Posted On:
19 JUN 2020 6:13PM by PIB Mumbai
कोविड-19 विरोधात लढण्यासाठी क्षमतेत वाढ करण्यासाठी भारतीय रेल्वेने 5231 बिगर वातानुकूलीत डब्यांचे रुपांतर आरोग्य आणि कुटुंब कल्याण मंत्रालयाने संशयित आणि पुष्टी झालेल्या कोविड-19 रुग्णाच्या व्यवस्थापनासंदर्भात प्रसिद्ध केलेल्या निर्देशांनुसार कोविड केअर सेंटरच्या पातळीच्या अलगीकरण सुविधांमध्ये केले आहे.
या सुविधा म्हणजे केंद्रीय आरोग्य आणि कुटुंब कल्याण मंत्रालय आणि नीती आयोग यांनी तयार केलेल्या एकात्मिक कोविड योजनेचा एक भाग आहे आणि सामान्यतः राज्यांच्या सुविधा जेव्हा पूर्णपणे भरून जातील त्यावेळी यांचा वापर करणे अपेक्षित आहे.
या निर्देशांमध्ये असे नमूद करण्यात आले होते की, या सुविधांमध्ये पुरेशा प्रमाणात खेळती हवा आणि नैसर्गिक प्रकाश असावा. जर वातानुकूलनाची सुविधा उपलब्ध करण्यात आली असेल तर ही सुविधा डक्टिंगविरहित असावी. रेल्वेच्या वातानुकूलीत डब्यांमध्ये ही रचना नसल्याने त्यांचा वापर करता येत नाही.
या डब्यांचे रुपांतर कोविड रुग्णांसाठी करण्यापूर्वी वातानुकूलीत आणि बिगर वातानुकूलीत डब्याच्या वापराच्या मुद्द्यावर नीती आयोग आणि आरोग्य आणि कुटुंब कल्याण मंत्रालयाशी चर्चा झाली. वातानुकूलीत डब्यांच्या डक्टिंगमधून कोविड-19च्या विषाणूच्या संक्रमणाचा संभाव्य धोका लक्षात घेऊन आणि या रुग्णांना विषाणूविरोधात लढण्यासाठी सभोवताली असलेले जास्त तापमान आणि खेळती हवा उपयुक्त ठरत असल्याचे मानले जात असल्याने वातानुकूलीत डबे कोविड सुविधा केंद्रासाठी अयोग्य असल्याबाबत सहमती व्यक्त करण्यात आली.
अधिकारप्राप्त गट दोनने दिलेल्या निर्देशांनुसार आणि त्यांच्या विचारानुसार कोविड केअर सेंटर म्हणून काम करणारे हे अलगीकरण डबे केवळ ज्यांना वैद्यकीय दृष्ट्या सौम्य किंवा अतिसौम्य म्हणून घोषित करण्यात आले आहे, त्यांच्यासाठीच उपयुक्त असतील. अशा प्रकारची प्रत्येक अलगीकरण ट्रेन/ कोविड केअर सेंटर एक किंवा एकापेक्षा जास्त कोविड आरोग्य केंद्र आणि किमान एका समर्पित कोविड रुग्णालयाशी जोडलेले असले पाहिजे. जेणेकरून या रुग्णांची प्रकृती खालावू लागल्यास त्यांना या अलगीकरण डब्यातून तातडीने त्या केंद्रांवर हलवता येऊ शकेल.
केंद्रीय आरोग्य आणि कुटुंब कल्याण मंत्रालयाने कोविड ट्रेनबाबत तयार केलेल्या सूचनेनुसार, जिथे ही ट्रेन उभी असेल त्या फलाटाच्या शेजारी असलेल्या फलाटावर आकस्मिक श्वासोच्छवास सहाय्यक प्रणाली उभारली पाहिजे.
ही ट्रेन जिथे उभी असेल त्या फलाटावर ट्रेनच्या शेवटी कपडे बदलण्याची सुविधा उपलब्ध असली पाहिजे. कायमस्वरुपी व्यवस्थेच्या स्वरुपात ती उपलब्ध नसली तर ती तात्पुरत्या व्यवस्थेच्या स्वरुपात उपलब्ध केली पाहिजे.
ज्यावेळी राज्यांच्या सर्व सुविधा संपतील त्यावेळी या डब्यांचा वापर करावा असा सल्ला देण्यात आला होता आणि या डब्यांची गरज जुलैच्या मध्यावर जेंव्हा या विषाणूचा फैलाव सर्वोच्च पातळीवर पोहोचेल त्यावेळी भासेल असा अंदाज व्यक्त करण्यात आला होता.
वातानुकूलीत डब्यांमधून विषाणू संक्रमणाची भीती आहे, त्यामुळे हे डबे या सुविधांसाठी वापरता येत नसल्याने आणि कोविड वरील उपचारांसाठी जास्त तापमान आणि खेळती हवा असलेला कक्ष उपयुक्त ठरत असल्याचे लक्षात घेऊनच अधिकारप्राप्त गटाने बिगर वातानुकूलित डब्यांचे रुपांत कोविड केअर सेंटरमध्ये करण्याचा निर्णय घेतला होता याचा पुनरुच्चार करण्यात येत आहे.
