रस्ते वाहतूक आणि महामार्ग मंत्रालय

पावसाळ्यापूर्वी राष्ट्रीय महामार्गांची स्थिती चांगली करण्यासाठी ‘एनएचएआय’ची सिद्धता

Posted On: 27 MAY 2020 6:36PM by PIB Mumbai

नवी दिल्ली, 27 मे 2020

राष्ट्रीय महामार्ग खड्डेरहीत व वाहतुकीसाठी चांगले असावेत यासाठी पावसाळ्यापूर्वी प्राधान्याने महामार्गांच्या देखभालीची कामे पूर्ण करण्यात यावीत, असे निर्देश ‘एनएचएआय’ म्हणजेच राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणाने आपल्या प्रादेशिक अधिकारी वर्गाला व प्रकल्प संचालकांना दिले आहेत. पावसाने जोर धरण्यापूर्वीच रस्त्यांच्या दुरूस्तींची कामे करून महामार्ग खड्डेरहीत करून, ते वाहतुकीसाठी योग्य असावेत, ही सर्व कामे येत्या 30 जून, 2020 पर्यंत पूर्ण करण्यात यावीत, असे स्पष्ट करण्यात आले आहे.

कोणत्या महामार्गाचे, किती, कुठे व किती वेगाने काम करायचे आहे, याविषयी महामार्ग प्राधिकरणाने नवीन मार्गदर्शक धोरण तयार केले आहे. त्याच्या मदतीने प्राधिकरणाचे प्रादेशिक अधिकारी व प्रकल्प संचालकांनी महामार्ग देखभालीच्या कामांची प्रक्रिया प्राधान्याने पूर्ण करावी, असे निर्देश देण्यात आले आहेत. यासाठी महामार्ग दुरूस्तींच्या कामांचे सखोल नियोजन तसेच योग्य अंमलबजावणीचे लक्ष्य ठेवण्यात आले आहे.

महामार्ग दुरूस्तींची कामे पूर्ण करण्यासाठी प्रादेशिक अधिकाऱ्यांना त्वरित निर्णय घेणे शक्य व्हावे, यासाठी आर्थिक अधिकारही देण्यात आले आहेत. तसेच प्रकल्प संचालकांना 'कार हायवे कॅमेरा', 'ड्रोन','नेटवर्क सर्व्हे व्हेईकल'-(एनएसव्ही),यासारख्या तंत्रज्ञान व साधनांचा वापर करून महामार्गाच्या सद्यस्थितीचे मूल्यांकन करण्यात यावे, असा सल्ला देण्यात आला आहे. यामुळे महामार्गावर पडलेल्या फटी, भेगा, खड्डे यांची कामे लवकर करून, तो रस्ता सुधारणे शक्य होणार आहे.

प्रत्यक्ष रस्ता दुरूस्तीचे काम करून घेणाऱ्या अधिकाऱ्यांनी कामासंबंधीचे वेळापत्रक निश्चित करावे व त्यानुसार दुरूस्तीच्या कामाची नियमित देखरेख करण्याचे निर्देशही  दिले आहेत. तसेच या अधिकाऱ्यांनी नियमित कालावधीनंतर प्राधिकरणाला रस्ते दुरूस्ती कामाचा अहवाल पाठवण्याच्या सूचना करण्यात आल्या आहेत.

महामार्ग दुरूस्तीच्या कामाच्या प्रगतीचा आढावा एनएचएआयच्या मुख्यालयामार्फत घेण्यात येणार आहे. यासाठी प्रकल्प व्यवस्थापन ‘सॉफ्टवेअर- डेटा लेक’ याच्या मदतीने ज्या महामार्गाची दुरूस्ती केली जात आहे, त्याची आधीची स्थिती व दुरूस्तीच्या कामानंतरची स्थिती यासंबंधीची माहिती अपलोड करण्यात येत आहे. त्यामुळे नेमके किती व कसे काम झाले, हे एनएचएआयला समजू शकणार आहे.

 

S.Pophale/S.Bedekar/P.Malandkar

 

 

 

 

सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा@PIBMumbai   Image result for facebook icon /PIBMumbai    /pibmumbai  pibmumbai[at]gmail[dot]com


(Release ID: 1627209) Visitor Counter : 297