आरोग्य आणि कुटुंब कल्याण मंत्रालय
डॉक्टर हर्षवर्धन यांनी छतरपूर इथल्या सरदार पटेल कोविड सेवा केंद्र व रूग्णालयाला भेट दिली
Posted On:
12 JUL 2020 9:00PM by PIB Mumbai
नवी दिल्ली, 12 जुलै 2020
डॉ. हर्षवर्धन यांनी नवी दिल्लीत छतरपूर येथल्या सरदार पटेल कोविड सेवा केंद्राला भेट दिली आणि तिथल्या कोविड संबंधातल्या व्यवस्थापनाचा आढावा घेतला. दिल्लीतल्या छतरपूर मधल्या 'राधा स्वामी सत्संग ब्यास' (RSSB) इथे 10,200 खाटांचे सरदार पटेल कोविड सेवा केंद्र उभारले असून कोविडचा प्रसार रोखण्यासाठी केंद्र आणि दिल्ली सरकार एकत्रितपणे करत असलेल्या प्रयत्नांचा तो एक भाग आहे.
या दौऱ्यात डॉक्टर हर्षवर्धन यांनी राधा स्वामी सत्संग ब्यास च्या स्वयंपाक घराची तसेच भांडार गृहाची तपासणी केली. या केंद्रात दाखल असलेल्या कोविड रूग्णांवर आयुर्वेद तसेच निसर्गोपचार चिकित्सेच्या नियमानुसार प्रतिकारशक्ती वाढवण्यासाठी उपचार केले जातात. सर्व रुग्णांना सकाळी आयुर्वेदिक काढा , दुपारी आहार तज्ञांच्या सल्ल्यानुसार जेवण व रात्री हळद मिश्रित दूध दिले जाते. अशी माहिती त्यांना देण्यात आली. PPE पोशाख घालून आरोग्यमंत्र्यांनी सुमारे बारा रुग्णांची विचारपूस केली. तसेच त्यांना मिळत असलेल्या सोयी-सुविधा आणि उपचार यांच्या बद्दल माहिती जाणून घेतली.
या कोविड सेवाकेंद्रात (SPCCC) 10,200 खाटा उपलब्ध असून त्यापैकी सध्या 2000 खाटांवर रुग्ण दाखल आहेत. या केंद्रात 88 दालने असून प्रत्येक दालनात 100 ते 116 खाटा आहेत. दोन दालनांमध्ये मिळून एक परिचारिका केंद्र आहे. दहा टक्के खाटांसाठी ऑक्सिजन यंत्रणा लावलेली आहे. सध्या 123 रुग्ण ऑक्सिजन यंत्रणेचा वापर करत असून त्यापैकी पाच रुग्ण पुढील उपचारांसाठी रुग्णालयात हलवले आहेत.
या केंद्रातल्या रुग्णांना आवश्यकता वाटल्यास राष्ट्रीय मानसिक आरोग्य व मज्जा विज्ञान संस्थेतर्फे (NIMHANS) मानसोपचार तज्ञ तसेच समुपदेशक उपलब्ध करून दिले आहेत. रुग्णांच्या मनःशांतीसाठी ध्यानधारणा तसेच योगासनांची सत्रे घेतली जातात. भारत तिबेट सीमा पोलीस रुग्णालयातर्फे फोनवरून वैद्यकीय सल्ला देण्याची सुविधाही आहे.
या कोविड सेवा केंद्राच्या तयारीविषयी डॉक्टर हर्षवर्धन यांनी समाधान व्यक्त केले. ते म्हणाले, "माननीय प्रधानमंत्री यांच्या मार्गदर्शनाखाली कोविड शी चाललेल्या लढ्यात आपण देशभरातल्या सार्वजनिक आरोग्य सेवेत सुधारणा घडवली आहे. " दिल्ली जिल्हा प्रशासन तसेच भारत-तिबेट सीमा पोलिस अधिकाऱ्यांनी एकत्रितपणे हे सेवा केंद्र अवघ्या दहा दिवसातच उभे करण्याचा विक्रम केल्याबद्दल त्यांनी प्रशंसा केली. भारत तिबेट सीमा पोलीस व सीमा सुरक्षा दलाच्या डॉक्टरांनी केलेल्या कामाची प्रशंसा करताना ते म्हणाले, " या कोविड केंद्रात इतर वैद्यकीय उपकरणासोबत जीवरक्षक प्रणाली असणाऱ्या 10 रुग्णवाहिका, क्ष-किरण यंत्र , बायफेजिक डीफिब्रिलेटर सह ऑक्सीजन सिलेंडर्स, सक्शन यंत्र, इत्यादी उपकरणे पाहून हे केंद्र सर्व प्रकारच्या कोविड रुग्णांना उपयोगी पडेल याची खात्री वाटते."
या केंद्राला भेट दिल्यानंतर डॉ हर्षवर्धन वार्ताहरांशी बोलताना म्हणाले, " भारताने कोविडशी लढण्यासाठी निश्चित केलेल्या कार्यप्रणालीनुसार जास्तीत जास्त टेस्टिंग, पाळत ठेवणे, रुग्णांची गंभीरते नुसार विभागणी, योग्य उपचारांचे व्यवस्थापन या काही बाबींवर भर दिला आहे. यामुळेच देशातल्या कोविड मुळे होणाऱ्या मृत्यूचे प्रमाण फक्त 2.66 टक्के इतके कमी आहे. आतापर्यंत 5 लाख 30 हजार रुग्ण बरे झाले असून बरे होण्याचे प्रमाण 63 टक्के इतके जास्त आहे, हे आपल्या आरोग्यसेवेचेच यश आहे." ते पुढे म्हणाले, की "अनलॉक 2.0 कडे जाताना आपल्याला एक सामाजिक लस टोचून घेतली पाहिजे , ती म्हणजे 'दोन मीटर चे शारीरिक अंतर' आणि कोविड पासून शक्य तेवढा बचाव करण्यासाठी सुयोग्य वर्तन केले पाहिजे."
* * *
B.Gokhale/U.Raikar/D.Rane
सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा
@PIBMumbai
/PIBMumbai
/pibmumbai
pibmumbai[at]gmail[dot]com
(Release ID: 1638230)