गृह आणि शहरी व्यवहार मंत्रालय
बाजारपेठांमध्ये पादचाऱ्यांची सोय व्हावी यासंदर्भात हितसंबंधीयांशी चर्चा करुन सर्वसमावेशक नियोजन आराखडा तयार करण्याची गृहनिर्माण आणि नगरविकास मंत्रालयाची शिफारस
10 लाख लोकसंख्येपेक्षा अधिक लोकसंख्येच्या शहरात पादचाऱ्यांसाठी किमान 3 बाजारपेठा आणि त्यापेक्षा कमी लोकसंख्येच्या शहरात किमान एक बाजारपेठ
बाजारपेठांमध्ये पायी चालण्यास प्रोत्साहन
Posted On:
10 JUN 2020 4:20PM by PIB Mumbai
देशातील विविध शहरे आणि महानगरपालिका क्षेत्रात, पादचाऱ्यांना सोयीच्या ठरतील अशा बाजारपेठा तयार करण्याबाबत सर्व हितसंबंधीयांशी चर्चा करुन एक सर्वसमावेशक नियोजन आराखडा तयार करावा, आशी शिफारस केंद्रीय गृहनिर्माण आणि नगरविकास मंत्रालयाने केली आहे. यासंदर्भात मंत्रालयाचे सचिव, दुर्गाशंकर मिश्रा यांनी सर्व राज्ये/शहरे/महानगरपालिकांना जारी केलेल्या मार्गदर्शक सूचनांनुसार, 10 लाख पेक्षा जास्त लोकसंख्या असलेल्या प्रत्येक शहरात पादचाऱ्यांसाठी किमान तीन बाजारपेठा आणि आणि 10 लाखांपेक्षा कमी लोकसंख्या असलेल्या शहरात किमान एक बाजारपेठ विकसित करण्यात यावी, अशी सूचना करण्यात आली आहे.
बाजारपेठांमध्ये लोकांना पायी फिरण्याची सवय लावण्यास प्रोत्साहन देण्याबाबत काय पावले उचलावीत यासाठी खालील सूचना देण्यात आल्या आहेत-
1. बाजारपेठेच्या जागेची निवड – दहा लाखांपेक्षा कमी लोकसंख्या असलेली शहरे, पायी चालण्यास प्रोत्साहन मिळू शकेल, अशा किमान तीन बाजारपेठांच्या जागेची निवड करून त्याची अधिसूचना काढू शकतात. त्यापेक्षा कमी लोकवस्तीची शहरे, यासाठी किमान एका बाजारपेठेची निर्मिती करु शकतात.
2. जागेचे सर्वसमावेशक नियोजन-पादचाऱ्यांसाठी सोयीचे असलेल्या बाजारपेठांचे नियोजन सर्व संबधित गटांशी चर्चा करुन केले जावे- यात, विक्रेते, महापालिका अधिकारी, वाहतूक पोलीस, पार्किंग व्यवस्था करणारे, दुकानदार आणि ग्राहक यांचा समावेश असेल. यासठी सध्या हे सर्व लोक बाजारपेठ म्हणून वापरत असलेल्या जागेचे योग्य सर्वेक्षण करावे लागेल. हालचाली/दिशादर्शक माहिती देणारा एक नियोजन आराखडा तयार करावा लागेल, जिथे येणारे सर्व लोक शारीरिक अंतराच्या नियमांचे पालन करु शकतील. आराखडा तयार करतांना या परिसरातील झाडे आणि इतर हरित वनस्पतींना धक्का लागणार नाही, याची काळजी घ्यावी लागेल, किंबहुना, या बाजारपेठांमध्ये चालणे सुखद व्हावे यासठी रस्त्याच्या कडेने झाडे लावून सावली तयार करता येईल. विक्रेत्यांना, कचरा संकलन आणि स्वच्छतागृहे यांच्यासाठी निश्चित जागा आखून द्यायला हव्यात. या जागेच्या आजूबाजूला असलेल्या मोकळ्या सार्वजनिक आणि वापरात नसलेल्या जागांचाही बाजारपेठेसाठी उपयोग करता येईल.
3. एकदा जागा निश्चित होऊन आराखडा तयार झाला की त्याची अंमलबजावणी दोन टप्प्यांत केली जावी- जलद. तातडीच्या सोयी आणि दीर्घकालीन रचना.
4. तातडीच्या कामांमध्ये- त्वरित, तात्पुरत्या, सहज बसवता येणाऱ्या अशा तरतुदी करुन लॉकडाऊन नंतर बाहेर निघणाऱ्या प्रवाशांची सुरक्षितता बघितली जावी. काही त्वरित आणि तात्पुरत्या उपाययोजना जसे अडथळे, रस्ते बंद करणे इत्यादी करुन बाजारपेठा सुरु करता येतील.
5. ग्राहकांना चालण्यासाठी अथवा रांगेत वाट पाहण्यासाठी जागा उपलब्ध व्हावी म्हणून रस्त्यावरील पार्किंगच्या जागा किंवा वाहनमार्गांचाही पुनर्वापर करता येईल.
