विज्ञान आणि तंत्रज्ञान मंत्रालय
विज्ञान आणि तंत्रज्ञान क्षेत्रात सहकार्य करण्याबाबत भारत आणि युरोपीय महासंघातल्या कराराचे पुढच्या पाच वर्षांसाठी नूतनीकरण
Posted On:
16 JUL 2020 7:21PM by PIB Mumbai
नवी दिल्ली, 16 जुलै 2020
भारत-युरोपीय महासंघाच्या 15 व्या शिखर परिषदेदरम्यान भारत आणि युरोपीय महासंघात विज्ञान आणि तंत्रज्ञान सहकार्यविषयक कराराचे आणखी पाच वर्षांसाठी म्हणजे 2020 ते 2025 या काळासाठी नूतनीकरण करण्यात आले.
या परिषदेत भारताचे नेतृत्व पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केले तर युरोपीय युनियनचे अध्यक्ष चार्ल्स मिशेल आणि युरोपीय आयोगाच्या अध्यक्ष उर्सुला वॉन डेर लेयेन यांनी युरोपीय महासंघाचे प्रतिनिधित्व केले.
या कराराच्या नूतनीकरणामुळे, भारत आणि युरोपीय महासंघादरम्यान परस्पर लाभ आणि परस्पर सहकार्य या मूल्यांच्या आधारे संशोधन आणि नवोन्मेष यात देवाणघेवाण केली जाणार आहे. आधीचा, वर्ष 2001 चा करार 17 मे रोजी संपुष्टात आला होता.
“दोन्ही पक्षांनी या कराराच्या नूतनीकरणाची प्रकिया वेळेत सुरु करण्याबाबत कटिबद्धता व्यक्त केली असून, संशोधन आणि नवोन्मेष क्षेत्रात गेल्या 20 वर्षातील सुदृढ सहकार्याबद्दल समाधान व्यक्त केले,” असे, या परिषदेनंतर जारी करण्यात आलेल्या संयुक्त निवेदनात म्हटले आहे.
या करारामुळे, जल, उर्जा, आरोग्य, कृषी-तंत्रज्ञान आणि जैव तंत्रज्ञान, एकात्मिक सायबर-फिजिकल व्यवस्था, माहिती आणि संपर्क तंत्रज्ञान, नैनो तंत्रज्ञान आणि स्वच्छ तंत्रज्ञान अशा विविध क्षेत्रात परस्पर सहकार्य करता येणार आहे. यातून संशोधन क्षेत्रातील संस्थात्मक संबंध अधिक दृढ होतील आणि संशोधन, विद्यार्थी, स्टार्ट अप यांची देवघेव होऊ शकेल. तसेच ज्ञानवृद्धीसाठी सहगुंतवणुक आकर्षित करण्यासाठी याचा उपयोग होईल.
त्याआधी, केंद्रीय विज्ञान आणि तंत्रज्ञान मंत्री डॉ हर्षवर्धन यांनी व्हिडीओ कॉन्फरन्सच्या माध्यमातून या कराराचा आढावा घेतला आणि या कराराशी संबंधित भारतीय संस्थांशी चर्चा केली.
या आढावा बैठकीत, या कराराचे नूतनीकरण करावे, अशी सूचना सर्वांनी केली. गेल्या पाच वर्षात, या कराराअंतर्गत 73 संयुक्त संशोधन प्रकल्प राबवण्यात आले, यातून 200 संयुक्त संशोधन प्रबंध आणि काही पेटंटसाठी अर्ज करण्यात आले. संशोधक आणि विद्यार्थ्यांच्या 500 गाठीभेटी आणि दौरे झाले. तसेच ज्ञाननिर्मिती, मानवी क्षमता विकास, तंत्रज्ञान विकास अशा विविध प्रकारचे संयुक्त उपक्रम राबवण्यात आले.
S.Tupe/R.Aghor/P.Malandkar
सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा@PIBMumbai /PIBMumbai /pibmumbai pibmumbai[at]gmail[dot]com
(Release ID: 1639306)
Visitor Counter : 190