विज्ञान आणि तंत्रज्ञान मंत्रालय

कोविड-19 च्या विरोधात लढा देण्यासाठी केरळ येथील स्टार्ट अपने ‘एससीटीआयएमएसटी’च्या मदतीने वापरलेल्या मास्कची विल्हेवाट लावण्यासाठी आयओटीवर आधारित ‘स्मार्ट बास्केट’ आणि अतिनिल किरणांवर आधारीत निर्जंतुकीकरण साधनाची निर्मिती

Posted On: 11 JUN 2020 10:50PM by PIB Mumbai

नवी दिल्ली, 11 जून 2020

 

केरळमधल्या कोचीन इथल्या व्हीएसटी मोबिलीटी सोल्यूशन्स या उद्योगाने वापरलेल्या मास्कची विल्हेवाट लावण्यासाठी स्वयंचलित यंत्राची निर्मिती केली आहे. संपूर्ण जगामध्ये कोविड-19 महामारीचा उद्रेक झाला असल्यामुळे यासंबंधित आवश्यक असणा-या विविध उत्पादनांची निर्मिती करून कोरोना विरुद्धचा लढा तीव्र करण्याची गरज सध्या आहे. अशा प्रयत्नांचा एक भाग म्हणून या यंत्राची निर्मिती करण्यात आली आहे. ‘एससीटीआयएमएसटी’ म्हणजेच श्री चित्रा तिरूनल इन्स्टिीट्यूट फॉर मेडिकल सायन्स अँड टेक्नॉलॉजी या त्रिवेंद्रमच्या संस्थेने वापरलेल्या मास्कची विल्हेवाट लावण्यासाठी ‘चित्रायूव्ही’ तंत्रज्ञानाच्या आधारे ही बास्केट विकसित केली आहे. त्याला ‘बिन-19’ असे नाव देण्यात आले आहे. केंद्र सरकारच्या विज्ञान आणि तंत्रज्ञान विभागांतर्गत त्रिवेंद्रमची ‘एससीटीआयएमएसटी’ संस्था कार्यरत आहे. संशोधनामध्ये या संस्थेमध्ये महत्वपूर्ण काम सुरू असल्यामुळे राष्ट्रीय दृष्टीने ही संस्था महत्वाची मानली जाते. एर्नाकुलमचे जिल्हाधिकारी एस सुहास यांनी आपल्या जिल्हा प्रशासकीय मुख्यालयामध्ये डीएसटीच्या एका शाखेची स्थापना करून ‘बिन-19 च्या निर्मितीच्या कामाचा औपचारिक शुभारंभ केला.

आयओटी म्हणजेच इंटरनेट ऑफ थिंग्सच्या आधारे बिन-19 चा उपयोग वापरलेले मास्क एकत्रित करून त्यांचे निर्जंतुकीकरण करण्यासाठी होत आहे. हे साधन श्री चित्रा प्रयोगशाळेने यशस्वी परीक्षण केल्यानंतर वापरण्यास प्रारंभ केला आहे. यासाठी प्रयोगशाळेमध्ये सूक्ष्मजीवशास्त्रविषयक चाचण्यांच्या मालिकेतून प्रयोगाची तपासणी करण्यात आली. श्री चित्रा प्रयोगशाळा ही भारतीय वैद्यकीय  संशोधन परिषदेच्या (आयसीएमआर) दिशानिर्देशानुसार कार्य करणारी संस्था आहे. यामध्ये यूव्ही आधारित उपकरणांचे परीक्षण केले जाते.

बिन- 19 आणि यूव्ही स्पॉट या दोन उपकरणाच्या वापराला प्रारंभ करताना जिल्हाधिकारी एस सुहास म्हणाले, ‘‘अशा प्रकारची सुविधा केरळमध्ये पहिल्यांदाच उपलब्ध करून दिली जात आहे. या दोन्ही साधनांमुळे कोविड-19 ला हद्दपार करण्यासाठी मदत मिळणार आहे. त्याचबरोबर पर्यावरणाला हानी पोहोचू नये, यासाठी ही दोन्ही साधने उपयोगी ठरणार आहेत’’. 

