संरक्षण मंत्रालय

भारतीय नौदलाच्या पूर्व कमांडची धुरा नव्या प्रमुखांकडे

Posted On: 12 JUN 2020 8:18PM by PIB Mumbai

नवी दिल्ली, 12 जून 2020


वाईस ऍडमिरल बिस्वजीत दासगुप्ता एव्हीएसएम, वायएसएम, व्हीएसएम यांनी आज  भारतीय नौदलाच्या विशाखापट्टणम येथील पूर्व कमांडची धुरा स्वीकारली. मावळते पूर्व कमांड प्रमुख वाईस ऍडमिरल एस एन घोरमाडे  नौदलाच्या नवी दिल्ली येथील एकात्मिक मुख्यालयात कार्मिक सेवा नियंत्रक म्हणून बदलीवर रवाना झाले आहेत.

वाईस ऍडमिरल बिस्वजित दासगुप्ता राष्ट्रीय संरक्षण प्रबोधिनीचे माजी विद्यार्थी आहेत. भारतीय नौदलाच्या सेवेत ते 1985 साली दाखल झाले आणि ते दिशादर्शन आणि संचालन तज्ञ आहेत.

त्यांनी क्षेपणास्त्र सज्ज आयएनएस निशंक, आयएनएस कर्मुक सह स्टेल्थ विनाशिका आयएनएस तबर आणि विमानवाहू युद्धनौका आयएनएस विराट या चार महत्त्वाच्या जहाजांची जबाबदारी सांभाळली असुन त्यांनी परिचालन, प्रशिक्षण आणि कर्मचारी नियुक्तीचे कामही पाहिले आहे.

या नियुक्तींमध्ये भारतीय नौदलाच्या कोची येथील वर्क अप टीम च्या मुख्यालयात कमांडर वर्क अप. संरक्षण सेवा कर्मचारी महाविद्यालयातील( वेलिंग्टन) डायरेक्टिंग स्टाफ, नौदलाच्या नेव्हीगेशन अँड डायरेक्शन स्कूलचे प्रमुख, नौदलप्रमुखांचे नौदल सहाय्यक आणि वेस्टर्न फ्लीटचे फ्लीट ऑपरेशन्स ऑफिसर यांचा समावेश आहे.

त्यांची फ्लॅग रँकमध्ये पदोन्नती होऊन मुंबई येथील नौदलाच्या पश्चिम कमांडचे चीफ स्टाफ ऑफिसर(ऑपरेशन्स) म्हणून नियुक्ती झाली होती. 2017-18 मध्ये त्यांनी विशाखापट्टणम येथील प्रतिष्ठेच्या इस्टर्न फ्लीटचे नेतृत्व केले होते आणि त्यानंतर नवी दिल्ली येथील एनसीसी मुख्यालयात अतिरिक्त महासंचालक म्हणून नियुक्ती झाली होती. वाईस ऍडमिरल श्रेणीत पदोन्नती झाल्यावर आणि विशाखापट्टणम येथील नौदलाच्या पूर्व कमांडचे प्रमुख म्हणून नियुक्ती होण्यापूर्वी ते नवी दिल्ली येथील संरक्षण मंत्रालयाच्या(नौदल) एकात्मिक मुख्यालयात कार्मिक सेवा नियंत्रक म्हणून कार्यरत होते.

वाईस ऍडमिरल बिस्वजीत दासगुप्ता डिफेन्स सर्विसेस कमांड अँड स्टाफ कॉलेज, बांगलादेश, आर्मी वॉर कॉलेज, महु आणि नवी दिल्लीच्या डिफेन्स कॉलेजचे पदवीधर आहेत.

हे ध्वज अधिकारी संरक्षण सेवेतील उल्लेखनीय कामगिरी साठी दिल्या जाणाऱ्या अतिविशिष्ट सेवा पदक आणि विशिष्ट सेवा पदकाचे मानकरी आहेत. 2015 मध्ये अंतर्गत बंडाळी झालेल्या येमेनमध्ये ऑपरेशन राहत अंतर्गत बचाव कार्यात मोलाचे योगदान दिल्याबद्दल त्यांना युद्धसेवा पदक देऊन देखील सन्मानित करण्यात आले आहे.


* * *

B.Gokhale/S.Patil/D.Rane


 

 

सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा@PIBMumbai   Image result for facebook icon /PIBMumbai    /pibmumbai  pibmumbai[at]gmail[dot]com



(Release ID: 1631225) Visitor Counter : 200