गृह मंत्रालय
केंद्रीय गृहमंत्री अमित शहा केंद्रीय राखीव पोलीस दल परिसर, गुरूग्राम येथे केंद्रीय सशस्त्र पोलीस दलाच्या अखिल भारतीय वृक्षारोपण मोहिमेत झाले सहभागी
Posted On:
12 JUL 2020 9:08PM by PIB Mumbai
नवी दिल्ली, 12 जुलै 2020
केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी केंद्रीय सशस्त्र पोलीस दलाच्या (सीएपीएफ) देशव्यापी वृक्षारोपण मोहिमे अंतर्गत गुरूग्राम येथील केंद्रीय राखीव पोलीस दल (सीआरपीएफ) परिसरात ‘पिंपळा’ चे रोप लावून मोहिमेचा शुभारंभ केला. याप्रसंगी अमित शहा म्हणाले की, “मी सीएपीएफच्या शूर सानिकांचे कौतुक करतो आणि त्यांचे आभार मानतो, जे देशाचे रक्षण करण्यासोबतच या विशाल वृक्षारोपण मोहिमे अंतर्गत संपूर्ण देशभरात, दीर्घायुष्य असणारी अशी 1.37 कोटी रोपे लावत आहेत.” ते म्हणाले की, केंद्रीय सशस्त्र पोलिस दलाचे जवान देशभरातील विमानतळ आणि रेल्वे स्थानकांचे संरक्षण आणि दहशतवादा विरोधात लढा देण्यासोबतच कोविड-19 साथीच्या आजाराविरुद्ध पुकारलेल्या देशव्यापी लढ्यात देखील महत्त्वपूर्ण योगदान देत आहेत. कोविड-19 साथीच्या आजाराच्या विरुद्धचा लढाईत आपले प्राण गमावलेल्या 31 हून अधिक सीएपीएफ कोरोनो योद्ध्यांना श्रद्धांजली अर्पण करताना गृहमंत्री म्हणाले की त्यांचे हे बलिदान व्यर्थ ठरणार नाही आणि कोविड-19 विरुद्धची ही लढाई संपल्यानंतर सीएपीएफचे हे योगदान सुवर्ण अक्षरात लिहिले जाईल.

अमित शहा म्हणाले की, वृक्षारोपणाची मोहीम अशा वेळी राबविली जात आहे जेव्हा संपूर्ण जग साथीच्या रोगाचा सामना करत आहे. ते म्हणाले, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखाली लोकसहभागातून कोविड-19 विरुद्धची लढाई सुरु आहे. आज भारत, देशातील साथीच्या आजाराचे व्यवस्थापन करण्यात एक यशस्वी लढ्याचे नेतृत्व करत आहे. ज्या काळात अगदी विकसित देशांच्या आरोग्य सेवा देखील कोरोनाच्या प्रभावामुळे संपूर्णतः कोलमडून पडल्या आहेत, अशावेळी संघराज्यीय संरचना असलेल्या, इतकी मोठी लोकसंख्या असलेला भारत या महामारीचा सामना कसा करेल याची संपूर्ण जगाला चिंता होती, परंतु आज, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखाली साथीच्या आजराविरुद्धचा सर्वात शक्तिशाली लढा भारताने दिला आहे. केंद्रीय गृहमंत्री म्हणाले की पंतप्रधानांच्या नेतृत्वाखाली आम्ही 'एक जन, एक विचार, एक राष्ट्र' या सूत्राला सत्यात उतरवत कोरोनाविरूद्धच्या लढाईत ठामपणे एकत्रित उभे आहोत.

केंद्रीय गृहमंत्री म्हणाले की, वृक्षारोपण मोहिमेमध्ये संपूर्ण देशभरात 1.37 कोटी रोपे लावण्याचे सीएपीएफचे लक्ष्य आहे. अमित शहा यांनी एका प्राचीन हिंदू ग्रंथाचा संदर्भ देत म्हटले की एका झाडाचे मूल्य दहा मुलांपेक्षा अधिक आहे.
दशकूपसमावापी, दशवापीसमोह्रदः।
दशह्रदसमोपुत्रो, दशपुत्रसमोद्रुमः।।
[एक तलाव 10 विहिरींसमान आहे, 1 सरोवर 10 तलावां समान आहे; एका मुलाचे मूल्य दहा सरोवरां इतके आहे आणि एका झाडाची किंमत दहा मुलां सामान आहे]
अमित शहा म्हणाले की आपण नैसर्गिक स्रोतांचे शोषण न करता त्याचा उपयोग केला पाहिजे. ते म्हणाले की आपल्या ऋषीमुनींनी फार वर्षांपूर्वीच हे जोर देऊन सांगितले आहे की कोणीही निसर्गाचे शोषण न करता सदैव निसर्गाचे संवर्धन करावे. परंतु, आज उपभोगवादी वृत्तीमुळे हे संतुलन बिघडले असून परिणामी आपल्याला हवामान बदल आणि ग्लोबल वार्मिंगच्या आव्हानांचा सामना करावा लागत आहे. निसर्गाचे शोषण केल्यामुळे ओझोन वायूचा थर बिघडला आहे. आपण खूप अधिक प्रमाणात वातावरणात कार्बन डाय ऑक्साईड आणि कार्बन मोनो-ऑक्साईड उत्सर्जित करीत आहोत आणि ओझोन थराशिवाय आयुष्य शक्य नाही.

अमित शहा म्हणाले की, पंतप्रधान नरेंद्र मोदी पॅरिस जागतिक पर्यावरण शिखर परिषदेत सहभागी झाले होते जिथे त्यांनी निसर्गाच्या होणाऱ्या अतिरिक्त शोषणा विरुद्ध संपूर्ण जगाला सावध केले होते आणि हवामान बदलाबाबतच्या पॅरिसच्या घोषणा पत्रात जगाने मोदींचे सूत्र स्वीकारले आहे. केंद्रीय गृहमंत्र्यांनी यावेळी पर्यावरणाला अनुकूल अशा ग्रामीण भागातील 8 कोटी मोफत सिलिंडर्सचे वापट अशा केंद्र सरकारच्या विविध कार्यक्रमांकडे लक्ष वेधले. सीएपीएफ ने या वृक्षारोपण मोहिमेकडे केवळ रोपे लावण्या पर्यंत सिमिती दृष्टीकोनातून न पहाता रोपे जोवर वातावरणात स्वतःला टिकवून धरण्यासाठी सक्षम होत नाहीत तोवर सीएपीएफने त्यांची काळजी घ्यावी असे सांगत अमित शहा यांनी आपले भाषण संपविले.

याप्रसंगी अमित शहा यांनी पिंपळाच्या झाडाचे रोप लावले. केंद्रीय गृह सचिव, अजय कुमार भल्ला, आणि केंद्रीय सशस्त्र पोलीस दलाचे सातही महासंचालक तसेच वरिष्ठ अधिकारी उपस्थित होते. वृक्षारोपण मोहिमेच्या निमित्ताने संपूर्ण देशभरातील केंद्रीय सशस्त्र पोलिस दलाच्या (सीएपीएफ) विविध ठिकाणी 10 लाखाहून अधिक रोपे लावण्यात आली आहेत.
* * *
B.Gokhale/ S.Mhatre/D.Rane
सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा
@PIBMumbai
/PIBMumbai
/pibmumbai
pibmumbai[at]gmail[dot]com
(Release ID: 1638231)
Visitor Counter : 180