या डब्यांचे रुपांतर कोविड रुग्णांसाठी करण्यापूर्वी वातानुकूलित आणि बिगर वातानुकूलित डब्यांच्या मुद्द्यावर नीती आयोग आणि केंद्रीय आरोग्य आणि कुटुंब कल्याण मंत्रालयाशी चर्चा करण्यात आली होती.
वातानुकूलीत डब्यांच्या डक्टिंगमधून कोविड-19च्या विषाणूच्या संक्रमणाचा संभाव्य धोका लक्षात घेऊन आणि सामान्यतः या विषाणूविरोधात लढण्यासाठी सभोवताली असलेले जास्त तापमान आणि उघड्या खिडक्यांद्वारे मिळणारी खेळती हवा रुग्णांना उपयुक्त ठरत असल्याचे मानले जात असल्याने वातानुकूलीत डबे कोविड सुविधा केंद्रासाठी अयोग्य असल्याबाबत सहमती व्यक्त करण्यात आली.
बिगर वातानुकूलित डब्यांच्या खिडक्या जर बंद ठेवल्या तर जूनच्या मध्यावर हे डबे काहीसे उबदार असतील आणि सभोवतालचे तापमान 43 अंश सेल्सियसच्या आसपास असेल. पण एकदा या डब्यांच्या खिडक्यांवर मच्छरदाणी बसवली आणि खिडक्या उघड्या ठेवल्या तर हवा खेळती राहिल्याने तापमानात सुधारणा होण्याची अपेक्षा आहे. यात एक बाब लक्षात घेतली पाहिजे की हे तापमान देखील तात्पुरते असेल कारण मान्सूनचे आगमन झाल्याने पावसामुळे दिलासा मिळेल.
डब्यांच्या आतमध्ये उन्हाळ्यात निर्माण झालेल्या उष्णतेची समस्या हाताळण्यासाठी एका बहुआयामी धोरणाचा अंगीकार करण्यात येत आहे ज्यामुळे रुग्ण आणि कर्मचाऱ्यांना आराम मिळू शकेल.
त्यासाठी खालील पावले उचलण्यात येत आहेत:-
1. आच्छादन( पांढरी कनात) किंवा योग्य सामग्रीचा वापर करून त्याचे छत फलाटावर उभ्या असलेल्या अलगीकरण डब्यांवर उभारण्यात येईल. यामुळे बाहेरील उष्णतेपासून संरक्षक स्तर म्हणून हे छत काम करेल.
2. डब्यांच्या भोवती बबल रॅप फिल्म लपेटली जात आहे. यामुळे डब्यातील तापमानात 1°C ने कमी होते.
3. डब्यांच्या छतावर उष्णता परावर्तक रंग: अलगीकरण डब्यांचे छत उष्णता परावर्तक रंगाने रंगवून तापमान कमी करण्याचा प्रयोग उत्तर रेल्वेने केला होता. या प्रयोगाच्या वेळी डब्याच्या आतल्या भागातील तापमान 2.2°C पर्यंत कमी होत असल्याचे आढळले होते.
4. आयआयटी मुंबईने विकसित केलेल्या आणखी एका थराचा वापर करण्याच्या चाचण्या देखील सुरू आहेत. 20/6/2020 रोजी ही चाचणी होणार आहे आणि त्याच्या निष्कर्षांची नोंद करण्यात येईल. उष्णता परावर्तक रंगाने डब्यांचे छत रंगवण्याची किंवा तापमान कमी करणाऱ्या बांबूच्या चटयांचे आच्छादन करण्याची व्यवस्था देखील करण्यात येत आहे.
5. डब्यांच्या आता पोर्टेबल कूलर्स ठेवण्याची चाचणी घेतली जात आहे. या कूलरनी तापमानात सुमारे 3°C पर्यंत घट होत असल्याचे आढळले.
6. सध्याच्या कोरड्या वातावरणात जल बाष्प प्रणालीचा वापर करण्याचा देखील प्रयत्न केला जात आहे. परिणामस्वरुप तापमानामुळे रुग्णांना आणखी जास्त आराम मिळेल अशी अपेक्षा व्यक्त करण्यात येत आहे.
यामध्ये ही बाब आवर्जून लक्षात घेतली पाहिजे की रेल्वे राज्यांना एक सेवा पुरवठादार म्हणून केंद्रीय आरोग्य आणि कुटुंब कल्याण मंत्रालयाच्या निर्देशांनुसार तयार केलेले हे डबे उपलब्ध करून देत आहे. जेंव्हा कोविड रुग्णांना अलगीकरणात ठेवण्याच्या सर्व सुविधा संपुष्टात येतील तेव्हा राज्यांनी आकस्मिक उपाययोजना म्हणून या डब्यांचा वापर करायचा आहे. अशा प्रकारच्या कोणत्याही आकस्मिक स्थितीसाठी 5000 पेक्षा जास्त डबे सज्ज ठेवण्यात आले आहेत.
***
S.Thakur/S.Patil/P.Kor
***
सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा@PIBMumbai /PIBMumbai /pibmumbai pibmumbai[at]gmail[dot]com