आरोग्य आणि कुटुंब कल्याण मंत्रालय

डॉ  हर्ष वर्धन यांनी कोविड-19 व्यवस्थापनाबाबत स्थिती आणि सज्जतेचा दिल्लीचे  नायब राज्यपाल आणि  आरोग्य मंत्र्यांसमवेत घेतला आढावा

Posted On: 04 JUN 2020 4:47PM by PIB Mumbai

 

दिल्लीमध्ये रुग्णांची संख्या आणि मृत्यूचे प्रमाण वाढत असल्याने निदान चाचण्या आणि त्याच्या बरोबरीने आक्रमक  देखरेख आणि रुग्णाच्या संपर्कातील लोकांचा शोध, कठोर प्रतिबंध आणि त्या परिघातल्या बाबींचे नियमन करण्याची आवश्यकता केंद्रीय आरोग्य आणि कुटुंब कल्याण मंत्री डॉ हर्षवर्धन यांनी व्यक्त केली आहे. कोविड-19 वर नियंत्रण आणि त्याचा संसर्ग रोखण्यासाठीच्या सज्जतेचा आढावा डॉ हर्ष वर्धन यांच्या अध्यक्षतेखाली व्हिडीओ कॉन्फरन्सिंगद्वारे  झालेल्या एका उच्च स्तरीय बैठकीत आज घेण्यात आला त्यावेळी ते बोलत होते. केंद्रीय आरोग्य आणि कुटुंब कल्याण राज्य  मंत्री अश्विनी कुमार चौबे, दिल्लीचे नायब राज्यपाल अनिल बैजल आणि  दिल्लीचे आरोग्य मंत्री  सत्येंद्र जैन या बैठकीला उपस्थित होते.

दिल्ली केंद्रशासित प्रदेशातले  सर्व जिल्हे सध्या  कोविड-19 ने बाधित असून अनेक जिल्ह्यातले रुग्णांचे वाढते प्रमाण, पोझिटीव आढळण्याचे मोठे प्रमाण आणि चाचण्यांचे कमी प्रमाण चिंताजनक असल्याचे डॉ हर्ष वर्धन म्हणाले. दिल्लीमध्ये चाचणीचे सरासरी प्रमाण एक दशलक्ष  लोकसंख्येमागे 2018 होते,उत्तर पूर्व ( 517 चाचण्या /दशलक्ष लोकसंख्या) आणि दक्षिण पूर्व (506 चाचण्या /दशलक्ष लोकसंख्या ) यासारख्या काही जिल्ह्यात ते खूपच कमी होते. केंद्रशासित प्रदेशाचा पोझीटीविटी दर गेल्या आठवड्यात 25.7% होता, अनेक जिल्ह्यात हा दर 38% होता. आरोग्य सेवा कर्मचाऱ्यांमधे संसर्गाचे मोठे प्रमाण ही गंभीर बाब असल्याचेही त्यांनी सांगितले. आरोग्य सेवा क्षेत्रात संसर्ग रोखण्यासाठी अपुरे  नियमन असल्याचे हे द्योतक असून याकडे प्राधान्याने लक्ष देण्याची गरज त्यांनी व्यक्त केली.

आरोग्य पायाभूत सुविधांच्या विस्तारासह चाचण्यांचे प्रमाण तातडीने वाढवण्याची  आवश्यकता आणि महत्व त्यांनी अधोरेखित केले. त्याच बरोबर कोविड-19 रुग्णासंदर्भात प्रभावी व्यवस्थापन आणि मृत्यू दरात घट व्हावी या दृष्टीने उत्तम आरोग्य व्यवस्थापनाची त्याला जोड हवी असे ते म्हणाले.

सध्या रुग्णांचे  वाढते प्रमाण लक्षात घेता खाटा  उपलब्ध होण्याच्या प्रमाणातही वेगाने वाढ हवी ज्यामुळे रुग्ण दाखल होण्यातला अनावश्यक उशीर टाळता येईल याकडे त्यांनी लक्ष वेधले. गृह विलगीकरणात असलेल्यांचेही लक्षणीय प्रमाण असून, चाचण्या, उपचाराची दिशा आणि मृत्यू  टाळण्यासाठी रुग्णाच्या स्थितीप्रमाणे त्याला कोविड समर्पित रुग्णालयात वेळेवर हलवणे महत्वाचे  असल्याचे त्यांनी सांगितले.वरिष्ठ आणि कोविड -19 संदर्भात जास्त धोका असलेल्या लोकांना, बहुविध आजार असलेल्यांना  शोधून त्यांना संरक्षण देण्याची गरज त्यांनी व्यक्त केली. मोठ्या दाट समूह वस्तीतल्या  अशा लोकांसाठी जिथे गृह विलगीकरण प्रभावी नसल्याचे आढळल्यास त्यांच्यासाठी संस्थात्मक विलगीकरणाची तरतूद करण्याकडेही लक्ष पुरवण्याची आवश्यकता त्यांनी व्यक्त केली.

