठी अत्यंत महत्वाचा दिवस आहे. आणि तो ही तेव्हा , जेव्हा काही दिवसांनी रक्षाबंधनाचा सण येणार आहे, त्याआधी मणिपूरच्या भगिनींसाठी एक अनोखी भेट आणली आहे. सुमारे 3 हजार कोटी रुपयांच्या निधीतून पूर्ण होणाऱ्या या मणिपूर पाणीपुरवठा योजनेमुळे इथल्या लोकांच्या पाण्याच्या समस्या कमी होणार आहेत. या योजनेतून निर्माण होणाऱ्या जलधारांमुळे ग्रेटर इंफाळसह छोटी-मोठी 25 शहरे आणि वस्त्या, 1700 पेक्षा अधिक गावांमधील लोकांची तहान भागणार आहे. विशेष गोष्ट ही, की केवळ आजच्याच नाही तर, पुढच्या 20-22 वर्षांसाठीच्या गरजा लक्षात घेऊन या प्रकल्पाचा आराखडा तयार करण्यात आहे.

या प्रकल्पातून लाखो लोकांच्या घरी पिण्याचे शुध्द पाणी उपलब्ध होईलच, शिवाय हजारो लोकांना रोजगार मिळणार आहे. आणि तुम्हाला माहितीच आहे, की जेव्हा पिण्याचे शुध्द पाणी मिळते तेव्हा आपली रोगप्रतिकारशक्ती चांगलीच वाढते. आजार आपल्यापासून दूर राहतात. म्हणूनच, हा केवळ, पाणी नळातून उपलब्ध होणार, एवढाच मर्यादित विषय नाही. खऱ्या अर्थाने ही योजना प्रत्येक घरात नळातून पाणी पोहचवण्याचे आपले व्यापक लक्ष्य पूर्ण करण्याच्या प्रयत्नांनाही गती देणारी आहे. मी या पाणीपुरवठा योजनेसाठी मणिपूरच्या लोकांचे, विशेषतः इथल्या माता-भगिनींचे मी खूप खूप आभार मानतो.

मित्रांनो,

गेल्या वर्षी जेव्हा देशात जलजीवन अभियानाची सुरुवात होत होती, तेव्हा मी म्हटले होते की आपल्याला आधीच्या सरकारांच्या तुलनेत अत्यंत वेगाने काम करायचे आहे. जेव्हा 15 कोटींपेक्षा जास्त घरांमध्ये पाईपने पाणीपुरवठा करायचा असेल, तेव्हा आपण एका क्षणाचीही विश्रांती घेण्याचा विचार देखील करु शकत नाही. आणि हेच कारण होते की लॉकडाऊनच्या काळातही गावागावात पाईपलाईन टाकण्याचे आणि जनजागृती करण्याचे, ग्रामपंचायतींना एकत्र आणण्याचे काम सातत्याने सुरुच राहिले होते.

आज अशी परिस्थिती आहे की देशात सुमारे एक लाख घरांमध्ये पाण्याची जोडणी रोज दिली जात आहे. म्हणजे, दररोज एक लाख माता-भगिनींच्या आयुष्यातून पाण्याची एवढी मोठी चिंता आम्ही दूर करत आहोत. हे सगळं यासाठी शक्य होत आहे, कारण जलजीवन अभियान एक जनचळवळ म्हणून पुढे जात आहे. यात गावातील लोक, विशेषत: गावातील भगिनी, लोकप्रतिनिधी हेच एकत्र येऊन ठरवतात की पाईप कुठे टाकला जावा, जलवाहिनीचा स्त्रोत कुठे असावा , टाकी कुठे बसवायची, कुठे किती पैसे खर्च करायचे,हे सगळे निर्णय तेच घेतात.

