आरोग्य आणि कुटुंब कल्याण मंत्रालय
केंद्रीय मंत्री डॉ. हर्ष वर्धन यांच्या हस्ते दिल्ली एम्सच्या राजकुमारी अमृत कौर बाह्य रुग्ण विभागाचे उद्घाटन
“सुश्रुषा गुणवत्ता सुनिश्चित करण्यासाठी सध्याच्या आरोग्यसेवा प्रणालीचे मुल्यांकन करूया आणि आरोग्यसेवा सुधारणांमध्ये नवोन्मेषाच्या दिशेने वाटचाल करूया”
दिवसाला 10 लाख चाचण्या करून कोविड चाचणी क्षमता मजबूत करणे : डॉ. हर्ष वर्धन
Posted On:
16 JUL 2020 7:25PM by PIB Mumbai
केंद्रीय आरोग्य व कुटुंब कल्याण मंत्री डॉ. हर्ष वर्धन यांनी आज आरोग्य व कुटुंब कल्याण राज्यमंत्री अश्विनी कुमार चौबे यांच्यासह एम्स, नवी दिल्ली येथील राजकुमारी अमृत कौर बाह्य रुग्ण विभागाचे उद्घाटन झाले. यावेळी, एम्सचे संचालक प्रा. आर. गुलेरिया आणि एम्सचे अन्य वरिष्ठ अधिकारीही उपस्थित होते.
प्रसिद्ध स्वातंत्र्यसैनिक आणि देशाच्या पहिल्या आरोग्य मंत्री राज कुमारी अमृत कौर यांच्या नावावर हा बाह्य रुग्ण विभाग सुरु केल्याबद्दल डॉ. हर्ष वर्धन यांनी आनंद व्यक्त केला. कोविड-19 च्या विरोधात देशाच्या सामूहिक प्रयत्नांची माहिती देताना ते म्हणाले की, “हळू हळू आम्ही या साथीच्या रोगा विरुद्ध सुरु केलेली लढाई जिंकण्याच्या दिशेने वाटचाल करत आहेत. 2 टक्क्यांहून कमी कोविड बाधित रुग्ण आयसीयू मध्ये उपचार घेत आहेत. आपले प्रयोगशाळांचे जाळे मजबूत झाले आहे; जानेवारी 2020 पासून आज आतापर्यंत प्रयोगशाळांची संख्या सातत्याने वाढत आज 1234 झाली आहे. आजपर्यंत आम्ही दररोज 3.26 पेक्षा जास्त नमुन्यांची चाचणी केली आहे. डॉ. हर्ष वर्धन पुढे म्हणाले की, येत्या 12 आठवड्यांत ही क्षमता दररोज 10 लाख चाचण्यांपर्यंत वाढविण्यात येईल. ते पुढे म्हणाले की, हा आकडा रुग्ण बरे होण्याच्या आकड्याशी मिळता जुळता असून रुग्ण बरे होण्याचा आकडा आणि सक्रीय रुग्णांचा (2,81,668) आकडा यामधील दरी हळूहळू वाढत आहे. ‘संपूर्ण सरकार’ या धोरणांतर्गत घेतलेले श्रेणीबद्ध, सक्रीय दृष्टीकोनातून घेतलेल्या उपाययोजनांमुळे सकारात्मक परिणाम दिसून येत आहेत.
लोकांना लवकरात लवकर आरोग्य सेवा प्राप्त करता यावी यासाठी मातृ-शिशु विभाग, वयस्क विभाग आणि शस्त्रक्रिया विभागाचे क्रियान्वयन लवकरात लवकर करण्याचे निर्देश एम्सचे संचालक आणि इतर अधिकाऱ्यांना दिले. एम्स नवी दिल्ली येथे येणाऱ्या सर्व रूग्णांना उत्तम दर्जाची आरोग्य सेवा मिळावी यासाठी ज्या उपाययोजना करता त्यांचे आकलन व विश्लेषण करण्यासाठी त्यांनी प्रत्येक विभागामध्ये तपशीलवार व सामूहिक विचारमंथन सत्र आयोजित करावे असे आवाहन त्यांनी एम्सच्या अधिकारी व विभाग प्रमुखांना केले. त्यांनी विचार-विनिमय करून रुग्ण-अनुकूल सुधारणांचा प्रस्ताव देण्याचे आवाहन केले.
अश्विनीकुमार चौबे यांनी अत्याधुनिक नवीन ओपीडी इमारतीच्या बांधकामात सहभागी असलेल्या संपूर्ण टीमचे आभार मानले आणि यामुळे रुग्णसेवा सुविधांना नक्कीच चालना मिळेल अशी आशा व्यक्त केली. ते म्हणाले की, एम्स, दिल्ली येथे मिळणाऱ्या उत्तम दर्जाच्या आरोग्य सुविधा आणि सुश्रुषेमुळे देशातील कानाकोपऱ्यातील नागरीकांना एम्स दिल्लीवर विश्वास आहे; एम्स आपली ही गौरवशाली परंपरा अबाधित ठेवेल. कोविड-19 विरुद्धच्या लढ्यात आपल्या प्राणांचे बलिदान देणाऱ्या कोविड योद्ध्यांप्रती त्यांनी आदर व्यक्त केला.
मंत्र्यांनी अनेक ओपीडीची पाहणी केली आणि रुग्णांना देण्यात येणाऱ्या सुविधांचा आढावा घेण्यासाठी त्यांच्याशी संवाद साधला.
अंदाजे 6300 चौरस मीटर क्षेत्रावर बांधलेली, आरएके ओपीडी ही भारतातील सर्वात मोठी ओपीडी आहे. नवीन आरएके ओपीडी ब्लॉकमध्ये अत्याधुनिक प्रयोगशाळा असून ही प्रयोगशाळा उभारण्यासाठी 15 कोटी रुपये खर्च करण्यात आले आहेत. हे विविध विश्लेषक आणि तंत्रज्ञान एकाच समाकलित कार्यप्रवाहात एकत्रित करते. येथे, पूर्व विश्लेषण; विश्लेषण आणि विश्लेषण नंतरचे सर्व टप्पे भौतिकदृष्ट्या रोबोट ट्रॅकद्वारे एकमेकांशी जोडले असून तांत्रिकदृष्ट्या समाकलित आहेत. दररोज 10,000 पेक्षा जास्त रुग्णांना तपासण्याच्या क्षमतेसह दररोज दोन लाख चाचण्या वृद्धिंगत करण्याची क्षमता आहे. ट्रॅक-आधारित प्रयोगशाळा स्वयंचलित प्रतिष्ठापनांपैकी आशिया पॅसिफिकमधील ही सर्वात मोठी प्रयोगशाळा असून एका वर्षापेक्षा कमी कालावधीत ही सुरु करण्यात आली आहे.
*****
S.Tupe/S.Mhatre/P.Kor
***
सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा@PIBMumbai /PIBMumbai /pibmumbai pibmumbai[at]gmail[dot]com
***
सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा@PIBMumbai /PIBMumbai /pibmumbai pibmumbai[at]gmail[dot]com
(Release ID: 1639137)
Visitor Counter : 250