शिक्षण मंत्रालय
राष्ट्रीय चाचणी संस्थेने (एनटीए) राष्ट्रीय चाचणी अभ्यास मोबाईल अॅपवर हिंदी परीक्षा फीचरची केली सुरुवात
नवीन सुविधा हिंदी माध्यमाच्या विद्यार्थ्यांना जेईई मुख्य परिक्षेसाठी हिंदीमध्ये चाचणी सराव करण्यास मदत करेल - रमेश पोखरियाल 'निशंक'
9.56 लाखाहून अधिक विद्यार्थ्यांनी राष्ट्रीय चाचणी अभ्यास अॅप डाऊनलोड केले असून या अॅपवर विद्यार्थ्यांमार्फत 16.5 लाखाहून अधिक चाचण्या देण्यात आल्या आहेत - मनुष्यबळ विकास मंत्री
Posted On:
21 JUN 2020 6:40PM by PIB Mumbai
नवी दिल्ली, 21 जून 2020
केंद्रीय मनुष्यबळ विकास मंत्री रमेश पोखरियाल 'निशंक' यांनी आज जाहीर केले की राष्ट्रीय चाचणी संस्थेने (एनटीए) राष्ट्रीय परीक्षा अभ्यास मोबाईल अॅपवर हिंदी चाचणी फीचर सुरू केले आहे. ते म्हणाले की, हिंदी भाषेला प्राधान्य देणारे स्पर्धा परीक्षार्थी आता एनटीएमार्फत राष्ट्रीय चाचणी अभ्यासाच्या स्मार्टफोन अॅपवर जारी केलेल्या हिंदी चाचणी सराव सुविधेचा वापर करून त्यांच्या मोबाइलवरून सराव करू शकतात
डॉ. रमेश पोखरियाल निशंक यांनी सांगितले की, अभियांत्रिकी व वैद्यकीय प्रवेश परीक्षेसाठी विद्यार्थ्यांना त्यांच्या घरातूनच सक्षम बनविण्यासाठी गेल्या महिन्यात जेईई मेन, नीट सारख्या स्पर्धा परीक्षा घेणाऱ्या राष्ट्रीय चाचणी संस्थेने (एनटीए) आपले कृत्रिम बुद्धिमत्ता (एआय) आधारित शक्तीशाली स्मार्टफोन अॅप सुरू केले आहे. आत्तापर्यंत या अॅपवर विद्यार्थ्यांमार्फत 16.5 लाखाहून अधिक चाचण्या देण्यात आल्या असून 9.56 लाखाहून अधिक विद्यार्थ्यांनी हे अॅप डाऊनलोड केले आहे.
हिंदी माध्यमांना प्राधान्य देणारे विद्यार्थी त्यांच्या तयारीत मदत करण्यासाठी हिंदी भाषेत प्रश्नपत्रिका सुरू करण्याची विनंती करत होते. हे लक्षात घेऊन एनटीएने अॅपमध्ये हे वैशिष्ट्य सुरु केले आहे. आता हिंदी भाषेतील उमेदवार या स्पर्धा परीक्षांसाठी हिंदीमध्ये सराव किंवा मॉक टेस्ट देण्यास सक्षम असतील. हिंदी आवृत्ती ही भारतभरातील विद्यार्थ्यांसाठी एक वरदान आहे. प्रवेश परीक्षेच्या तयारीसाठी आता बर्याच विद्यार्थ्यांद्वारे याचा निश्चित वापर करता येईल.
ज्या विद्यार्थ्यांनी आधीच अॅप डाउनलोड केले आहे ते लगेचच हिंदीमध्ये मॉक टेस्ट सरावाला प्रारंभ करू शकतात किंवा त्यांच्याकडे अॅप नसल्यास ते गुगल प्ले स्टोअर वरून विनामूल्य डाउनलोड केले जाऊ शकते. अॅपची नवीनतम आवृत्ती इंग्रजी आणि हिंदी या दोन्ही भाषांमध्ये नेव्हिगेशन, सूचना, चांचणी घेणे आणि विश्लेषण या सुविधा प्रदान करते. एकदा अॅप त्यांच्या स्मार्टफोन किंवा टॅब्लेटवर डाउनलोड झाल्यानंतर, विद्यार्थ्यांनी त्यांच्या तपशीलांसह साइन अप करणे आवश्यक आहे आणि त्यानंतर ते हिंदीला त्यांची भाषा पसंती म्हणून निवडू शकतात आणि त्यांच्या निवडलेल्या परीक्षेसाठी हिंदी भाषेत मॉक टेस्ट देण्यास सुरुवात करू शकतात.
इंग्रजी भाषेतील अनुभवाप्रमाणेच, दररोज, एनटीएद्वारे अॅपवर हिंदीमध्ये एक नवीन चाचणी जारी केली जाईल जी विद्यार्थी त्यांच्या सरावासाठी डाउनलोड करू शकतात. ते या चाचण्यांचा सराव ऑफलाइन करू शकतात, जेव्हा त्यांचा मोबाईल ‘एअरप्लेन’ मोडवर असेल आणि सोडवलेला पेपर सबमिट करण्यासाठी आणि त्याचा निकाल पाहण्यासाठी त्यांना पुन्हा एकदा ऑनलाइन जावे लागेल. जेईई मेन, नीट आणि इतर परीक्षांसाठीची सराव चाचणी यादी लवकरच उपलब्ध असेल. तसेच विद्यार्थ्यांना या चांचण्यांचा घरातूनच सराव करता येतील आणि चांचणी परीक्षेचा सविस्तर निकाल त्वरित पाहता येईल व त्याबरोबर त्यांनी सोडवलेल्या पेपरचे सविस्तर विश्लेषणही त्यांच्या प्राधान्यक्रमानुसार हिंदी किंवा इंग्रजीमध्ये मिळेल.
* * *
G.Chippalkatti/V.Joshi/D.Rane
सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा@PIBMumbai /PIBMumbai /pibmumbai pibmumbai[at]gmail[dot]com
(Release ID: 1633210)
Visitor Counter : 209