मित्रांनो,

सरकारी व्यवस्थेत एवढे मोठे विकेंद्रीकरण, इतक्या मोठ्या प्रमाणात, अगदी तळागाळापर्यंत महिला सक्षमीकरण, यातून आपण कल्पना करु शकता की पाणी किती मोठ्या शक्तीच्या रुपात पुढे येत आहे. मित्रांनो, जीवन जगण्यास सुखकर परिस्थिती, जीवन जगण्यातील सुलभता हीच उत्तम जीवनमानाची पूर्व अट आहे. पैसे कमी असू शकतात, जास्त असू शकतात, मात्र आयुष्य सुखकर असणे यावर सगळ्यांचा समान हक्क आहे. आणि विशेषतः आपले सगळे गरीब बंधू-भगिनी, माता, दलित, मागास, आदिवासी लोक या सगळ्यांचा हक्क आहे.

म्हणूनच, गेल्या सहा वर्षात, भारतात सर्वसामान्यांचे जीवनमान सुलभ करण्यासाठी एक मोठे आंदोलनच सुरु आहे. भारत आपल्या नागरिकांना आयुष्यातील सर्व सुविधा देण्याचा प्रयत्न करतो आहे. गेल्या सहा वर्षात प्रत्येक पातळीवर, प्रत्येक क्षेत्रात अशी पावले उचलण्यात आली आहेत, जी गरिबांना, सर्वसामान्यांना पुढे जाण्यासाठी प्रोत्साहित करु शकेल.

आज मणिपूरसह संपूर्ण भारत उघड्यावर शौच करण्याच्या अनिष्ट प्रथेपासून मुक्त झाल्याची घोषणा करण्यात आली आहे. आज भारतातल्या प्रत्येक गावात वीजजोडणी पोचली आहे, जवळपास प्रत्येक कुटुंबाकडे वीज आहे. आज गरीबातल्या गरीब व्यक्तीच्या स्वयंपाकघरात एलपीजी गैस पोहोचला आहे.प्रत्येक घराला चांगल्या रस्त्याशी जोडण्यात आले आहे.प्रत्येक गरीब बेघर व्यक्तीला राहण्यासाठी चांगली घरे उपलब्ध करुन दिली जात आहेत. या सगळ्यात एक मोठी उणीव राहिली होती, ती म्हणजे स्वच्छ पाण्याची, तर तीही पूर्ण करण्यासाठी मिशन मोडवर गावागावात पाणी पोहचवण्याचे काम सुरु झाले आहे.

 

मित्रांनो,

 

दर्जेदार आयुष्याचा, प्रगती आणि समृद्धीचा थेट संबंध संपर्क आणि दळणवळणाशी आहे. ईशान्य भारतातील दळणवळणाच्या सुविधा आणि साधने इथल्या लोकांचे जीवन सुखकर करण्यासाठी तर आवश्यक आहेतच, शिवाय एका सुरक्षित आणि आत्मनिर्भर भारताचे उद्दिष्ट पूर्ण करण्यासाठी देखील ते अत्यंत आवश्यक आहे. या दळणवळण सुविधा, एका बाजूला म्यानमार, भूतान, नेपाळ आणि बांगलादेश या देशांसोबतच्या आपल्या सामाजिक आणि व्यापारी संबंधांना अधिक मजबूत करतात तर दुसरीकडे देशाचे ‘ॅअक्ट ईस्ट’ धोरण अधिक भक्कम बनवतात.

आपला हा ईशान्य भारत प्रदेश म्हणजे, पूर्व आशियाई देशांसोबतच्या आपल्या प्राचीन सांस्कृतिक बंधांचा आणि भविष्यातील व्यापार, प्रवास आणि पर्यटनाच्या नात्यांचा ‘गेटवे’ आहे.  याच विचाराने, मणिपूरसह, संपूर्ण ईशान्य भारतात दळणवळणाशी संबंधित पायाभूत सुविधा उभारण्यावर सातत्याने भर दिला जात आहे. रस्ते, महामार्ग, हवाई मार्ग जलमार्ग आणि आय-वेज यासह गैस पाईपलाईनच्या आधुनिक पायाभूत सुविधा, ऑप्टिकल फायबर नेटवर्क ची पायाभूत कामे, पॉवर ग्रीड ची व्यवस्था, अशी अनेक कामे करुन ईशान्य भारतात एकप्रकारे पायाभूत सुविधांचे जाळे विणले जात आहे.

