गृह मंत्रालय
‘निसर्ग’ चक्रीवादळासंदर्भातील तयारीचा आढावा घेण्यासाठी राष्ट्रीय संकट व्यवस्थापन समितीची (NCMC)पुन्हा बैठक
Posted On:
02 JUN 2020 10:26PM by PIB Mumbai
नवी दिल्ली, 2 जून 2020
‘निसर्ग’ चक्रीवादळाचा सामना करण्याच्या दृष्टीने राज्ये आणि केंद्रीय मंत्रालये/ संस्थांच्या सज्जतेचा आढावा घेण्यासाठी आज कॅबिनेट सचिव राजीव गौबा यांच्या अध्यक्षतेखाली NCMC म्हणजेच राष्ट्रीय संकट व्यवस्थापन समितीची दुसरी बैठक घेण्यात आली.
IMD अर्थात भारतीय हवामानशास्त्र विभागाच्या अंदाजानुसार हे तीव्र चक्रीवादळ महाराष्ट्राच्या किनाऱ्यावर 3 जूनच्या दुपारी / संध्याकाळी धडकण्याचा अंदाज आहे. यामुळे राज्याच्या किनारी जिल्ह्यांत मुसळधार पाऊस आणि वादळासह 100 ते 110 किलोमीटर प्रतितास इतक्या वेगाने वारे वाहण्याचा अंदाज असून, त्यांचा वेग ताशी 120 किलोमीटरपर्यंत पोहोचण्याची शक्यता आहे. तसेच त्याबरोबर 1 ते 2 मीटर उंचीच्या लाटा उसळण्याचा अंदाज आहे.
या वादळाचा फटका महाराष्ट्राच्या रायगड, मुंबई, ठाणे, आणि पालघर या, तर गुजरातच्या वलसाड, नवसारी, सुरत, भावनगर आणि भरूच या किनारी जिल्ह्यांना आणि दमण, दादरा आणि नगर हवेली यांना बसण्याची शक्यता आहे.
राज्य सरकारे/ केंद्रशासित प्रदेशाच्या अधिकाऱ्यांनी त्यांच्या सज्जतेची माहिती NCMC ला दिली. अत्यावश्यक वस्तूंचा पुरेसा पुरवठा त्यांच्याकडे उपलब्ध असून तातडीच्या सर्व सेवाही सुसज्ज आहेत, अशी ग्वाही त्यांनी यावेळी दिली. चक्रीवादळामुळे बाधित होऊ शकणाऱ्या नागरिकांना संदेश पाठविण्यासाठी दूरसंचार विभागाने एकावेळी बहुसंख्य व्यक्तींना sms पाठविण्याची सुविधा पुरवली असून, तिचा वापर केला जात आहे. तसेच नागरिकांना सुरक्षित ठिकाणी हलविण्याचेही काम सुरु आहे.
राज्ये आणि केंद्रशासित प्रदेशात NDRF ने 40 तुकड्या तैनात केल्या असून, आणखी तुकड्यांनाही पाचारण करण्यात आले आहे. लष्कर आणि नौदलाची - बचाव आणि मदत पथके तसेच, नौदल आणि वायुदलाच्या जहाजे व विमानांची कुमकही तयार ठेवण्यात आली आहे. तटरक्षक दलाच्या जहाजांनी यापूर्वीच समुद्रातील मच्छिमारांना सोडवून आणण्याचे काम सुरु केले आहे.
राज्ये व केंद्रीय संस्थांच्या तयारीचा आढावा घेतल्यावर कॅबिनेट सचिवांनी, चक्रीवादळाच्या मार्गातील सखल भागातील लोकांना सुरक्षित ठिकाणी हलविण्याच्या दृष्टीने तसेच समुद्रातील सर्व मच्छीमारांना सुखरूप परत आणण्याकरिता आवश्यक ती सर्व पावले उचलण्याचे आदेश दिले. कोरोना रुग्णांसाठीच्या अत्यावश्यक वैद्यकीय सेवा अविरत सुरु राहण्यासाठी विशेष प्रयत्न केले जावेट, असेही ते म्हणाले. वीज आणि संपर्कयंत्रणा तसेच, अणुविद्युत, रसायन उद्योग, विमान उद्योग, जहाजबांधणी उद्योग यांच्या मालमत्ता आणि पायाभूत सुविधांच्या संरक्षणासाठी आपत्कालीन योजना राबविण्याचे आदेशही संस्थांना देण्यात आले.
महाराष्ट्र आणि गुजरातचे अतिरिक्त मुख्य सचिव आणि दादरा आणि नगर हवेली व दमण आणि दीव चे सल्लागार आणि प्रशासक यांनी विडिओ कॉन्फरन्सिंगद्वारे सदर बैठकीत भाग घेतला. गृह मंत्रालय तसेच जहाजबांधणी, वीज, रेल्वे, दूरसंचार, पेट्रोलियम आणि नैसर्गिक वायू, अणू-ऊर्जा, रसायने व पेट्रो रसायने, नागरी विमान वाहतूक, आरोग्य मंत्रालये, भारतीय हवामानशास्त्र विभाग, IDS, राष्ट्रीय आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरण आणि राष्ट्रीय आपत्ती प्रतिसाद दलाच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांनीही बैठकीत भाग घेतला.
आपत्कालीन परिस्थितीचा आढावा घेण्यासाठी NCMC पुन्हा बैठक घेणार आहे.
R.Tidke/J.Waishampayan/P.Malandkar
सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा@PIBMumbai /PIBMumbai /pibmumbai pibmumbai[at]gmail[dot]com
(Release ID: 1628840)
Visitor Counter : 222