व्हीएसटीच्यावतीने विकसित करण्यात आलेल्या बिन-19 आणि कीटाणूशोधन प्रणाली साधनांचा उपयोग प्रत्यक्षात करण्याला प्रारंभ होत असल्यामुळे डीएसटी आणि श्री चित्रा संस्थेला अतिशय आनंद होत आहे. यासाठी वापरण्यात आलेले तंत्रज्ञान आणि सामुग्री याचा विचार केला तर हे उपकरण हाताळणे अतिशय सोपे आहे. कार्यालय, निवासस्थाने आणि इतर सार्वजनिक स्थानांवरही हे साधन सुलभतेने वापरणे शक्य होणार आहे. असे सुविधापूर्ण उपकरण विकसित केल्याबद्दल ‘एससीटीआयएमएसटी’च्या संचालिका डॉ. आशा किशोर यांनी संस्थेच्या संशोधकांच्या पथकाचे यावेळी अभिनंदन केले. कोविड-19 ला पूर्णपणे संपुष्टात आणण्यासाठी या प्रयत्नांचे मोठे योगदान आहे, असेही त्या म्हणाल्या.

यावेळी व्हीएसटी मोबिलिटी सोल्यूशन्सचे मुख्य कार्यकारी अधिकारी एल्विन जॉर्ज यांनी बिन-19 विषयी माहिती दिली. या कंटेनरमध्ये टाकण्यात आलेले वापरलेले मास्क पहिल्यांदा निर्जंतूक केले जातात. त्यानंतर कीटाणूरहित मास्क दुस-या कंटनेरमध्ये ठेवले जातात. जी व्यक्ती मास्क काढून त्या बिन-19 मध्ये टाकेल, त्या व्यक्तीला बिन-19 ला जोडण्यात आलेल्या स्वयंचलित निर्जंतुकीकरण यंत्राच्या मदतीने आपले हातही निर्जंतूक करता येते. या सर्व कामांसाठी बिनमध्ये कोणत्याही बटनाला हात लावण्याची किंवा यंत्र सुरू करण्याची गरज नाही. सर्व कामे स्वयंचलित होवू शकणार आहेत. त्यामुळे कर्मचारी वर्गाचीही सुरक्षा सुनिश्चित होते. 

बिन-19 मधल्या ‘इंटरनेट ऑफ थिंग्स’ या सुविधेमुळे कंटनेर रिक्त असेल तेव्हा गजर वाजत असल्याने माहिती मिळते. तसेच बिन-19 चे स्थान शोधण्यासाठी मोबाईल अॅप्लिकेशन वापरता येते.

व्हीएसटी मोबिलिटी सोल्यूशन्सने आणखी एक यूव्ही लाइटवर आधारित बहुउद्देशीय निर्जंतुकीकरण यंत्र विकसित केले आहे. त्याच्या मदतीने कोविड-19 ला हद्दपार करणे शक्य होणार आहे. अतिनील किरणांच्या मदतीने कीटाणूंचा विनाश करणारे हे यंत्र आहे.  आतल्या बाजूच्या पृष्ठभागांवर असलेल्या विषाणूंचा नायनाट करण्यासाठी या उपकरणाची मदत होवू शकणार आहे, असे व्हीएसटी मोबिलिटी सोल्यूशन्सने म्हटले आहे. 

वापरलेले मास्क कुठेही टाकले गेले तर कोविड-19 चा प्रसार सातत्याने होत राहणार आहे, हा धोका संपुष्टात आणण्यासाठी वापरलेल्या मास्कची योग्य पद्धतीने विल्हेवाट लावणे अतिशय गरजेचे आहे. या नवीन उपकरणांमुळे प्रामुख्याने वापरलेल्या मास्कमुळे कीटाणूंचा प्रसार रोखला जाणार आहे. या यंत्राची सूक्ष्मजैविक चाचणी श्री चित्रा प्रयोगशाळेत करण्यात आली आहे.

Description: Bin19 by SCTIMST Description: UVSPOT by SCTIMST

(अधिक माहितीसाठी ‘एससीटीआयएमएसटी’च्या संपर्क अधिकारी स्वप्ना वामदेवन यांच्याशी संपर्क साधावा. मोबाईल - 965681943. ईमेल - pro@sctimst.ac.in )

 

* * *

S.Thakur/S.Bedekar/D.Rane

 

सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा@PIBMumbai   Image result for facebook icon /PIBMumbai    /pibmumbai  pibmumbai[at]gmail[dot]com


(Release ID: 1631077) Visitor Counter : 261