दिल्लीमध्ये मृत्यू दर कमी करण्यासाठी आणि प्रतिबंधात्मक उपाय प्रभावी लागू करण्यासाठी केंद्र सरकारने वेळोवेळी जारी केलेली मार्गदर्शक तत्वे आणि सूचनांना अनुसरून  पावले  उचलण्याच्या गरजेकडे लक्ष वेधण्यात आले. रुग्ण वेळीच ओळखण्याची  गरज  असून त्यासाठी आयएलआय/सारीच्या रुग्णाकडे व्यापक देखरेखीची  सूचना करण्यात आली. दिल्लीच्या विविध भागात सर्व आरोग्य सुविधांमध्ये  तापासाठी क्लिनिक आणि फ्लू कॉर्नर उभारून त्यामध्ये संपर्कातील रुग्णांचा शोध आणि  देखरेख यावर लक्ष केंद्रित करायला हवे. संपर्कातील व्यक्तींचा शोध घेण्यासाठी आरोग्य सेतू ऐप द्वारे मिळालेल्या माहितीचा उपयोग करण्यासाठी प्रोत्साहन देण्यात आले आहे. कोविड व्यतिरिक्त आवश्यक आरोग्य सेवाही  सुरु करण्याची आवश्यकता आहे.

आरोग्य पायाभूत सुविधा बळकट करण्यासाठी आणि चाचणी क्षमता वाढवण्यासाठी दिल्लीलाआवश्यक ते सर्व सहाय्य पुरवण्यात येत असल्याचे डॉ हर्ष वर्धन यांनी सांगितले.  दिल्लीचे आयुक्त, महापौर यांच्याशी तपशीलवार चर्चा केल्यानंतर अनेक प्रतिबंधित क्षेत्रात लोकसंख्येची दाटी यासारखे काही मुद्दे प्रशासनाच्या सामुहिक प्रयत्नात गंभीर आव्हान ठरत आहेत असे सांगून एकत्रित कृतीसाठी संसाधने आणि अनुभव यांचे एकत्रीकरण करण्याची सूचना त्यांनी केली. हा सामुहिक लढा आहे आणि दिल्लीला त्यांच्या प्रयत्नात आमचे पूर्ण सहकार्य राहील असे हर्ष वर्धन यांनी सांगितले.

कोविड-19 ला आळा घालण्यासाठी विभागात उचलण्यात येणाऱ्या पावलाविषयी महापालिका अधिकाऱ्यानी माहिती दिली. प्रतिबंधित क्षेत्रात नियमन, रुग्णांचा  वेळीच शोध आणि वर्गीकरण इत्यादी मुद्य्यांवर यावेळी चर्चा झाली.

आघाडीचे आरोग्य कर्मचारी, प्रशासनआणि इतर कोविड योद्ध्यांच्या प्रयत्नांची हर्ष वर्धन यांनी प्रशंसा केली. शारीरिक अंतरहातांची स्वच्छता, आजूबाजूला स्वच्छता या संदर्भातल्या नियमांचे पालन करणे आताही आवश्यक असून डॉक्टर  आणि इतर आरोग्य कर्मचाऱ्यांप्रती आदर, अफवांवर विश्वास न ठेवणे आणि त्यांचा प्रसार रोखणे,अधिकृत आणि अचूक माहितीचा प्रसार करण्यासाठी मदत करणे,गरजू, वरिष्ठ नागरिकांना मदतीचा हात देण्याची आवश्यकता त्यांनी व्यक्त केली. आपल्या सामुहिक प्रयत्नातून आपण कोविड-19 विरोधातला हा लढा नक्की जिंकू असा विश्वास त्यांनी व्यक्त केला.

 

B.Gokhale/N.Chitale/P.Kor

***

सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा@PIBMumbai   Image result for facebook icon /PIBMumbai    /pibmumbai  pibmumbai[at]gmail[dot]com


(Release ID: 1629450) Visitor Counter : 241