6. अतिरिक्त रस्त्यांचा वापर करुन बाजारपेठांमध्ये पोहोचण्याचे मार्ग खुले केले जाऊ शकतील.
7. सायकलस्वारांसाठी समर्पित /राखीव मार्गिका ठेवता येईल.
8. त्या परिसरातील रहिवाशांच्या चारचाकी गाड्यांना कुठून प्रवेश/निकास करता येईल याचे सुस्पष्ट वर्णन केले असावे.
9. बाजारपेठेकडे जाणाऱ्या सर्व रस्त्यांच्या पदपथांची रुंदी महानगपालिकांना वाढवता येईल.
10. ग्राहकांना बाजारपेठेत जाणे सोयीचे व्हावे, यासाठी उत्तम वारंवारीता असलेल्या पुरेशा सार्वजनिक वाहतूक व्यवस्था असतील याची खात्री प्रशासनाने करावी.
11. विक्रेत्यांसाठीच्या जागांचे रेखाचित्र तयार करतांना नवोन्मेशी कल्पकता असलेल्यांना उत्तम संधी आहे.
12. तात्पुरत्या व्यवस्था यशस्वी झाल्या तर, पायी चालण्यास कायमस्वरूपी प्रोत्साहन देण्याच्या दृष्टीने, दीर्घकालीन संरचना विकसित केल्या जाऊ शकतील.
कालबद्धता :-
पायी चालण्यास प्रोत्साहन देता येईल अशा बाजारपेठांच्या जागा निश्चित करण्याचे काम 30 जून 2020 पर्यंत पूर्ण करायचे आहे. या जागेसाठीचा एक सर्वसमावेशक आराखडा तयार करण्याचे काम 3 महिन्यांत म्हणजे सप्टेंबर 2020 पर्यंत पूर्ण करायचे आहे. सप्टेंबर महिनाअखेर हा आराखडा तयार होऊन त्याची अंमलबजावणी सुरु व्हायला हवी. यातील तात्पुरत्या सोयी-सुविधा ऑक्टोबरच्या पहिल्या आठवड्यापासून कार्यान्वित व्हायला हव्यात. तात्पुरत्या व्यवस्थांचे मूल्यामापन नोव्हेंबर महिन्यात केले जावे आणि त्यात काही त्रुटी असल्या तर त्याही नोव्हेंबर महिन्यापर्यंत सुधारायला हव्यात.
आता शहरांमध्ये हळुहळू लॉकडाऊन शिथिल केले जात असून, जनतेला सुरक्षित, परवडणाऱ्या वाहतूक सुविधा देत शारीरिक अंतराच्या नियमांचे पालन करत नव्या स्वरूपाच्या बाजारपेठा देत असतांना पायी चालणे आणि सायकलने बाजारात जाण्याच्या सवयी अत्यंत महत्वाच्या ठरणार आहेत. कोविड-19 च्या महामारीमुळे आपल्याला कायम गजबजलेले गर्दीचे रस्ते मोकळे करण्याची संधी मिळाली आहे. बाजारपेठा कोविड संसर्गापासून सुरक्षित ठेवायच्या असतील तर शहरांमध्ये पायी चालण्याची सवय लावणे उत्तम उपाय ठरेल.
त्याशिवाय देशभरात बस आणि मेट्रोसारख्या सार्वजनिक सेवांना मजबूत करुन, देशातील मोठ्या शहरातील हवेच्या दर्जात सुधारणा करण्यासाठी मंत्रालयाचे प्रयत्न सुरु आहेत.
कोविड-19 च्या आधीही, चेन्नई, पुणे आणि बंगलोर अशा शहरांमध्ये स्मार्ट सिटी प्रकल्पाचे काम सुरु झाले आहे. गेल्या पाच वर्षात, चेन्नईत 100 किलोमीटर पेक्षा अधिक रस्ते पादचाऱ्यांच्या सोयीचे ठरतील असे विकसित केले आहेत. तर पुण्यात 400 किलोमीटर लांबीच्या रस्त्यांवर सायकल चालवता येईल, असे सायकल-पूरक सर्वसमावेशक रस्ते नियोजन केले आहे. असे नियोजन करणारे पुणे देशातील पहिलेच शहर आहे. तसेच पुणे महापालिका, विद्यार्थी, महिला यासारख्या लोकांना सायकल चालवण्यासाठी आवाहन करत असते. सायकलींना प्रोत्साहन दिल्यास देशातील इतर शहरांमध्ये होणारी वाहतूक कोंडी कमी करता येईल आणि नागरिकांनाही मोकळा श्वास घेता येईल.
***
S.Thakur/R.Aghor/P.Kor
***
सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा@PIBMumbai /PIBMumbai /pibmumbai pibmumbai[at]gmail[dot]com
(Release ID: 1630668)
Visitor Counter : 383