सुक्ष्म, लघु आणि मध्यम उदयोग मंत्रालय
सूक्ष्म लघु आणि मध्यम उद्योग मंत्रालयाने एमएसएमई उद्योगांना त्यांच्या मार्गातील अडथळे दूर करून (चॅम्पियन्स) विजेते बनण्याचा मार्ग खुला
नवीन वर्गीकरण गुंतवणुकीच्या मर्यादा वाढणार आणि उलाढालीच्या निकषाचा समावेश : यामुळे लाखो एमएसएमईच्या आशाआकांशा उंचावल्या
उद्यम म्हणून प्रवेशाच्या नियमांना आकलनापलिकडे सुलभपणा; एमएसएमईच्या नोंदणीसाठी कागदपत्रांची आवश्यकता नाही, आता त्यांना उद्यम म्हणून संबोधले जाईल
नोंदणी स्तरापासूनच सुविधेसाठी प्रभावी यंत्रणा कार्यरत
Posted On:
26 JUN 2020 8:06PM by PIB Mumbai
नवी दिल्ली, 26 जून 2020
ऐतिहासिक पाऊल, धाडसी पुढाकार आणि महत्त्वाच्या निर्णयांच्या आधारे सूक्ष्म, लघु व मध्यम उद्योग मंत्रालयाने (एमएसएमई) एमएसएमई उद्योगाचे वर्गीकरण आणि नोंदणीसाठी मार्गदर्शक तत्वांच्या स्वरूपात एक एकत्रित अधिसूचना जारी केली आहे. मंत्रालयाने गुंतवणूक आणि उलाढालीच्या आधारे एमएसएमईच्या वर्गीकरणासाठी नवीन निकाषांसह 1 जून 2020 रोजी एक अधिसूचना जारी केली होती. 1 जुलै 2020 पासून याची अंमलबजावणी केली जाईल असे देखील सांगितले होते.
त्यानुसार एमएसएमई मंत्रालयाने पुढील महिन्यापासून नवीन निकषांची अंमलबजावणी करण्याच्या दिशेने पाऊले उचलण्यास सुरुवात केली आहे. या उद्देशाने मंत्रालयाने जून महिन्यात सल्लागार समिती, आयकर, जीएसटी, राज्य सरकार आणि एमएसएमई संघाच्या विविध भागधारकांशी सल्लामसलत केली आहे.
हाच आधार घेऊन एमएसएमई मंत्रालयाने 26 जून 2020 रोजी सविस्तर अधिसूचना जारी केली आहे.
- या अधिसूचनेमध्ये एमएसएमईंचे वर्गीकरण आणि नोंदणी प्रक्रिया आणि या प्रक्रियेतील सुलभतेसाठी मंत्रालयाने केलेल्या व्यवस्थेचे तपशीलवार निकष दिले आहेत.
- या अधिसूचनेचे आणखी एक उल्लेखनीय वैशिष्ट्य म्हणजे एमएसएमईचे वर्गीकरण किंवा नोंदणी संदर्भात जारी केलेल्या पूर्वीच्या सर्व अधिसूचनांना रद्दबादल केले आहे. आता, उद्योजक, उपक्रम आणि एमएसएमई यांना वर्गीकरण किंवा नोंदणी संबंधित बाबींसाठी फक्त या सूचनेचा संदर्भ घ्यावा लागेल.
- अधिसूचनेत असेही म्हटले आहे की यापुढे (एंटरप्राइझ) उपक्रम या शब्दाच्या अधिक जवळ असल्याने, आता एमएसएमईना उद्यम म्हणून संबोधले जाईल. त्यानुसार, नोंदणी प्रक्रिया उद्यम नोंदणी म्हणून ओळखली जाईल.
- दुसऱ्या महत्त्वाच्या आणि धाडसी निर्णयामध्ये मंत्रालयाने हे देखील सूचित केले आहे:
उद्यम नोंदणीसाठी कोणतीही कागदपत्रे,प्रमाणपत्रे किंवा पुरावे अपलोड करण्याची आवश्यकता नाही स्वयंघोषणेच्या आधारे ऑनलाईन उद्यम नोंदणी करता येईल.
उद्यम नोंदणी प्रक्रिया पूर्णतः आयकर आणि जीएसटी प्रणालीसोबत एकीकृत केली आहे आणि पॅन नंबर किंवा जीएसटीआयएनच्या तपशिलाच्या आधारे भरलेल्या तपशिलाची पडताळणी केली जाऊ शकते त्यामुळे हे शक्य असल्याचे अधिकाऱ्यांनी सांगितले.
