राष्ट्रपती कार्यालय

मानवी जीवन आणि जागतिक अर्थव्यवस्थेला घातक महामारी असताना बुद्धाचा संदेश एखाद्या दीपस्तंभाप्रमाणे मार्गदर्शन करेल, राष्ट्रपतींचे प्रतिपादन

Posted On: 04 JUL 2020 3:55PM by PIB Mumbai

 

मानवी जीवन व जागतिक अर्थव्यवस्था यांना घातक ठरणारी महामारी सध्या आहे. अशा वेळेस बुद्धाचा संदेश हा एखाद्या दीपस्तंभाप्रमाणे काम करेल, असे प्रतिपादन राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांनी केले.

आनंद प्राप्त करण्यासाठी माणसाने लोभ, मत्सर, हिंसा व इतर दुष्प्रवृत्ती पासून दूर राहायला हवे, असा उपदेश भगवान बुद्धांनी केला आहे. आपण या संदेशाच्या विपरीत वर्तन करत लोभ व हिंसा यामध्ये पूर्णपणे बुडून जात निसर्गाला अधोगतीकडे नेत आहोत, याचा मनुष्याला जराही पश्चाताप होत नाही. कोरोना विषाणूंची भीती कमी झाली की आपल्यासमोर हवामान बदलाचे गंभीर संकट उभे ठाकले आहे, याची आपल्या सर्वांना चांगलीच जाणीव आहे, असे आंतरराष्ट्रीय बुद्धिस्ट संघाने धम्मचक्र दिनाच्या निमित्ताने आज (July 4, 2020) राष्ट्रपती भवन येथे आयोजित केलेल्या आभासी कार्यक्रमात राष्ट्रपती बोलत होते.

भारताला धम्माची जन्मभूमी असल्याचा अभिमान आहे, असे राष्ट्रपतींनी सांगितले. भारतात बौद्धधर्माला उदात्त सत्याचा आधुनिक अविष्कार मानतात. बुद्धाला झालेला साक्षात्कार आणि त्यानंतर चार दशके त्यांनी दिलेली शिकवण बौद्धिक उदारमतवाद आणि धार्मिक विभिन्नता याबद्दल आदर बाळगण्याच्या भारतीय परंपरेशी सुसंगत आहे. आधुनिक कालखंडात दोन अपवादात्मक महान भारतीयांनी म्हणजेच महात्मा गांधी आणि बाबासाहेब आंबेडकर यांनी बुद्धाच्या शिकवणीपासून प्रेरणा घेत राष्ट्राच्या भविष्याची जडण-घडण केली.

बुद्धाची हाक ऐकण्यासाठी, त्याने दाखवलेल्या राजमार्गावरून चालण्यासाठी आपण उत्सुक असू तर त्यांच्या पावलावर पाऊल टाकण्याचे त्यांचे आवाहन स्वीकारले पाहिजे, असे राष्ट्रपतींनी सांगितले. जग हे दुःखांनी भरलेले आहे; मग ते दुःख थोडा काळ असो की दीर्घकाळ. अनेक राजे वा महान व्यक्ती अतिशय नैराश्याच्या वाटेवर असताना जीवनातील क्रूरतेपासून सुटका करून घेण्यासाठी बुद्धाला शरण गेल्याच्या कहाण्या आहेत. अपूर्णतेने भरलेल्या जगात दुःखांपासून मुक्ती मिळवून मोक्षाच्या प्राप्तीसाठी दुःख सहन करावे लागते, या पूर्वापारच्या समजुतीला छेद देण्यासाठी बुद्धाने आपले जीवन वेचले.

राष्ट्रपतींचा संदेश वाचण्यासाठी येथे क्लिक करा.

****

S.Pophale/V.Sahajrao/P.Kor

***

सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा@PIBMumbai   Image result for facebook icon /PIBMumbai    /pibmumbai  pibmumbai[at]gmail[dot]com


(Release ID: 1636406) Visitor Counter : 1425