माहिती आणि प्रसारण मंत्रालय
केंद्रीय मंत्री प्रकाश जावडेकर यांच्या हस्ते कान फिल्म मार्केट 2020 मध्ये व्हर्चुअल इंडिया पॅव्हिलियनचे उद्घाटन
Posted On:
22 JUN 2020 10:32PM by PIB Mumbai
माहिती आणि प्रसारणमंत्री प्रकाश जावडेकर यांच्या हस्ते आज व्हर्चुअल इंडिया पॅव्हिलियनच्या ई- उद्घाटनाने कान चित्रपट महोत्सव-2020 मधील भारतीय सहभागाची सुरूवात झाली. 22 ते 26 जून 2020 या काळात या महोत्सवाचे आयोजन करण्यात आले आहे.
आपल्या पंतप्रधानांनी म्हटल्याप्रमाणे ज्या काळात मानवतेला एका सामाईक आव्हानाला तोंड द्यावे लागत आहे त्या काळात एकजूट आणि प्रतिरोध यांचा आदर्श कान फिल्म मार्केटच्या व्हर्चुअल आवृत्तीने निर्माण केला आहे.
जगभरातील चित्रपट समुदाय आणि चित्रपट रसिकांना संबोधित करताना केंद्रीय मंत्री म्हणाले की आता व्हर्चुअल उद्घाटने नवी सर्वसामान्य बाब ठरणार आहे आणि हे आभासी अवकाश आता वास्तविक भागीदाऱ्यांचे नवे स्थान म्हणून उदयाला येणार आहे. चित्रपट ही भारताची सॉफ्ट पॉवर म्हणजेच वेगळ्या प्रकारचे सामर्थ्य आहे आणि चित्रपट सुविधा कार्यालयाला केंद्र आणि राज्य सरकारांच्या सर्व प्रकारच्या परवानग्यांसाठी एक खिडकी केंद्र बनवण्यात येणार आहे. आंतरराष्ट्रीय समुदायाला भारतात येऊन चित्रिकरण करण्याचे आणि जागतिक बाजारात या चित्रपटांचे वितरण करण्याचे आवाहन त्यांनी केले. भारतातून कान चित्रपट महोत्सवाला पाठवण्यात आलेले दोन चित्रपट जागतिक पातळीवर प्रशंसा प्राप्त करतील, अशी अपेक्षा जावडेकर यांनी व्यक्त केली.
कान चित्रपट महोत्सवातील इंडियन पॅव्हिलियन हे नेहमीच विविध घडामोडींचे केंद्र ठरले आहे. याच ठिकाणी भारतीय चित्रपट निर्माते आणि प्रतिनिधींची आंतरराष्ट्रीय समुदायाशी चर्चा होत असते. या समुदायाला भारतीय चित्रपटांचे रंग, गंध यांची अनुभूती मिळते आणि भारतीय चित्रपट निर्मात्यांसोबत काम करण्याच्या आणि अनेक प्रकारच्या वैशिष्ट्यांनी परिपूर्ण ठिकाणे आणि लोक असलेल्या अतुल्य भारतामध्ये चित्रिकरण करण्याच्या संधींचा शोध हा समुदाय घेत असतो.
यावर्षी देखील एका नव्या परिस्थितीचा स्वीकार करत आणि या प्रतिष्ठेच्या चित्रपट महोत्सवात भारतीय सहभागाचे महत्त्व कायम राखत इंडियन पॅव्हिलियनमध्ये सहनिर्मिती आणि भारतातील चित्रिकरणाच्या संधी, भारतीय चित्रपट आणि संबंधित घटकांची निर्यात, भारतातील निर्मिती पश्चात घडामोडी आणि प्रतिनिधींमध्ये फलदायी संबंध याविषयीच्या घडामोडींची गजबज राहाण्याची अपेक्षा आहे.
