आरोग्य आणि कुटुंब कल्याण मंत्रालय
डॉ हर्ष वर्धन यांच्या हस्ते दिल्लीतील एम्स येथे कोविड- 19 प्लाझ्मा दान मोहिमेचे उद्घाटन
कोविड -19 वर विजय मिळवण्याच्या आमच्या प्रवासात प्रत्येक देणगीदाराचा सहभाग, आणि आम्हाला अशा जास्तीत जास्त कोरोना योद्धयांची गरज आहे - डॉ हर्ष वर्धन
प्रविष्टि तिथि:
19 JUL 2020 10:07PM by PIB Mumbai
केंद्रीय आरोग्य आणि कुटुंब कल्याण मंत्री डॉ हर्ष वर्धन यांनी आज एम्स दिल्ली येथे प्लाझ्मा दान मोहिमेला हिरवा झेंडा दाखवला. हा कार्यक्रम दिल्ली पोलिसांनी संयुक्तपणे आयोजित केला होता ज्यामध्ये कोविड वर मात केलेले 26 पोलिस कर्मचारी स्वेच्छेने ब्लड प्लाझ्मा दान करण्यासाठी आले होते.
या उपक्रमाबद्दल दिल्ली पोलिसांबद्दल कृतज्ञता व्यक्त करताना ते म्हणाले, “कोरोनामुळे दिल्लीच्या डझनभर पोलिस कर्मचाऱ्यांचा मृत्यू झाला हे फार वाईट आहे. मात्र तरीही या परिस्थितीत या विषाणूचा प्रसार रोखण्यासाठी कर्मचारी तैनात करण्याचे मोठे काम ते करत आहेत, जिथे प्रतिबंधित क्षेत्रांची संख्या 200 वरून 600 वर गेली आहे. ”
डॉ. हर्ष वर्धन यांनी 26 पोलिस हवालदारांना प्रमाणपत्र देऊन या स्वयंसेवकांच्या योगदानाला सलाम केला. त्यापैकी ओम प्रकाश आज तिसऱ्यांदा त्यांचे प्लाझ्मा दान करत होते. या दानाचा कायमस्वरुपी प्रभाव अन्य देशवासींवर पडेल, ज्यांना त्यांचे प्लाझ्मा दान करण्यास प्रेरणा मिळेल, असे केंद्रीय मंत्र्यांनी नमूद केले. कोविड -19 वर विजय मिळविण्याच्या आमच्या प्रवासात प्रत्येक देणगीदाराचा सहभाग आहे. आणि एक निश्चित उपचार किंवा लस विकसित होईपर्यंत या महामारीचा सामना करण्यासाठी आपल्याला यांच्यासारखे अधिकाधिक प्लाझ्मा योद्धाची गरज आहे असेही ते म्हणाले.
त्यांनी या रणनीतीची प्रचंड क्षमता आणि त्यात सरकारची इच्छाशक्ती याची दखल घेतली. ते म्हणाले, “आतापर्यंत कॉनवेलेसेंट प्लाझ्मा थेरपीला सहानुभूतीपूर्ण वापरासाठी मंजुरी देण्यात आली आहे आणि दिवसरात्र उपलब्धता सुनिश्चित करण्यासाठी विविध प्लाझ्मा बँका तयार केल्या जात आहेत. कोविड -19 रूग्णांपैकी भारतामध्ये रुग्ण बरे होण्याचा दर उत्तम असला तरीही प्लाझ्मा दान करणाऱ्यांचे प्रमाण अजूनही नगण्य आहे. एम्स, नवी दिल्ली दिल्ली पोलिस कोरोना योध्यांच्या सहकार्याने ही प्लाझ्मा दान मोहीम आयोजित करत असल्याचा मला आनंद आहे. ”
1994 मध्ये पल्स पोलिओ मोहिमेच्या यशाचा अविभाज्य भाग म्हणून दिल्ली पोलिसांच्या योगदानाची आठवण करून देताना डॉ हर्षवर्धन म्हणाले की, हजारो पोलिस कॉन्स्टेबल अभियानामध्ये सहभागी झाले आणि त्यांनी व्यापक जनजागृती मोहीम राबवली. 100 दूरध्वनी क्रमांकही याच मोहिमेसाठी समर्पित होता, अशी आठवण त्यांनी करून दिली.
बरे झालेल्या कोविड -19 रुग्णांच्या प्लाझ्मामध्ये सार्स -सीओव्ही -२ विषाणू च्या संरक्षणात्मक अँटीबॉडीज असतात. त्या कोविड -19 च्या रूग्णांना संक्रमित केल्यानंतर त्यांना प्रतिकारशक्ती प्रदान करू शकतात . याचा संभाव्य फायदा लक्षात घेता, जे रुग्ण पारंपारिक उपचारांना प्रतिसाद देत नाहीत त्यांना प्लाझ्मा थेरपी दिली जाते. कोविड -19 मधून उपचारानंतर बरे झाल्यांनतर किंवा घरातील अलगीकरणानंतर 28 दिवस पूर्ण झाल्यावर 18 ते 60 वर्षे वयोगटातील 50 किलोपेक्षा जास्त वजन असलेले कुणीही ब्लड प्लाझमा दान करण्यास पात्र आहेत. रक्तपेढी रक्तदान करण्याच्या पात्रतेचे मूल्यांकन करेल आणि रक्तदान करण्यापूर्वी त्यांच्या रक्तातील कोविड -19 संरक्षणात्मक अँटीबॉडीची पातळी तपासेल. बचावलेल्या व्यक्तीच्या रक्तामध्ये सामान्यत: अशा अँटीबॉडीजचे प्रमाण जास्त असते आणि जेव्हा एखाद्या संसर्ग झालेल्या व्यक्तीला दिले जाते तेव्हा या अँटीबॉडीज रक्तामध्ये पसरतात , टिश्यूमध्ये पोहोचतात आणि विषाणूला निष्प्रभ करतात. दानाची प्रक्रिया एक ते तीन तासांत पूर्ण होते आणि त्याच दिवशी प्लाझ्मा गोळा केला जाऊ शकतो.
*****
B.Gokhale/S.Kane/P.Kor
***
सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा
@PIBMumbai
/PIBMumbai
/pibmumbai
pibmumbai[at]gmail[dot]com
(रिलीज़ आईडी: 1639858)
आगंतुक पटल : 235