वित्त आयोग
वित्त आयोगाची आपल्या सल्लागार परिषदेसमवेत बैठक
Posted On:
26 JUN 2020 7:05PM by PIB Mumbai
नवी दिल्ली, 26 जून 2020
पंधराव्या वित्त आयोगाने 25 आणि 26 जून 2020 लाआपल्या सल्लागार परिषदेसमवेत आभासी बैठक घेऊन आयोगासमोरच्या सध्याच्या विविध मुद्य्यांवर चर्चा केली. पंधराव्या वित्त आयोगाचे अध्यक्ष एन के सिंग यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या या बैठकीला आयोगाचे सर्व सदस्य आणि वरिष्ठ अधिकारी उपस्थित होते. सल्लागार परिषदेतर्फे डॉ कृष्णमूर्ती सुब्रमणीयन, डॉ साजिद चिनॉय, डॉ प्राची मिश्रा, नीलकंठ मिश्रा, डॉ ओंकार गोस्वामी आणि विशेष आमंत्रित डॉ रथिन रॉय हे 25 जूनच्या बैठकीला उपस्थित होते.डॉ अरविंद वीरमणी,डॉ डी के श्रीवास्तव, डॉ गोविंद राव आणि डॉ सुदीप्तो मुंडले सल्लागार परिषदेकडून तसेच डॉ शंकर आचार्य आणि डॉ प्रणव सेनही 26 जूनला झालेल्या बैठकीला उपस्थित होते.
2020-21 या वर्षासाठी पंधराव्या वित्त आयोगाने आपला अहवाल सादर केल्यानंतरची सल्लागार परिषदेसमवेत झालेली ही तिसरी तर कोविड-19 महामारीच्या पार्श्वभूमीवरच्या राष्ट्रीय लॉक डाऊन काळापासूनची दुसरी बैठक आहे.
आयोगासमवेत एप्रिलमध्ये भेट झाल्यानंतर राष्ट्रीय लॉक डाऊन मे अखेरपर्यंत वाढवण्यात आला. आता निर्बंध टप्याटप्याने उठवण्यात येत असून त्यामुळे आर्थिक चक्र हळूहळू सुरु होत आहे, असे मत सल्लागार परिषदेच्या सदस्यांनी व्यक्त केले. तथापि महामारीचा अर्थव्यवस्थेवर आणि केंद्र आणि राज्य सरकारच्या वित्तीय परिस्थितीवरचा परिणाम अद्यापही मोठ्या प्रमाणात अनिश्चित आहे. अनेक विश्लेषक आणि तज्ञांनी 2020-21 साठी सकल राष्ट्रीय उत्पादन विकास अंदाज घटवला आहे. सोशल डीस्टन्सिंगच्या प्रतिबंधांमुळे आणि अनेक ठिकाणच्या स्थानिक स्तरावरच्या प्रतिबंधामुळे पुरवठा साखळी पूर्णपणे पूर्ववत झालेली नाही. अर्थव्यवस्थेत निर्माण झालेल्या अडथळ्यांमुळे केंद्र आणि राज्य सरकारच्या कर महसूल संकलनावर पडलेल्या प्रतिकूल परिणामाबाबत सल्लागार परिषदेने चर्चा केली. महामारीमुळे कर संकलनावर लक्षणीय परिणाम जाणवू शकतो याची दखल घेत परिषदेच्या काही सदस्यांनी या महामारीचा कर संकलनावरचा परिणाम विषम असेल असेही सूचित केले. सरकारी तूट आणि कर्ज यावरचे परिणाम याबाबत चर्चा झाली. आरोग्य, गरीब आणि इतर घटकांना सहाय्य यामुळे सरकारवर खर्चाचे लक्षणीय ओझे राहणार आहे.
पुढे मोठ्या प्रमाणात अनिश्चितता असल्याची भावना सल्लागार परिषदेच्या सदस्यांनी व्यक्त केली आणि पाच वर्षाच्या काळासाठी राजकोषीय हस्तांतरण आरेखनात आयोगासामोरची प्रचंड आव्हाने सदस्यांनी पूर्णपणे जाणून घेतली. शक्य तितके उत्तम मुल्यांकन करण्याच्या दृष्टीने, वित्तीय आघाडीवर समोर येणाऱ्या संकेतांवर आयोग, सल्लागार परिषदेसह बारकाईने लक्ष ठेवून आहे.
G.Chippalkatti/N.Chitale/P.Malandkar
सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा@PIBMumbai /PIBMumbai /pibmumbai pibmumbai[at]gmail[dot]com
(Release ID: 1634589)
Visitor Counter : 284