अंतराळ विभाग

खासगी क्षेत्राला आपल्या क्षमता सुधारण्यासाठी इस्रोच्या सुविधा आणि इतर साधनसंपत्तीचा वापर करण्याची परवानगी देणार: डॉ. जितेंद्र सिंह

Posted On: 09 JUN 2020 10:10PM by PIB Mumbai

 

खासगी क्षेत्राला आपल्या क्षमता सुधारण्यासाठी इस्त्रोच्या सुविधा आणि इतर संपत्तीचा वापर करण्याची परवानगी देण्यात येईल, असे केंद्रीय ईशान्य क्षेत्र विकास (डोनर), पंतप्रधान कार्यालय, सार्वजनिक तक्रार, निवृत्ती वेतन, अणुऊर्जा आणि अंतराळ राज्य मंत्री (स्वतंत्र कार्यभार) डॉ. जितेंद्र सिंह यांनी सांगितले.

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या सरकारच्या दुस-या कार्यकाळामध्ये पहिल्या वर्षात अंतराळ तंत्रज्ञान क्षेत्रामध्ये भारताने केलेल्या कामगिरीची माहिती डॉ. सिंह यांनी दिली. यावेळी ते म्हणालेमोदी सरकारने भारताला आत्मनिर्भर बनविण्यासाठी एक मार्गदर्शी कार्यक्रम तयार केला आहे. यानुसार अंतराळविषयक कार्यक्रमामध्ये खासगी भागीदारीला प्रोत्साहन देण्याची कल्पना मांडण्यात आली आहे. यासंबंधी अर्थमंत्र्यांनीही माहिती आधी दिलेली आहे. त्यामुळे भारतातल्या खासगी क्षेत्राला आता भारताच्या अंतराळ कार्यक्रमाचे सहप्रवासी होता येणार आहे. 

उपग्रह, प्रक्षेपण आणि अंतराळ आधारित सेवांमध्ये खासगी कंपन्यांना समान संधी मिळू शकणार आहे. खासगी क्षेत्रांसाठी ग्रहांचा शोध घेणे, बाह्य अंतराळ यात्रा यासारख्या योजना मुक्त करण्यात येणार आहेत.

इस्रोच्यावतीने सुरु करण्यात आलेल्या ‘गगनयान’ या भारताच्या पहिल्या मानवी अंतराळ मोहिमेविषयी ताजी माहिती देताना डॉ. सिंह म्हणाले, अंतराळ यात्रींच्या निवडीचे काम पूर्ण झाले आहे. त्यांच्या प्रशिक्षणाला रशियामध्ये प्रारंभही झाला आहे. परंतु कोविड-19 महामारीच्या उद्रेकामुळे या कामामध्ये काही काळ खंड पडला आहे. मात्र या मोहिमेचा पुढचा टप्पा लवकरच सुरू करण्यात येणार आहे.

या सरकारच्या दुस-या कार्यकाळातल्या पहिल्या वर्षात पंतप्रधान मोदी यांच्या प्रोत्साहनामुळे इस्रोच्यावतीने युवा शालेय विद्यार्थ्‍यांसाठी एक विशेष ‘यंग सायंटिस्ट प्रोग्रॅम - युविका’ हा कार्यक्रम सुरू करण्यात आला.  अंतराळ तंत्रज्ञानांविषयी नवीन पिढीला अगदी मुलभूत ज्ञान मिळावे आणि या क्षेत्राविषयी त्यांच्या मनामध्ये उत्सुकता निर्माण व्हावी, त्यांना अंतराळविषयक काही प्रयोग करण्याची आवड निर्माण व्हावी, यासाठी हा कार्यक्रम सुरू करण्यात आल्याची माहिती डॉ. सिंह यांनी दिली.

कोरोना महामारीच्या काळातही इस्रोचे संशोधक आवश्यक वैद्यकीय सुरक्षा संच आणि इतर उपकरणे तयार करण्याची  सर्वोत्कृष्ट पद्धती शोधून काढण्यासाठी प्रयत्नशील आहेत.

***

S.Thakur/S.Bedekar/P.Kor

***

सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा@PIBMumbai   Image result for facebook icon /PIBMumbai    /pibmumbai  pibmumbai[at]gmail[dot]com



(Release ID: 1630611) Visitor Counter : 231