गेल्या सहा वर्षात, संपूर्ण ईशान्य भारतातील पायाभूत सुविधांवर हजारो कोटी रुपयांची गुंतवणूक करण्यात आली आहे. ईशान्य भारतातील राज्यांच्या राजधानीच्या शहरांना चौपदरी रस्ते, जिल्ह्या मुख्यालयांना दुपदरी रस्ते आणि गावांना बारमाही रस्त्यांनी जोडण्याचा प्रयत्न आहे. या अंतर्गत, सुमारे 3 हजार किलोमीटर्सचे रस्ते बांधण्यात आले असून सुमारे 6 हजार किलोमीटर्सच्या प्रकल्पांवर अत्यंत वेगाने काम सुरु आहे.

मित्रांनो,

रेल्वे दळणवळणाच्या क्षेत्रात तर ईशान्य भारतात खूप मोठे परिवर्तन दिसते आहे. एका बाजूला नवनव्या स्थानकांवर रेल्वे पोचते आहे, तर दुसऱ्या बाजूला ईशान्य भारतातील रेल्वेजाळ्याचे ब्रॉडगेजमध्ये रुपांतर केले जात आहे. आपण सगळे देखील हा बदल अनुभवत असाल.सुमारे 14 हजार कोटी रुपयांच्या निधीतून तयार होणारा  जीरीबाम-इंफाळ रेल्वेमार्ग तयार झाल्यावर मणिपूरमध्ये खूप मोठा बदल होणार आहे, याचप्रकारे, इशान्य भारताच्या प्रत्येक राज्याच्या राजधान्यांना, आगामी  दोन वर्षात उत्तम रेल्वेजाळ्याने जोडण्याचे काम अत्यंत वेगाने सुरु आहे.

 

मित्रांनो,

रस्ते आणि रेल्वे यांच्याशिवाय, इशान्य भारतात हवाई दळणवळण यंत्रणा देखील अत्यंत महत्वाची आहे. आज ईशान्य भारतात सुमारे 13 छोटी-मोठी कार्यरत विमानतळे आहेत.इम्फाळ विमानतळासह ईशान्य भारतात जी विमानातळे सध्या आहेत, त्यांचा विस्तार करण्यासाठी, तिथे अत्याधुनिक सुविधा तयार करण्यासाठी तीन हजार कोटींपेक्षा अधिक रुपये खर्च केले आहेत.

मित्रांनो,

ईशान्य भारतासाठी आणखी एक मोठे काम केले जात आहे, ते म्हणजे अंतर्गत जलमार्ग क्षेत्रात एक मोठी क्रांती येथे घडतांना मी बघतो आहे. इथे आता 20 पेक्षा अधिक राष्ट्रीय जलमार्गांचे काम सुरु आहे. भविष्यात येथील जलमार्ग दळणवळण यंत्रणा केवळ सिलीगुडी कॉरिडोरपर्यंत मर्यादित राहणार नाही. सागरी आणि नद्यांच्या दळणवळणाच्या माध्यमातून निर्वेध दळणवळण यंत्रणा उभारण्यावर काम सुरु झाले आहे. ही दळणवळण यंत्रणा वाढण्याचा लाभ आमच्या उद्योजकांना, शेतकऱ्यांना होत आहे. यामुळे ईशान्य भारतात होत असलेल्या वाहतुकीच्या वेळेचीही बचत होत आहे. दुसरा फायदा हा आहे की, ईशान्य भारतातील या गावांना, शेतकऱ्याना, दूध आणि भाजी तसेच खनिज पदार्थांसारख्या इतर उत्पादनांना थेट देश-विदेशातील बाजारपेठ उपलब्ध झाली आहे.

