पोलाद मंत्रालय

पोलाद मंत्री धर्मेंद्र प्रधान यांनी पंजाबमधल्या गोबिंदगड मंडी येथे गॅल्वनाइज्ड सळ्या तयार करण्याच्या सुविधेचा केला प्रारंभ


आत्मनिर्भर भारताच्या दिशेने एक पाऊल असा उल्लेख

Posted On: 29 JUN 2020 4:38PM by PIB Mumbai

नवी दिल्ली, 29 जून 2020

केंद्रीय पोलाद तसेच पेट्रोलियम आणि नैसर्गिक वायू मंत्री धर्मेंद्र प्रधान यांनी आज पंजाबमधल्या गोबिंदगड मंडीमध्ये माधव ॲलॉइज् या कारखान्यामध्ये ‘सीआर’ म्हणजेच ‘कंटिन्यूअस रेबार’ निर्मितीच्या सुविधेचा प्रारंभ केला.

याप्रसंगी बोलताना मंत्री प्रधान म्हणाले, ‘‘सर्वसाधारणपणे स्टील आणि विशेषतः गॅल्व्हनाइज्ड स्टील हे मजबूत, तसेच पर्यावरणाला अनुकूल साहित्य आहे. ही सामुग्री किंमतीचा विचार करता किफायतशीर आहे. पायाभूत क्षेत्राचा मोठ्या प्रमाणावर विस्तार करण्यासाठी स्टीलच्या सामुग्रीला असलेली मागणी लक्षात घेऊन या क्षेत्रात गुंतवणूक होण्याची आवश्यकता आहे. सध्या गॅल्वनाइज्ड स्टीलला असलेली मागणी आगामी काळात वाढण्याची शक्यता आहे; हे लक्षात घेऊन अखंड गॅल्वनाइज्ड सळ्यांच्या उत्पादनाची सुविधा देशामध्येच निर्माण झाली तर बांधकाम उद्योगाला त्यांचा पुरवठा करणे सोईचे ठरणार आहे. अशा प्रकारचे उत्पादन, दीर्घकाळापासून बहुप्रतीक्षेमध्ये होते. या गरजेची पूर्तता आता देशातच होऊ शकणार आहे.’’

स्टील निर्मिती क्षेत्रामध्ये देशाने स्वावलंबी झाले पाहिजे, याविषयी बोलताना धर्मेंद्र प्रधान म्हणाले, ‘‘या उत्पादन निर्मितीचा प्रारंभ करणे म्हणजे मजबूत आणि आत्मनिर्भर भारताच्या दिशेने टाकलेले एक दमदार आणि महत्वपूर्ण पाऊल आहे. बांधकाम व्यवसायासाठी लोखंडी सळ्यांची अत्यंत आवश्यकता असते. स्टील क्षेत्राचे महत्व ओळखून सळ्यांची सर्व मागणी देशांतर्गत पूर्ण करण्यावर आपण भर दिला पाहिजे, त्याचबरोबर संपूर्ण जगभरामध्ये लोखंडी सळ्यांना असलेली मागणी विचारात घेऊन निर्मिती व्यवस्थेवर लक्ष केंद्रीत करण्याची आवश्यकता आहे.’’

पोलाद मंत्रालयाने ‘डीएमआय अँड एसपी’ धोरणाविषयी उचललेली पावले, स्टील क्लस्टरची स्थापना, स्टील स्क्रॅप मोडीत घालून त्याचा फेरवापर करण्याविषयी तयार केलेले धोरण, कच्चा माल पुरवठ्याविषयी सुनिश्चितता, सुरक्षा याविषयी योजना तयार करून धोरणे आखली आहेत, त्याची माहिती देऊन सरकारच्या या उपाययोजनांमुळे स्टील सामुग्री निर्मिती क्षेत्राला अधिक चालना मिळणार, असा विश्वास  धर्मेंद्र प्रधान यांनी यावेळी व्यक्त केला.

 

S.Pophale/S.Bedekar/P.Malandkar

 

 

 

सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा@PIBMumbai   Image result for facebook icon /PIBMumbai    /pibmumbai  pibmumbai[at]gmail[dot]com


(Release ID: 1635127) Visitor Counter : 281