अर्थ मंत्रालय
अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांच्याकडून प्रधानमंत्री फसल बिमा योजनेचा आढावा
जनजागृती मोहिमा राबविण्यावर भर देत विमा दावे लवकर निकाली काढण्यासाठी अनुदानाची रक्कम लवकर देण्याच्या राज्यांना सूचना
Posted On:
13 JUL 2020 6:52PM by PIB Mumbai
नवी दिल्ली, 13 जुलै 2020
केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी आज व्हिडीओ कॉन्फरन्सच्या माध्यमातून प्रधानमंत्री फसल बिमा योजनेचा आढावा घेतला. वित्तीय सेवा सचिव देवाशिष पांडा, कृषी, सहकार व शेतकरी कल्याण विभागाचे सचिव संजय अग्रवाल; याशिवाय वित्त सेवा; कृषी, सहकार व शेतकरी कल्याण विभागाचे आणि PMFBY योजना राबविणाऱ्या सामान्य विमा कंपन्यांचे, तसेच शेड्युल्ड व्यावसायिक बँकांचे वरिष्ठ अधिकारी या बैठकीत सहभागी झाले होते.
यावेळी कृषी विभागाकडून देण्यात आलेल्या सादरीकरणात, PMFBY च्या खरीप 2016 हंगामापासूनच्या प्रवासाची माहिती, योजना राबवताना येणारी आव्हाने आणि खरीप 2020च्या चालू हंगामासाठीच्या योजनेची अंमलबजावणी, यावर माहिती देण्यात आली. त्याआधी, या योजनेच्या आजवरच्या प्रगतीचा आढावा घेण्यात आला.
यावेळी अर्थमंत्र्यांनी या योजनेबाबत अधिक जनजागृती करण्याची गरज असल्यावर भर दिला. या योजनेची माहिती सर्व शेतकऱ्यांपर्यंत पोहचेल, याची काळजी घेतली जावी, जेणेकरुन सर्व शेतकरी स्वयंस्फूर्तीने योजनेचा लाभ घेतील. तसेच विम्याचे दावे लवकरात लवकर निकाली काढण्यासाठी राज्य सरकारांनी हप्त्यांवरच्या अनुदानाची रक्कम त्वरित द्यावी, अशी सूचनाही त्यांनी दिली. जिथे अनुदानाची रक्कम प्रलंबित आहे, अशा राज्यात योजनेचा कठोर पाठपुरावा केला जावा, विशेषतः अशी राज्ये जिथे चालू खरीप हंगामात योजनेची अंमलबजावणी केली जात नाही, तिथे लक्ष दिले जावे, ज्यामुळे शेतकऱ्यांना त्यांच्या दाव्यांच्या प्रलंबित रकमा लवकरात लवकर मिळतील.
कृषी विभागाच्या सचिवांनी सांगितले, की नव्या स्वरूपातील PMFBY योजनेची अंमलबजावणी करतांना तंत्रज्ञानाचा फायदा घेण्यावर आमच्या विभागाचा भर होता. आमचा विभाग या तंत्रज्ञानाच्या मूल्यांकनावर काम करत असून, त्याचे परिणाम 2023 नंतर दिसू शकतील. यंदाच्या रब्बी हंगामात PMFBY योजनेचा प्रभाव किती झाला, हे बघण्यासाठी एक सर्वेक्षण केले जाईल, असेही त्यांनी सांगितले.
S.Pophale/R.Aghor/P.Malandkar
सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा@PIBMumbai /PIBMumbai /pibmumbai pibmumbai[at]gmail[dot]com
(Release ID: 1638501)
Visitor Counter : 203