आर्थिक व्यवहार विषयक मंत्रिमंडळ समिती

म्यानमारमधील तेल आणि वायू प्रकल्पाच्या दोन ब्लॉक्सच्या विकासासाठी ओएनजीसी विदेश लिमिटेडकडून अतिरिक्त गुंतवणूकीस मंत्रिमंडळाची मान्यता

Posted On: 24 JUN 2020 6:44PM by PIB Mumbai

नवी दिल्ली, 24 जून 2020

 

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या अध्यक्षतेखालील आर्थिक व्यवहार विषयक मंत्रिमंडळ समितीने म्यानमारमध्ये श्वे ऑइल आणि गॅस प्रकल्पाच्या ए-1 आणि ए-3 या गॅस ब्लॉकच्या विकासासाठी ओएनजीसी विदेशकडून 121.27 दशलक्ष अमेरिकन डॉलरच्या (सुमारे 990 कोटी रुपये) अतिरिक्त गुंतवणूकीला मान्यता दिली आहे.

दक्षिण कोरिया, भारत आणि म्यानमारमधील कंपन्यांच्या संघाचा भाग म्हणून ओएनजीसी विदेश लिमिटेड (ओव्हीएल) 2002 पासून म्यानमारमधील श्वे प्रकल्पाच्या शोध आणि विकासाशी जोडली गेली आहे. सार्वजनिक क्षेत्रातील भारतीय उपक्रम, गेल देखील या प्रकल्पात गुंतवणूकदार आहे. या प्रकल्पात ओव्हीएलने 31 मार्च 2019 पर्यंत 722 दशलक्ष अमेरिकन डॉलर्सची गुंतवणूक केली आहे.

जुलै 2013 मध्ये श्वे प्रकल्पातून प्रथम गॅस प्राप्त झाला आणि डिसेंबर 2014 मध्ये मध्यम उत्पादन झाले. आर्थिक वर्ष 2014-15 पासून चांगल्या प्रकारे उत्पादन होत आहे.

शेजारच्या देशांमध्ये तेल आणि वायू क्षेत्रातील उत्खनन आणि  विकास प्रकल्पांमध्ये भारतीय सार्वजनिक उपक्रमांचा सहभाग हा भारताच्या अॅक्ट ईस्ट धोरणाशी जोडलेला आहे आणि जवळच्या शेजारी राष्ट्रांसमवेत उर्जा क्षेत्रात दुवा विकसित करण्याच्या भारताच्या प्रयत्नांचा तो एक भाग आहे.

 

* * *

G.Chippalkatti/S.Tupe/D.Rane

 

सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा@PIBMumbai   Image result for facebook icon /PIBMumbai    /pibmumbai  pibmumbai[at]gmail[dot]com



(Release ID: 1634002) Visitor Counter : 227