आरोग्य आणि कुटुंब कल्याण मंत्रालय
41 हजारपेक्षा अधिक ‘आयुष्मान भारत – आरोग्य व स्वास्थ्य केंद्रा’मार्फत कोविडकाळात वैश्विक व सर्वसमावेशक प्राथमिक आरोग्य सेवा
गेल्या पाच महिन्यात आरोग्य सेवा केंद्रात 8.8 कोटी लोकांनी सेवा घेतल्याची नोंद
प्रविष्टि तिथि:
10 JUL 2020 4:37PM by PIB Mumbai
आयुष्मान भारत योजनेची अंमलबजावणी करण्यासाठी आरोग्य व निरामय केंद्र, आधारस्तंभ ठरत आहेत. वर्ष 2022 पर्यंत देशातील 1,50,000 उपआरोग्य केंद्र व प्राथमिक आरोग्य केंद्रांचे रुपांतर आरोग्य व निरामय केंद्रात (Health & Wellness Centres -HWCs) करण्याची प्रक्रिया सुरु झाली असून, या केंद्रांद्वारे जनतेला सार्वत्रिक व सर्वसमावेशक प्राथमिक आरोग्य सेवा पुरवल्या जात आहेत. कोविड-19 विरुध्दच्या लढाईत, या केंद्रांनी असाधारण योगदान दिल्याची अनेक उदाहरणे समोर आली आहेत. झारखंडमध्ये, राज्यस्तरीय सार्वजनिक आरोग्य सर्वेक्षण सप्ताहादरम्यान, आरोग्य केंद्राच्या पथकांनी लोकांची ‘इली’ या फ्लू सदृश ताप व ‘सारी’च्या लक्षणांची तपासणी केली; तसेच कोविड-19 साठीच्या तपासणी सुविधाही पुरवल्या. ओडिशामधील सुबालया येथे आरोग्य केंद्राच्या पथकांनी आरोग्य तपासणी मोहिम राबवत कोविड-19 च्या प्रतिबंधात्मक उपाययोजनांसाठी जनजागृती केली. या पथकांनी तिथे गेलेल्या स्थलांतरित मजूरांसाठीच्या तात्पुरत्या आरोग्य शिबीरांमध्ये देखील आरोग्य विषयक सत्रे घेतली.
राजस्थानच्या ग्रांधी येथील आरोग्य केंद्राच्या पथकाने स्थानिक प्रशासनाच्या मदतीने बिकानेर-जोधपूर सीमा नाक्यावर येणाऱ्या-जाणाऱ्या सर्व प्रवाशांची कोविड-19 साठीची तपासणी केली. मेघालयच्या त्यांन्रिंग इथल्या आरोग्य केंद्राच्या पथकाने, समुदाय नेत्यांसाठी आणि शिक्षकांसाठी विशेष मार्गदर्शक शिबिरे घेऊन, त्यांना कोविडचे समुदाय संक्रमण रोखण्यासाठीच्या उपायांची माहिती दिली.
या आरोग्यकेंद्रातील कर्मचारी ज्या समुदायांसाठी सेवा देतात, त्यांच्यापर्यंत ती प्रभावीपणे व व्यापकतेने पोहोचल्याचे दाखले द्यायचे झाल्यास, गेल्या पाच महिन्यात, म्हणजेच 1 फेब्रुवारी 2020 पासून 8.8 कोटी लोकांनी या आरोग्य केंद्रांमधील विविध सेवांचा लाभ घेतला आहे. त्याआधी, एप्रिल 2018 ते जानेवारी 2020 या 21 महिन्यांच्या काळात, साधारण इतक्याच लोकांनी या केंद्रांच्या आरोग्य सेवांचा लाभ घेतला होता. मात्र, कोविडच्या काळात वाहतुकीवर निर्बंध असतानाही अधिक लोकांनी या सेवेचा लाभ घेतला आहे. त्याशिवाय, गेल्या पाच महिन्यात, 1.41 कोटी रुग्णांची उच्च रक्तचापासाठीची तपासणी या केंद्रांमध्ये झाली. तसेच, मधुमेहाचे 1.13 कोटी रुग्ण, 1.34 कोटी कर्करोगी यांचीही तपासणी झाली. उच्च रक्तचापाच्या 5.62 लाख रूग्णांना या केंद्रातून औषध देण्यात आले, तर केवळ जून महिन्यात, 3.77 लाख मधुमेही रुग्णांना औषधे वितरीत करण्यात आली. कोविडचा संसर्ग झाल्यापासून, या सर्व केंद्रांनी 6.53 लाख योग व निरामय शिबिरे देखील घेतली.
कोविड-19 च्या आजाराच्या काळात, आरोग्य व निरामय केंद्रांमुळे आरोग्य व्यवस्थेची लवचिकता व उपलब्धता अधोरेखित झाली. या संपूर्ण काळात या आरोग्य केंद्रांनी कोविडव्यतिरिक्त इतर आजारांसाठीच्या सर्व सेवा दिल्या, सोबतच कोविड प्रतिबंधन व व्यवस्थापनाचे काम देखील सुरु ठेवले. जानेवारी ते जून 2020 या काळात देशात आणखी 12,425 आरोग्य केंद्रे कार्यरत झाली. यामुळे देशातील एकूण आरोग्य केंद्रांची संख्या 29,365 वरून आता 41,790 इतकी झाली आहे.
कोविड व्यतिरिक्तच्या आवश्यक आरोग्य सेवा देशात सुरु राहतील, याबाबत आरोग्य केंद्रांनी महत्वाची भूमिका बजावली आहे. असंसर्गजन्य आजारांसाठीची तपासणी करताना ज्यांना गंभीर आजार आहेत, अशा व्यक्तींची यादी या केंद्रांनी तयार केली व त्या आधारे, इतर आजार असलेल्या सर्वांची कोविडविषयक तपासणी, तसेच दक्षता वेगाने घेता आली. लसीकरण सत्रे आयोजित करुन गर्भवती महिलांची तपासणी करण्यात आली. क्षयरोग, कुष्ठरोग, उच्च रक्तदाब व मधुमेहाच्या रूग्णांना आवश्यक त्या औषधांचा पुरवठा करण्यात आला.
देशातील सर्व समुदायांपर्यंत प्राथमिक आरोग्य सेवा पुरवण्यासाठी व कोरोनासारख्या जागतिक आजाराच्या आव्हानाचा सामना करण्यासाठी प्राथमिक आरोग्य व्यवस्था मजबूत व कार्यक्षम असावी लागते, अशा आरोग्य व्यवस्थेच्या उभारणीत आरोग्य व निरामय केंद्रांची भूमिका महत्वाची असल्याचे या केंद्रांनी सिध्द केले आहे.






*****
S.Pophale/R.Aghor/P.Kor
***
सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा
@PIBMumbai
/PIBMumbai
/pibmumbai
pibmumbai[at]gmail[dot]com
(रिलीज़ आईडी: 1637725)
आगंतुक पटल : 384