मित्रांनो,

ईशान्य प्रदेश, भारताच्या नैसर्गिक आणि सांस्कृतिक विविधतेचे आणि सांस्कृतिक शक्तीचेही खूप मोठे प्रतिक आहे. हा प्रदेश म्हणजे भारताची ‘आन-बान आणि शान’ आहे. अशा स्थितीत जेव्हा आधुनिक पायाभूत सुविधांची उभारणी केली जाते, तेव्हा त्यातून पर्यटनालाही मोठी उभारी मिळते. मणिपूरसह, संपूर्ण ईशान्य भारतातील पर्यटनाच्या क्षमता अद्याप पूर्णपणे विकसित झालेल्या नाहीत.

आजकाल तर सोशल मीडिया आणि वीडियो स्ट्रीमिंगच्या माध्यमातून देश-विदेशात ईशान्य भारताचे हे चित्र, या पर्यटन क्षमता घराघरांपर्यंत पोहोचवण्याच्या शक्यता निर्माण झाल्या आहेत. ईशान्य भारतातील अशा अस्पर्श स्थळांचे व्हीडीओ बघून लोकांना आश्चर्य वाटतंय की या जागा भारतातच आहेत का? ईशान्य भारताने आपल्या या शक्तीचा पुरेपूर लाभ घ्यायला हवा. इथल्या युवकांना रोजगाराच्या संधी मिळाव्यात, याच दिशेने सरकारची अनेक कामे पुढे जात आहेत.

मित्रांनो,

 

ईशान्य भारतात, देशाच्या विकासाचे इंजिन बनण्याची क्षमता आहे. दिवसेंदिवस माझा हा विश्वास अधिकाधिक भक्कम होत आहे कारण आता संपूर्ण ईशान्य भारतात, शांतता प्रस्थापित होत आहे. जिथून पूर्वी केवळ नकारात्मक बातम्याच येत असत, तिथे आता शांतता, प्रगती आणि समृद्धीचे मंत्र दुमदुमत आहेत.

एकीकडे जिथे, मणिपूरला होणारे अवरोध आता इतिहासजमा झाले आहेत आणि आपले मुख्यंत्री सांगत होते, मी देखील माझ्याकडून ईशान्य भारतातील नागरिक विशेषतः मणिपूरच्या नागरिकांचे मनापासून अभिनंदन करतो की तुम्ही आम्हाला साथ दिली, माझ्या शब्दांना वजन दिले आणि या प्रदेशात वारंवार होणारे अवरोध संपले. तसेच आसामात गेल्या अनेक दशकांपासून सुरु असलेली हिंसा संपली. त्रिपुरा आणि मिझोराम  येथील युवकांनीही हिंसेच्या मार्गाचा त्याग केला आहे. आता ब्रू-रियांग शरणार्थी एका उज्ज्वल आयुष्याकडे वाटचाल करत आहेत.

मित्रांनो,

उत्तम पायाभूत सुविधा, दळणवळण यंत्रणा आणि शांतता या तीन गोष्टी जिथे वाढतात, तिथे उद्योगक्षेत्र येण्याची, गुंतवणूक येण्याच्या संधी देखील कित्येक पटींनी वाढतात. ईशान्य भारताकडे तर, सेंद्रिय उत्पादने आणि बांबू ही दोन अशी माध्यमे आहेत, जी आत्मनिर्भर भारत अभियानाला सामर्थ्य देण्यास सक्षम आहेत. आणि आज मी जेव्हा तुमच्याशी बोलतो आहे, तेव्हा मी विशेषतः ईशान्य भारतातील शेतकरी बंधू भगिनींशी विशेष संवाद साधू इच्छितो. मी नेहमीच म्हणत आलो आहे की ईशान्य भारत, देशाची सेंद्रिय उत्पादनांची राजधानी बनू शकते. आज मी आणखी एक गोष्ट बोलू इच्छितो. गेल्या काही दिवसांपूर्वी मी काही शास्त्रज्ञांना भेटलो. कृषी वैज्ञानिकांना भेटलो. त्यांनी एक मजेदार गोष्ट सांगितली. त्यांनी सांगितले की ईशान्य भारतात जर शेतकऱ्यांनी पामोलिनची शेती केली तर देशाला आणि तिथल्या शेतकर्यांनाही लाभ मिळू शकेल. आज पाम तेलाची भारतात निश्चित बाजारपेठ आहे. ईशान्य भारतातील शेतकरी सेंद्रिय शेती करतो, त्यत जर त्याने पाम तेलाची शेती केली, तर तुम्ही कल्पना करु शकता की तुम्ही देशाची केवढी मोठी सेवा कराल. आपल्या अर्थशास्त्राला किती मोठी गती देऊ शकाल. मी इथे सर्व राज्य सरकारांना आवाहन करतो की त्यांनी आपापल्या राज्यात पाम अभियानाची रचना करावी, शेतकऱ्यांना शिक्षित करावे, प्रेरित करावे आणि भविष्यात जर आपल्याला या शेतकऱ्यांना मदत करायची असेल, तर त्यावर देखील आपण काही योजना तयार करू शकतो. आता यासाठी मी आज, विशेषतः मणिपूरच्या बंधू भगिनींना सांगू इच्छितो-

