भूविज्ञान मंत्रालय

निसर्ग चक्रीवादळाचा प्रभाव आता कमी होण्याच्या मार्गावर,  विदर्भाच्या उत्तर-पश्चिम भागामध्ये आणि लगतच्या मध्य प्रदेशात हवेतल्या कमी दाबाच्या क्षेत्रात वादळ कमकुवत होण्याची शक्यता

Posted On: 01 JUN 2020 5:02PM by PIB Mumbai

 

भारताच्या हवामान खात्याच्या राष्ट्रीय हवामान अंदाज केंद्र आणि प्रादेशिक हवामानशास्त्र केंद्राचे विशेषज्ञ तसेच चक्रीवादळाविषयी धोक्याची सूचना देणा-या विभागाने 'निसर्ग' चक्रीवादळाचा प्रभाव आता हळूहळू कमी होत असल्याचे स्पष्ट केले आहे. 

निसर्ग' वादळीवा-याचा प्रवास सध्या ईशान्येच्या दिशेने सुरू झाला आहे. गेल्या सहा तासापासून विदर्भाच्या पश्चिम भागाकडून 27किलोमीटर प्रतितास या वेगाने ईशान्येकडे  वादळी वा-यांचा प्रवास सुरू आहे. विदर्भाचा पश्चिम भाग आणि मध्य प्रदेशाजवळचे अक्षांश 21.2  आणि रेखांश 76.9 यांच्या दरम्यान तयार झालेल्या कमी दाबाच्या पट्ट्याची तीव्रता आता कमी होत आहे. महाराष्ट्रातल्या अकोला, नागपूरच्या वायव्य दिशेला आणि भोपाळ- मध्य प्रदेशच्या दक्षिणपूर्वेकडे वादळ पुढे सरकत आहे. या भागांमध्ये वादळी वारे वाहतील मात्र त्याची तीव्रता भयावह असणार नाही, असा अंदाज हवामानशास्त्र विभागाने वर्तवला आहे.

वातावरणातला कमी दाबाच्या पट्ट्याची तीव्रता आता कमी होत चालली असल्यामुळे आज सायंकाळपर्यंत चक्रीवादळही कमकुवत होत जाण्याची शक्यता आहे.

आज सकाळी 8.30 वाजता संपलेल्या गेल्या चोवीस तासामध्ये ठिकठिकाणी झालेल्या पावसाची नोंद सेंटीमीटरमध्ये पुढील प्रमाणे आहे. ज्या भागात 5 सेंटीमीटरपेक्षा जास्त पाऊस झाला, त्यांची आकडेवारी येथे दिली आहे.  नाशिक - 14.4, लांजा- 13.1, दापोली - 12.5, इगतपुरी आणि भुसावळ - 10.6, चिपळूण - 10.2, हरणाई, राजापूर आणि बागलाण - 8.7, गुहागर - 7.7, साक्री - 7.2, जव्हार, मालेगाव आणि दिंडोरी - 7.0, सुरगणा - 6.5, शिरपूर - 6.3, जामनेर - 6.2, रत्नागिरी आणि येवला - 5.3, कुलाबा - 5.0

 

धोक्याचा इशारा:-

1.    पाऊस:

पूर्व-मध्य प्रदेश आणि छत्तीसगडच्या काही भागामध्ये मुसळधार ते अतिजास्त मुसळधार पाऊस पडण्याची शक्यता आहे. तसेच या भागातल्या बहुतांश ठिकाणी किरकोळ ते सामान्य पाऊस पडेल. तसेच येत्या 24 तासांमध्ये बहुतांश भागामध्ये मुसळधार पाऊस पडण्याची शक्यता आहे.

 

2.    वारे वाहण्यासंबंधी इशारा:

निसर्ग चक्रीवादळाची तीव्रता कमी झाली असली तरीही त्याचा  प्रभाव अद्याप पूर्णपणे संपुष्‍टात आलेला नाही. त्यामुळे विदर्भाच्या  पश्चिमेकडील जिल्ह्यांमध्ये  आणि मध्य प्रदेशामध्ये वाहणारे वारे 55 किलोमीटर प्रतितास या वेगाने वाहतील. मात्र येत्या 12 तासांमध्ये या वा-याचा वेग मंदावण्याची शक्यता आहे.

 

निसर्ग वादळ, सध्या होत असलेला पाऊस याची तपशीलवार माहिती घेण्यासाठी कृपया, पुढील संकेतस्थळांवर क्लिक करावे. www.rsmcnewdelhi.imd.gov.in and www.mausam.imd.gov.in

(या दुव्यांनी जोडलेले,  हवामानाचा तपशील आणि अद्ययावत चित्रआलेख पहा )

****

B.Gokhale/S.Bedekar/P.Kor



(Release ID: 1629351) Visitor Counter : 132