कृषी मंत्रालय
केंद्रीय कृषी आणि शेतकरी कल्याण मंत्री नरेंद्र सिंह तोमर यांनी सहकार मित्र ही राष्ट्रीय सहकार विकास महामंडळाच्या पुढाकाराने प्रशिक्षणार्थी कार्यक्रमावरील योजना सुरू केली
सहकार मित्र योजना सहकारी संस्थांना तरुण व्यावसायिकांच्या नवीन आणि नाविन्यपूर्ण कल्पना जाणून घ्यायला मदत करेल तर प्रशिक्षणार्थींना आत्मनिर्भर होण्यासाठी प्रत्यक्ष काम करण्याचा अनुभव मिळेल
Posted On:
12 JUN 2020 5:30PM by PIB Mumbai
नवी दिल्ली, 12 जून 2020
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी स्थानिक उत्पादनाच्या (लोकल फॉर व्होकल) महत्वावर भर देत केलेल्या ‘आत्मनिर्भर भारत’ च्या आवाहनाच्या अनुषंगाने केंद्रीय कृषी आणि शेतकरी कल्याण मंत्री नरेंद्र सिंह तोमर यांनी काल सहकार मित्र: प्रशिक्षणार्थी कार्यक्रम योजनेची सुरूवात केली. या योजनेची सुरूवात करताना तोमर म्हणाले की, राष्ट्रीय सहकारी विकास महामंडळ, एनसीडीसी या विशिष्ट सहकारी क्षेत्र विकास वित्त संस्थेने क्षमता विकासाद्वारे सहकारी क्षेत्रातील उद्योजकता विकास परिसंस्थेत अनेक उपक्रम राबविले आहेत, तरुणांना इंटर्नशिप दिली आहे आणि स्टार्ट-अप सुरु करु इच्छिणाऱ्या तरुणांना उदारीकृत अटींवर प्रकल्प कर्जाची हमी दिली आहे.
तोमर म्हणाले की, एनसीडीसी सहकारी क्षेत्रासाठी नाविन्यपूर्ण उपाययोजना देण्यात सक्रिय आहे. एनसीडीसीच्या पुढाकाराने सहकार मित्र ही इंटर्नशिप कार्यक्रमावरची (एसआयपी) नवीन योजना युवा व्यावसायिकांना एनसीडीसी आणि सहकारी संस्थांच्या कामकाजातून व्यावहारिक ज्ञान आणि शिकण्याची संधी प्रदान करेल. स्टार्ट-अप सहकारी उद्यमांना प्रोत्साहन देण्यासाठी एनसीडीसीने पूरक योजना देखील सुरू केली आहे. सहकार मित्र शैक्षणिक संस्थांमधील व्यावसायिकांना शेतकरी उत्पादक संघटना (एफपीओ) सारख्या सहकारी संस्थांच्या माध्यमातून नेतृत्व आणि उद्यमशीलता भूमिका विकसित करण्याची संधी प्रदान करेल.
सहकार मित्र योजनेतून सहकारी संस्थांना युवा व्यावसायिकांच्या नवीन आणि नाविन्यपूर्ण कल्पना जाणून घेणे अपेक्षित आहे. तर, प्रशिक्षणार्थीना आत्मनिर्भर बनण्यासाठी प्रत्यक्ष कामाच्या अनुभवातून आत्मविश्वास मिळतो. सहकारी आणि तरुण व्यावसायिक दोघांनाही समाधन संधी अपेक्षित आहे.
या योजनेंतर्गत कृषी आणि संलग्न क्षेत्र, माहिती तंत्रज्ञान इत्यादी शाखांमधील व्यावसायिक पदवीधर इंटर्नशिपसाठी पात्र असतील. शेती-व्यवसाय, सहकार, वित्त, आंतरराष्ट्रीय व्यापार, वनीकरण, ग्रामीण विकास, प्रकल्प व्यवस्थापक यामध्ये व्यवस्थापनाची पदवी घेत असलेले किंवा पदवी पूर्ण केलेले व्यावसायिक देखील पात्र असतील.
एनसीडीसीने सहकार मित्र पेड इंटर्नशिप कार्यक्रमासाठी निधी राखून ठेवला आहे ज्या अंतर्गत प्रत्येक प्रशिक्षणार्थीला 4 महिन्यांसाठी आर्थिक सहाय्य मिळेल. केंद्रीय कृषी आणि शेतकरी कल्याण मंत्र्यांनी एनसीडीसी संकेतस्थळावर इंटर्नशिप अर्जासाठी ऑनलाईन अर्ज पोर्टलही सुरू केले.
* * *
S.Thakur/S.Kane/D.Rane
सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा@PIBMumbai /PIBMumbai /pibmumbai pibmumbai[at]gmail[dot]com
(Release ID: 1631157)
Visitor Counter : 352