अधिसूचनेच्या इतर ठळक वैशिष्ट्यांमध्ये खालील बाबींचा समवेश आहे:
- केवळ आधार क्रमांकाच्या आधारे उद्यमाची नोंदणी केली जाऊ शकते. इतर कोणतीही कागदपत्रे सादर केल्याशिवाय स्वयंघोषणा पत्राद्वारे इतर तपशील दिले जाऊ शकतात – खऱ्या अर्थाने हा कागद रहित (पेपर लेस) उपक्रम आहे.
- पूर्वी जाहीर केल्याप्रमाणे, ‘संयत्र आणि यंत्रसामग्री किंवा उपकरण’ आणि ‘उलाढाल’ यामधील गुंतवणूक ही आता एमएसएमईच्या वर्गीकरणासाठी मूलभूत निकष आहेत;
- अधिसूचनेत हे स्पष्ट केले आहे की सूक्ष्म, लघु किंवा मध्यम असो कोणत्याही उद्योगाच्या उलाढालीची मोजणी करताना वस्तू किंवा सेवा किंवा दोन्हीची निर्यात वगळली जाईल;
- नोंदणी प्रक्रिया पोर्टलद्वारे ऑनलाईन करता येईल; नवीन व्यवस्था प्रभावी होणाऱ्या तारखेपासून म्हणजेच 1 जुलै, 2020 पूर्वी लोकांना याविषयी सूचित केले जाईल.
- एमएसएमई मंत्रालयाने एमएसएमईंसाठी एक सुलभ सुविधा यंत्रणा स्थापित केली आहे. ही प्रक्रिया जिल्हा आणि क्षेत्रीय स्तरावर एकल खिडकी प्रणालीच्या स्वरूपात राबविली जात आहे. कोणत्याही कारणास्तव उद्यम नोंदणी दाखल करू न शकलेल्या उद्योजकांना यामुळे मदत होईल. जिल्हा पातळीवर उद्योजकांना सुविधा उपलब्ध करून देण्याची जबाबदारी जिल्हा उद्योग केंद्रांना सोपविण्यात आली आहे. त्याचप्रमाणे, मंत्रालयाने नुकताच देशभरात सुरु केलेल्या (चॅम्पियन्स) उद्यम नियंत्रण कक्ष उपक्रम अशा उद्योजकांना नोंदणी आणि त्यानंतरही सुविधा पुरविण्यासाठी कायदेशीररित्या जबाबदार असेल.
- ज्या लोकांकडे वैध आधार क्रमांक नाही ते आधार नोंदणी किंवा ओळख, बँक फोटो पासबुक, मतदार ओळखपत्र, पारपत्र किंवा वाहन चालक परवान्यासह सुलभिकरणासाठी एकल खिडकी प्रणालीशी संपर्क साधू शकतात आणि आधार क्रमांक प्राप्त झाल्यानंतर एकल खिडकी प्रणाली त्यांना नोंदणी करण्यात सहाय्य करेल.
एमएसएमई मंत्री नितीन गडकरी यांनी आज नवीन मार्गदर्शक सूचना जाहीर करताना सांगितले की एमएसएमईचे वर्गीकरण, नोंदणी आणि सुलभतेची नवीन प्रणाली ही एक अत्यंत सोपी आणि तरीही वेगवान, एकसंघ आणि जागतिक स्तरावरील मानदंडांची पूर्तता करणारी प्रक्रिया असून व्यवसाय सुलभीकरणाच्या दिशेने हे एक क्रांतिकारी पाऊल असेल. ही सर्व पाऊले आणि धोरणे एक ठाम संदेश सगळ्यांपर्यंत पोहोचवत आहेत आणि तो म्हणजे सध्या अनेक आव्हानांना सामोरे जाणाऱ्या एमएसएमई उद्योगांच्या पाठीमागे मंत्रालय ठामपणे उभे आहे.
या सर्व घडामोडींबाबत मंत्रालयातील अधिकारी उत्सुक असून ते म्हणतात की ते या व्दारे मंत्रालयात एक इतिहास घडवित आहेत. मंत्रालयातील इतरांचे म्हणणे आहे की भारतीय एमएसएमईना राष्ट्रीय व आंतरराष्ट्रीय चँपियन बनविण्याच्या मंत्रालयाच्या वचनबद्धतेची पूर्तता करण्यासाठी आणि त्यांच्या मार्गातील अडथळे दूर करून आणि जागतिक बाजारपेठ काबीज करण्यासाठी हे आणखी एक महत्वपूर्ण पाऊल आहे.
G.Chippalkatti/S.Mhatre/P.Malandkar
सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा@PIBMumbai /PIBMumbai /pibmumbai pibmumbai[at]gmail[dot]com
(Release ID: 1634621)
Visitor Counter : 305