शिक्षण मंत्रालय

कोविड-19 मुळे निर्माण झालेली परिस्थिती लक्षात घेवून ‘एक भारत श्रेष्ठ भारत’ कार्यक्रम नाविन्यपूर्ण बनविणार

Posted On: 28 MAY 2020 8:44PM by PIB Mumbai

नवी दिल्‍ली, 28 मे 2020


कोविड-19 मुळे निर्माण झालेली परिस्थिती लक्षात घेवून सरकारने ‘एक भारत श्रेष्ठ भारत’ कार्यक्रम नाविन्यपूर्ण पद्धतीने राबवण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. 

सरकारच्या ‘एक भारत श्रेष्ठ भारत’ कार्यक्रमामध्ये सहभागी असलेल्या सर्व मंत्रालयांच्या संबंधित सचिवांची एक बैठक व्हिडिओ कॉन्फरन्सिंगच्या माध्यमातून घेण्यात आली. मनुष्यबळ विकास मंत्रालयाच्या उच्च शिक्षण विभागाचे सचिव अमित खरे यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या बैठकीत या कार्यक्रमाविषयी निर्णय घेण्यात आला. मनुष्यबळ विकास खाते हे ‘एक भारत श्रेष्ठ भारत’ उपक्रमाचे मुख्य मंत्रालय म्हणून काम पाहते. या बैठकीमध्ये पर्यटन सचिव योगेंद्र त्रिपाठी, सांस्कृतिक सचिव आनंद कुमार, युवा व्यवहार विभागाच्या सचिव उषा शर्मा, एसई अँड एल अनिता कारवाल, मायगव्हचे मुख्य कार्यकारी अधिकारी अभिषेक सिंग आणि माहिती आणि प्रसारण मंत्रालय, रेल्वे, गृह, संरक्षण, संसदीय व्यवहार आणि क्रीडा विभागाचे वरिष्ठ अधिकारी सहभागी झाले होते.  

प्रारंभी अमित खरे यांनी सर्वांचे स्वागत करून ‘एक भारत श्रेष्ठ भारत’ कार्यक्रमामध्ये आत्तापर्यंत राबवण्यात आलेल्या उपक्रमांची माहिती दिली. सध्या संपूर्ण देशभर कोविड-19 झालेला प्रकोप लक्षात घेवून या उपक्रमामध्ये त्याला अनुसरून नवीन मार्ग स्वीकारण्याची गरज असल्याचे सांगितले. यावेळी सचिव अनिता कारवाल यांनीही ‘एक भारत श्रेष्ठ भारत’ कार्यक्रम सद्यस्थिती लक्षात घेवून त्याच्या नव्या स्वरूपाला मूर्तरूप देण्याची आवश्यकता आहे, यावर भर दिला.  

या बैठकीमध्ये ‘एक भारत श्रेष्ठ भारत’ कार्यक्रमाच्या प्रगतीचे सादरीकरण केले. 

पर्यटन मंत्रालयाचे सचिव योगेंद्र त्रिपाठी यांनी बैठकीत बोलताना सांगितले की, पर्यटन मंत्रालयाच्यावतीने विविध पर्यटनासंबंधित विषयांवर वेबिनार आयोजित करीत आहे. ‘मायगोव्ह’पोर्टलवर असलेल्या   ‘देखो अपना देश’ ही वेबिनार मालिका सध्या केली जात आहे. या मालिकेला हजारो लोक दर्शक म्हणून लाभले आहेत. अशाच प्रकारचे वेबिनार, सहल आयोजक आणि वेगवेगळ्या राज्यातल्या पर्यटन क्षेत्राशी निगडित असलेल्या सहभागितांसाठी आयोजित केले जाऊ शकते. उच्च शिक्षण सचिवांनी यावेळी सुचविले की, ‘देखो अपना देश’ आणि अन्य वेबिनार मालिकांचे रेकॉर्डिंग शैक्षणिक वाहिन्यांवर आणि ऑनलाईन शिकवणी वर्गांच्या ब्रेकमध्ये प्रदर्शित करणे शक्य आहे. 

संस्कृती मंत्रालयाचे सचिव आनंद कुमार यांनी सांगितले की, त्यांच्यावतीने विविध प्रकारचे वेबिनार आयोजित करण्यात येत आहेत. वेगवेगळ्या मंत्रालयातल्या सर्व वेबिनारांना ‘एक भारत श्रेष्ठ भारत’ या एकाच व्यासपीठाखाली आणण्यात यावे. तसेच नाट्य लेखन, चित्रकारी, विविध स्मारकांचे आभासी पर्यटन असे वेगवेगळे ई-कार्यक्रम तयार करता येतील, अशी सूचनाही आनंद कुमार यांनी केली. संस्कृती मंत्रालयाने ई- हेरिटेजपीडिया आणि ई-कलाकारपीडिया असे कार्यक्रम विकसित करण्याचा प्रस्ताव मांडला. सुप्रसिद्ध कलाकारांमार्फत त्यांची अनोखी कला शिकवण्यासाठी व्हर्च्यूअल कार्यक्रम तयार करणे शक्य आहे, अशीही सूचना या बैठकीत करण्यात आली. एसईएलच्या सचिवांनी या सर्व नवीन कल्पना, सूचनांचे स्वागत केले. नवीन पिढीला वारली आणि मधुबनी यासारख्या चित्रकला शिकण्यामध्ये अतिशय रस असतो, त्यांना ही कला शिकवणे शक्य असल्याचेही त्यांनी सांगितले. 