ईशान्य प्रदेशातील माझे बंधू-भगिनी तर नेहमीच 'लोकलसाठी व्होकल ' राहिले आहेत. आणि ते केवळ व्होकल आहेत असे नाही. ईशान्य प्रदेशाचे एक वैशिष्ट्य आहे, त्यांना त्यांच्या स्थानिक उत्पादनांचा अभिमान वाटतो. मला आठवतंय, जेव्हा मी अशा प्रकारचा स्‍कार्फ वापरतो, तेव्हा त्या प्रदेशातील लोक अभिमानाने त्याकडे पाहत असतात. आपल्या वस्तूंचा एवढा अभिमान वाटणे ही खूप मोठी गोष्ट आहे. आणि म्हणूनच ईशान्य प्रदेशाला हे समजावणे कि लोकल साठी व्होकल बना, मला वाटते मी असे सांगायला नको. कारण तुम्ही तर त्याच्याही चार पावले पुढे आहात. तुम्ही तर लोकल प्रति खूप अभिमान बाळगणारे आहात. तुम्ही अभिमानाने सांगता, हो, हे आमचे आहे. आणि हीच तर ताकद असते.

आणि जी उत्पादने ईशान्य प्रदेशात बनायची त्यापैकी बहुतांश मूल्य वर्धन, प्रोत्साहन आणि बाजारपेठ उपलब्धतेपासून वंचित राहायची. लोकांना माहितच नव्हते , आता आत्मनिर्भर भारत अभियाना अंतर्गत स्थानिक उत्पादनांमध्ये मूल्य वर्धन आणि त्याचे विपणन यासाठी क्लस्टर्स विकसित केले जात आहेत. या  क्लस्टर्समध्ये कृषी संबंधित  स्टार्टअप्स आणि अन्य उद्योगांना प्रत्येक सुविधा पुरवल्या जातील. यामुळे ईशान्य भागातील सेंद्रिय उत्पादनांना देशातील तसेच प्रदेशातील बाजारपेठांपर्यंत पोहचवण्यासाठी प्रत्येक आवश्यक सुविधा जवळच उपलब्ध होईल. 

मित्रांनो,

,ईशान्य प्रदेशात भारताच्या बांबू आयातीला स्थानिक उत्पादनांचा पर्याय पुरवण्याचे सामर्थ्य  आहे. देशात उदबत्तीची एवढी मोठी मागणी आहे, परंतु तरीही आपण कोट्यवधी रुपये किंमतीच्या उदबत्तींची आयात करतो. ही स्थिती बदलण्यासाठी देशात खूप काम होत आहे आणि याचा देखील खूप मोठा लाभ ईशान्येकडील राज्यांनाच मिळेल.

 मित्रांनो, 

ईशान्य प्रदेशात बांबू उद्योगाला प्रोत्साहन देण्यासाठी यापूर्वीच एक बांबू औद्योगिक पार्कला मान्यता देण्यात आली आहे. एवढेच नाही, नुमालीगढ़ येथे बांबूपासून जैव इंधन बनवण्याचा कारखाना देखील उभारला जात आहे. राष्ट्रीय बांबू मिशन अंतर्गत बांबू लागवड करणारे शेतकरी, हस्तकलेशी निगडित कलाकार आणि इतर सुविधांसाठी कोट्यवधी रुपयांची गुंतवणूक केली जात आहे. याचा मोठा फायदा ईशान्य प्रदेशातील युवकांना,  इथल्या स्टार्ट अप्सना  होईल.

