जलशक्ती मंत्रालय

विद्यमान आर्थिक वर्षात पुदुचेरीच्या ग्रामीण भागातील सर्व घरांना नळाद्वारे पाणीपुरवठा करण्यासाठी जलजोडण्या देण्याची केंद्र सरकारची योजना

Posted On: 03 JUN 2020 9:30PM by PIB Mumbai

नवी दिल्ली, 3 जून 2020

केंद्र सरकारच्या ‘राष्ट्रीय जल जीवन अभियाना’अंतर्गत पुदुचेरी या केंद्रशासित प्रदेशाचा आर्थिक वर्ष 2020-21 साठीचा वार्षिक कृती आराखडा मंजूर करण्यात आला. पुदुचेरीमधील ज्या घरांना नळाद्वारे पाणी मिळण्यासाठी अजूनही जलजोडण्या मिळालेल्या नाहीत अशा सर्व घरांना त्या पुरवण्याची योजना या आराखड्यात आखण्यात आली आहे. या भागात सध्या कोविड-19 विषाणू संसर्गाच्या प्रादुर्भावाची भीती कायम असली तरी स्थानिक समुदायांना सहभागी करून घेऊन गाव पातळीवर या कामासाठीचे नियोजन सुरु आहे. गावातील लोकांमध्ये सुरक्षित शारीरिक अंतर राखण्याची काळजी घेऊन ग्रामसभा घेतल्या जात आहेत. दीर्घकालीन शाश्वत पाणीपुरवठा सुनिश्चित करण्यासाठी गावातील पाणीपुरवठा यंत्रणेचे नियोजन, अंमलबजावणी, व्यवस्थापन, कार्यान्वयन आणि देखभाल या सर्व कामांमध्ये स्थानिक समुदायांची महत्त्वाची भूमिका असेल. गावांमधील पाणीपुरवठा यंत्रणेची निगा राखणे, पाणीपुरवठा सुरळीतपणे सुरु राहणे तसेच या प्रणालीची नियमित देखभाल होणे या जबाबदाऱ्या उचलण्यासाठी स्थानिक समुदायांमधील लोकांना उत्तेजन दिले जात आहे. या भागातील पारंपारिक पाणीसाठ्यांची परिस्थिती सुधारण्यासोबतच वापरलेल्या पाण्यावर प्रक्रिया करून त्याचा पुनर्वापर करण्यावर देखील भर दिला जात आहे.

पुदुचेरीमध्ये सध्या उन्हाळा पूर्ण भरात असून, मान्सूनच्या आगमनाची अशा लागली आहे. देशात कोविड-19 विषाणू संसर्गामुळे निर्माण झालेल्या आपत्कालीन परिस्थितीत मूळ गावी परतलेल्या स्थानिक मजुरांच्या उपजीविकेसाठी त्यांना पाणी पुरवठ्याशी संबंधित कामे दिली जाणे अत्यावश्यक झाले आहे. अशा वेळी, प्रत्येक गावामध्ये जल सुरक्षेच्या उद्देशाने  पुरेशा  भूजलाची उपलब्धता होण्यासाठी, शेतीसाठी पाणी मिळण्यासाठी आणि सगळ्यात महत्त्वाचे म्हणजे ग्रामीण भागातील प्रत्येक घराला पिण्याचे पुरेसे पाणी मिळण्यासाठी या मजुरांना जल संधारणाच्या कामांवर रोजगार उपलब्ध करून दिला जात आहे.

‘जल जीवन अभियाना’अंतर्गत विविध पातळ्यांवर पाण्याची  गुणवत्ता तपासण्यासाठी प्रयोगशाळांची उभारणी केली जात असून गावांमधील पाण्याच्या गुणवत्तेवर लक्ष ठेवण्याच्या कामात गावातील लोकांना सहभागी करून घेतले जात आहे. स्थानिक समुदायांमधील लोकांनी या परीक्षणाच्या कामात  पूर्ण क्षमतेने सहभागी होण्यासाठी तरतूद करण्यात आली असून गावपातळीवरील पाण्याचे स्त्रोताच्या जागीच परीक्षण करता यावे या हेतूने चाचणी सामग्री खरेदी करणे, गावकऱ्यांना ती उपलब्ध करून देणे, प्रत्येक गावातील किमान पाच स्त्रियांची निवड करून त्यांना पाणीपरीक्षण चाचणी करण्यासाठीचे प्रशिक्षण देणे अशा नियोजनबद्ध प्रक्रियांसाठी कृती योजना तयार करण्यात आली आहे.

पुदुचेरी मधील ग्रामीण भागात चोवीस तास पाणीपुरवठा करण्यावर लक्ष केंद्रित करण्याचा सल्ला प्रशासनाला देण्यात आला आहे. गावांच्या पाणीपुरवठ्यावर नजर ठेवण्यासाठी ‘इंटरनेट ऑफ थिंग्स’ या संकल्पनेवर आधारित संवेदक यंत्रणा बसविण्याची योजना देखील आखण्यात आली आहे.

‘जल जीवन अभियाना’च्या माध्यमातून केंद्र सरकार देशातील ग्रामीण भागाच्या प्रत्येक घरात नळाद्वारे पुरेशा प्रमाणात नियमित आणि अखंडितपणे पाणीपुरवठा करण्यासाठी सर्व प्रयत्न करीत आहे. ग्रामीण भागातील जनतेला त्यांच्या घरात पिण्यायोग्य पाण्याचा पुरवठा करून त्यांचे जीवनमान सुलभ करणे हा केंद्र सरकारच्या या मुख्य कार्यक्रमाचा हेतू आहे.

 

M.Jaitly/S.Chitnis/P.Malandkar

 

सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा@PIBMumbai   Image result for facebook icon /PIBMumbai    /pibmumbai  pibmumbai[at]gmail[dot]com



(Release ID: 1629195) Visitor Counter : 180