युवा व्यवहार विभागाच्या सचिव उषा शर्मा यांनी एक भारत श्रेष्ठ भारत उपक्रमामध्ये डिजिटल माध्यमांचा वापर करण्याच्या कल्पनांचे कौतुक केले. त्या म्हणाल्या, या नवीन माध्यमांमुळे कार्यक्रम सुदूर पोहोचणे शक्य होणार आहे. वेगवेगळ्या विभागांनी तयार केलेल्या डिजिटल मटेरियल विभागून घेण्याची सूचनाही त्यांनी केली. सर्व मंत्रालयांकडील माहिती एकाच व्यासपीठावर जमा करून त्यानुसार तिचा वापर केला जावू शकतो, असेही यावेळी सुचवण्यात आले. 

‘मायगव्हडॉटइन’चे मुख्य कार्यकारी अधिकारी अभिषेक सिंग यावेळी म्हणाले की, वेगवेगळ्या भाषांमध्ये 100 वाक्ये शिकण्यासाठी मोबाईल अॅप विकसित करण्यात येत आहे. तसेच मायगव्ह विविध विभागांच्या वेबिनारचे यजमानपद स्वीकारू शकते आणि त्यांच्या कार्यक्रमाविषयीची माहिती प्रसारित करता येवू शकेल.

माहिती आणि प्रसारण मंत्रालयाचे सहसचिव विक्रम सहाय यांनी सुचविले की, टीव्ही, रेडिओ आणि मुद्रित प्रसार माध्यमांमार्फत विविध राज्यांची माहिती देण्याबरोबरच प्रत्येक राज्यातल्या चांगल्या प्रथा, परंपरा आणि यशोगाथा देणे शक्य होईल. ही माहिती सहभागी राज्यांमध्ये सामायिक करता येईल. डिजिटल सेतू बनवून त्याच्या माध्यमातून माहितीचे प्रसारण करणे शक्य होईल. तसेच दूरदर्शनवरून ‘एक भारत श्रेष्ठ भारत’ याविषयी साप्ताहिक कार्यक्रमाचे प्रसारण करणे शक्य आहे. सहसचिव नीता प्रसाद यांनी सुचविले की, प्रत्येक मंत्रालयाने त्यांच्या आगामी महिन्यातल्या कृती योजना तयार करून त्याची रूपरेषा माहिती आणि प्रसारण मंत्रालयाकडे व्यापक प्रसिद्धीसाठी देण्यात यावी.  

रेल्वे मंत्रालयाच्या कार्यकारी संचालक वंदना भटनागर यांनी आपल्या खात्याच्यावतीने ‘एक भारत श्रेष्ठ भारत’च्या विविध कार्यक्रमामध्ये सहभागी होत असलेल्या विद्यार्थ्‍यांना कोणकोणत्या सवलती दिल्या जातात, याची माहिती दिली. तसेच रेल्वेच्या मालमत्तेवर लोगो लावणे, व्हिडिओ डिस्प्ले यांचे प्रदर्शन करणे या कामांचीही माहिती दिली. आता यापुढेही रेल्वे गाड्या नियमित वेळापत्रकाप्रमाणे धावण्यास प्रारंभ झाल्यानंतर आणखी नवीन उपक्रम राबविण्यात येतील, असे सांगितले. 

यावेळी गृह मंत्रालय, संरक्षण मंत्रालय, संसदीय कामकाज मंत्रालय आणि क्रीडा विभागातल्या अधिका-यांनी टाळेबंदीच्या आधी राबवण्यात आलेल्या उपक्रमांची आणि प्रस्तावित कार्यक्रमांची माहिती दिली. 

या बैठकीच्या अखेरीस सचिवांनी आढावा घेवून महत्वपूर्ण कृतीशील बाबींचा सारांश जाहीर केला तो पुढीलप्रमाणे आहे:- 

  1. प्रत्येक सहभागी मंत्रालय आणि विभागाने ‘एक भारत श्रेष्ठ भारत’ उपक्रमासाठी डिजिटल माध्यमाकडे वाटचाल करावी. 
  2. उपक्रमाच्या व्यापक प्रसिद्धी, प्रसारासाठी ‘एक भारत श्रेष्ठ भारत’ या संकल्पनेवर वेबिनारचे आयोजन करणे. 
  3. प्रत्येक मंत्रालयाच्यावतीने वापरण्यात येणा-या ‘एक भारत श्रेष्ठ भारत’ या डिजिटल स्त्रोतासाठी सामायिक ‘रिपॉजिटरी’ वापरणे. ही ‘रिपॉजिटरी’ सामान्य पोर्टलवर होस्ट केली जावू शकते. 
  4. एक सुधारित संपर्क यंत्रणा राबविण्याची योजना तयार करून दूरदर्शनच्या माध्यमातून 30 मिनिटांचा साप्ताहिक कार्यक्रम प्रसारित करणे. यासाठी सर्व मंत्रालयांकडून माहितीची आकडेवारी घेवून त्यावर आधारित माहिती उपलब्ध करून देणे.

* * *

B.Gokhale/S.Bedekar/D.Rane

 

 

सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा@PIBMumbai   Image result for facebook icon /PIBMumbai    /pibmumbai  pibmumbai[at]gmail[dot]com


(Release ID: 1627512) Visitor Counter : 336