यावर्षीच्या सहभागामध्ये पहिल्यांदाच दोन गोष्टींचा समावेश करण्यात आला आहे. भारतीय पॅव्हिलियनमध्ये माईघाटः क्राईम नंबर 103/2005 (मराठी) आणि हेलारो(गुजराती) या दोन्ही राष्ट्रीय चित्रपट पुरस्कार विजेत्या चित्रपटांचे प्रदर्शन करण्यात येत आहे. त्याशिवाय महान चित्रपट दिग्दर्शक सत्यजित रे यांच्या पुढील वर्षी असलेल्या जन्मशताब्दी वर्षाचे औचित्य साधून त्यांच्या काही चित्रपटांचे आणि संगीत आणि माहितीपटांचे प्रदर्शन देखील इंडियन पॅव्हेलियन आपल्या वेबसाईटवर प्रदर्शन करणार आहे.भारतातील चित्रिकरण आणि सहनिर्मितीचा अनुभव असलेल्या दिग्दर्शकांची माहिती या वेबसाईटवर असेल. तसेच आंतरराष्ट्रीय प्रसारमाध्यमे आणि मनोरंजन उद्योगाशी संबंध प्रस्थापित करण्यामध्ये स्वारस्य असलेल्या निर्मात्यांची यादी देखील वेबसाईटवर उपलब्ध असेल.
इंडिया पॅव्हिलियन भारत आणि भारतीय चित्रपट याविषयीची माहिती जागतिक चित्रपट समुदायामध्ये प्रसिद्ध करणाऱ्या माहितीचे केंद्र बनेल, असे त्यांनी सांगितले. हे पॅव्हिलियन व्यावसायिक बैठकांचे आणि चित्रपट निर्माते आणि इतर प्रसारमाध्यमे आणि मनोरंजन उद्योगातील संबंधित यांचा परस्परांशी संवाद घडवून आणणारे एक दालन बनेल.
प्रसारमाध्यमे आणि मनोरंजन उद्योगातील संबंधित, विविध मान्यवर आणि वरिष्ठ सरकारी अधिकारी व्हर्चुअल इंडिया पॅव्हिलियनच्या उद्घाटन कार्यक्रमाला उपस्थित होते. माहिती आणि प्रसारण सचिव अमित खरे, माहिती आणि प्रसारण मंत्रालयाचे अतिरिक्त सचिव अतुल कुमार तिवारी, माहिती आणि प्रसारण मंत्रालय संयुक्त सचिव( चित्रपट) आणि एनएफडीसीच्या व्यवस्थापकीय संचालक श्रीमती टीसीए कल्याणी, फ्रान्समधील भारतीय दुतावासातील (कौन्स्युलर) मंत्री श्रीला दत्ता कुमार, सीबीएफसीचे अध्यक्ष प्रसून जोशी, राष्ट्रीय चित्रपट पुरस्कार विजेते दिग्दर्शक मधुर भांडारकर, ऍक्टिव तेलगू फिल्म मेकर्स गिल्ड राष्ट्रीय प्रतिनिधी डी सुरेश बाबू, स्पेशल ट्रीट्स प्रॉडक्शन्सचे कॉलिन बरो, चित्रपट अभिनेत्री कंगना राणावत, माई घाट चित्रपटातील अभिनेत्री उषा जाधव या मान्यवरांचा त्यात समावेश होता.
या महोत्सवात व्हर्चुअल माध्यमातून परस्परांशी संवाद घडवून आणणाऱ्या बैठकांव्यतिरिक्त दर दिवशी प्रसारमाध्यमे आणि मनोरंजन उद्योगातील विविध पैलूंबाबत जगभरातील तज्ञांची गोलमेज चर्चासत्रे आयोजित होणार आहेत. या पॅव्हिलियनची वेबसाईट www.indiaatcannes.in आणि www.marchedufilms.com या ठिकाणी पाहता येईल. 2000 पेक्षा जास्त लोकांनी आजच्या व्हर्चुअल उद्घाटन सोहळ्याचा आनंद घेतला.
(Release ID: 1633473)
Visitor Counter : 253