पेट्रोलियम आणि नैसर्गिक वायू मंत्रालय
धर्मेंद्र प्रधान यांनी भारताच्या विकास गाथेमधील विशाल संधीचा लाभ घेण्यासाठी अमेरिकेतील गुंतवणूकदारांना केले आमंत्रित
अमेरिकेच्या ऊर्जा सचिवांसोबत कार्यकारी उद्योग गोलमेज बैठकीत मंत्री झाले सहभागी
Posted On:
16 JUL 2020 2:35AM by PIB Mumbai
17 जुलै 2020 रोजी नियोजित भारत आणि अमेरिका धोरणात्मक ऊर्जा भागीदारी मंत्रिपरिषदेच्या दुसऱ्या बैठकीच्या पूर्वी, पेट्रोलियम, नैसर्गिक वायू व पोलाद मंत्री धर्मेंद्र प्रधान यांनी अमेरिकेचे ऊर्जा सचिव डॅन ब्रॉव्हलेट यांच्यासमवेत, अमेरिका-भारत व्यवसाय परिषदेने (USIBC) बुधवारी आयोजित केलेल्या उद्योग स्तरीय संवादाचे सह-अध्यक्षस्थान भूषविले. याव्यतिरिक्त अमेरिका-भारत धोरणात्मक ऊर्जा भागीदारी (युएसआयएसपीएस) यांनी मंगळवारी आयोजित केलेल्या उद्योग स्तरीय संवादाचे अध्यक्षस्थान देखील भूषविले.
पीएनजी मंत्रालयाचे सचिव, तरुण कपूर, अमेरिकेचे भारतीय राजदूत तरणजित संधू, भारत आणि अमेरिका सरकारच्या ऊर्जा संबंधित मंत्रालयांचे प्रतिनिधी आणि भारतीय व अमेरिकन कंपन्यांच्या प्रतिनिधींनीही या आभासी बैठकीत भाग घेतला.
या संवाद दरम्यान प्रधान यांनी अमेरिकन कंपन्यांना आणि गुंतवणूकदारांना भारतातील नवीन संधींमध्ये गुंतवणूक करण्यासाठी आमंत्रित केले. या क्षेत्रातील भारतीय आणि अमेरिकन कंपन्यांमध्ये काही सहकार्यात्मक प्रयत्न झाले आहेत, परंतु ते त्यांच्या क्षमतेपेक्षा खूपच कमी असल्याचे मंत्री म्हणाले. अमेरिका-भारत ऊर्जा भागीदारीची लवचिकता ही भारत-अमेरिका धोरणात्मक भागीदारी मधील एक अतिशय शाश्वत आधारस्तंभ असल्याचे त्यांनी निदर्शनास आणून दिले.
प्रधान म्हणाले की या आव्हानात्मक काळातही भारत आणि अमेरिका जागतिक ऊर्जा बाजारात स्थिरता आणण्यासाठी असो किंवा मग कोविड-19 संबंधीत आव्हानांवर मात करणे असो उभय देश एकत्रित सहकार्याने प्रयत्न करीत आहेत. ते म्हणाले, “आजच्या अशांत व अस्थिर जगात एक स्थिरता आहे आणि ती म्हणजे आमच्या द्विपक्षीय भागीदारीची ताकद ”
धोरणात्मक ऊर्जा भागीदारीबद्दल बोलताना मंत्री म्हणाले की नैसर्गिक वायू क्षेत्रातील सहकार्याला प्राधान्य देण्यात आले आहे. मंत्र्यांनी यावेळी भारतीय ऊर्जा क्षेत्रातील एलएनजी बंकरिंग, एलएनजी आयएसओ कंटेनर विकास, पेट्रोकेमिकल्स, जैव-इंधन आणि कॉम्प्रेस्ड जैव वायू या क्षेत्रातील अनेक आगामी नवीन संधींबद्दल माहिती दिली.
प्रधान यांनी भारतातील शोध व उत्पादन क्षेत्रातील दूरगामी बदल आणि धोरणात्मक सुधारणांविषयीही सांगितले. जलदगतीने विकसित होणाऱ्या अर्थव्यवस्थेच्या गरजा भागविण्यासाठी देश तयार होत असल्यामुळे, पुढील पाच वर्षात तेल आणि वायूचा शोध तसेच गॅस पुरवठा व वितरण नेटवर्कच्या विकासासह नैसर्गिक वायूची पायाभूत सुविधा उभारण्यात 118 अब्ज अमेरिकन डॉलर्सपेक्षा जास्त गुंतवणूक भारतात होणार आहे असे ते म्हणाले.
पुढच्या OALP आणि DSF बोली फेऱ्यांमध्ये अमेरिकन कंपन्यांनी अधिकाधिक गुंतवणूक करण्यासाठी सहभागी व्हावे असे आमंत्रण मंत्र्यांनी दिले आहे.
उद्योग गोलमेजचे वर्णन करताना ते म्हणाले की इथले विचार-विमर्श आपल्याला उद्योगाच्या दृष्टीकोनातून उपयुक्त माहिती पुरवतील.
****
M.Chopade/S.Mhatre/P.Kor
***
सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा@PIBMumbai /PIBMumbai /pibmumbai pibmumbai[at]gmail[dot]com
(Release ID: 1639038)
Visitor Counter : 277
Read this release in:
English
,
Urdu
,
Hindi
,
Assamese
,
Bengali
,
Manipuri
,
Punjabi
,
Odia
,
Tamil
,
Telugu
,
Malayalam