 

 

मित्रांनो, 

ईशान्य भारतात वेगाने हे जे बदल होत आहेत, त्याचा लाभ सर्वात सक्रीय राज्याला मिळेल. मणिपूर राज्यासमोर अमर्याद संधी आहेत आणि मला पूर्ण विश्वास आहे की मणिपूर ही संधी दवडणार नाही. इथले शेतकरी, येथील  युवा उद्योजकांना याचा खूप मोठा फायदा होणार आहे . मणिपूरच्या युवकांना रोजगाराच्या संधी स्थानिक पातळीवरच उपलब्ध व्हाव्यात असा आमचा प्रयत्न आहे. आरोग्य, शिक्षण, कौशल्य विकास, स्टार्ट अप आणि अन्य प्रशिक्षणांसाठी आता येथेच अनेक संस्था सुरु करण्यात येत आहेत. क्रीडा विद्यापीठ आणि जागतिक दर्जाचे स्टेडियम तयार झाल्यापासून मणिपूर हे देशातील क्रीडाकौशल्याला पैलू पाडणारे मोठे केंद्र म्हणून विकसित होत आहे. इतकेच नाही, तर देशाच्या इतर भागातही, मणिपूर आणि इतर ईशान्येकडील राज्यांच्या विद्यार्थ्यांसाठी वसतिगृहांसह अनेक उत्तम सुविधा पुरवण्यात येत आहेत. विश्वास आणि विकासाचा हा मार्ग आपण अधिक मजबूत करत रहायला हवे. या नव्या पाणीपुरवठा प्रकल्पासाठी आपल्या सर्वाना अनेकानेक शुभेच्छा! 

विशेषतः, आमच्या माता भगिनींचे आशीर्वाद आणि त्यांच्याकडून मिळणारी उर्जा आपल्याला हे काम विना अडथळा पूर्ण करण्याची शक्ती देओ. वेळेच्या आधीच आपण हे काम पूर्ण करू शकू, असा आशीर्वाद माता भगिनींनी आम्हाला द्यावा. आमच्या कामासाठी आपला आशीर्वाद महत्वाचा आहे. आपल्या आशीर्वादात खूप मोठी ताकद आहे. राखीपोर्णीमेचा  सण जवळच आहे, त्यामुळे आपला आशीर्वाद मिळावा अशी मी आग्रहपूर्वक विनंती करतो.तुम्ही सगळे जण आपापली काळजी घ्या.  

स्वच्छतेच्या बाबतीत ईशान्येकडील लोक नेहमीच आग्रही आणि सजग असतात. देशासमोर त्यांनी एक आदर्श उदाहरण ठेवले आहे. पण आज, आपण कोरोनाशी लढतो आहोत, तेव्हा, शारीरिक अंतर, चेहऱ्यावर मास्क आणि सैनीटायझरचा वापर, त्याचप्रमाणे बाहेर न थुंकणे, कचरा-अस्वच्छता न करणे या सगळ्या गोष्टी लक्षात ठेवून त्यांचे पालन करायचे आहे. आज कोरोनाशी लढा देण्यासठी सर्वात मोठे साधन हेच आहे. हेच आपल्याला कोरोनाविरुद्धच्या लढाईत मदत करणार आहे. 

मला आज तुमच्याशी संवाद साधण्याची संधी मिळाली, एक मोठे स्वप्न घेऊन आम्ही या योजनेची सुरुवात करत आहोत. मणिपूर देशाला नवीन दिशा देईल, असा मला पूर्ण विश्वास आहे. या दृढ विश्वासासह आपल्याला अनेकानेक शुभेच्छा !! 

खूप खूप धन्यवाद !!!

***

DJM/MI/UU/BG/Radhika Agor/Sushama Kane



(Release ID: 1640789) Visitor Counter : 154