शिक्षण मंत्रालय

राष्ट्रीय चाचणी सराव अॅपची सुविधा सुरु झाल्यापासून 72 तासांच्या आत 2 लाखांपेक्षा जास्त विद्यार्थ्यांनी हे अॅप डाऊनलोड केले – रमेश पोखरीयाल “निशंक”

Posted On: 22 MAY 2020 10:45PM by PIB Mumbai

 

जेईई तसेच नीट आणि इतर स्पर्धा परीक्षा देण्यासाठी अभ्यासाची तयारी करीत असलेल्या विद्यार्थ्यांमध्ये एनटीए अर्थात राष्ट्रीय चाचणी संस्थेने स्पर्धा परीक्षांच्या सरावासाठी तयार केलेले राष्ट्रीय चाचणी अभ्यास अॅप अल्पावधीतच अत्यंत लोकप्रिय झाले आहे अशी माहिती केंद्रीय मनुष्यबळ विकास मंत्री रमेश पोखरीयाल “निशंक” यांनी गुरुवारी दिली. या अॅपची सुविधा सुरु केल्यानंतर पहिल्या 72 तासांपेक्षा कमी कालावधीत 2 लाखांपेक्षा जास्त विद्यार्थ्यांनी हे अॅप डाऊनलोड केले असे त्यांनी सांगितले. तसेच 80 हजारांपेक्षा जास्त विद्यार्थ्यांनी जेईई (मेन्स) आणि नीट या स्पर्धा परीक्षांच्या मॉक टेस्ट्स सुद्धा दिल्या आहेत अशी माहिती देखील त्यांनी दिली. विद्यार्थी सर्वाधिक मॉक टेस्ट्स सकाळी 10 ते 12 या वेळात देतात असे निरीक्षण त्यांनी नोंदविले.

या अॅपची तपशीलवार माहिती देताना केंद्रीय मंत्री पोखरियाल यांनी सांगितले की दर वर्षी  जेईई (मेन्स) तसेच नीट आणि इतर स्पर्धा परीक्षा देणाऱ्या विद्यार्थ्यांचे प्रमाण मोठे आहे मात्र त्यापैकी बऱ्याच विद्यार्थ्यांना या परीक्षेच्या अभ्यासासाठी खासगी शिकवण्या लावणे शक्य नसते. अशा विद्यार्थ्यांची गरज लक्षात घेऊन एनटीएने त्यांना स्पर्धा परीक्षांसाठीचा अभ्यास करता यावा यासाठी हे अॅप सुरु केले आहे.

प्रश्नपत्रिका डाऊनलोड करून घेतल्यानंतर विद्यार्थ्यांना ती सोडविण्यासाठी तीन तासाचा अवधी मिळेल असे त्यांनी पुढे सांगितले. ही चाचणी सराव परीक्षा देण्यासाठी इंटरनेट सुविधेची आवश्यकता भासणार नाही.

या अॅपची सुरुवात करून भारताने महत्वाच्या परीक्षांच्या तयारी प्रक्रियेमध्ये सुसूत्रता आणण्याच्या दिशेने अत्यंत उल्लेखनीय पाऊल टाकले आहे, असे पोखरियाल यांनी सांगितले. सध्याच्या अभूतपूर्व आरोग्यविषयक संकटातून मार्ग काढत असताना विद्यार्थ्यांना स्पर्धा परीक्षांच्या तयारीसाठी या अॅपची खूप मदत होईल. या अॅपद्वारे सर्वात सत्य, निःपक्षपाती आणि जलद निर्णय देणारी जगातील सर्वात मोठी आभासी परीक्षा प्रणाली निर्माण करणे हे आपले लक्ष्य आहे असे त्यांनी सांगितले.

हे अॅप सध्या अँड्रॉईड मंचावर उपलब्ध असून लवकरच ते आयओएस मंचावर देखील उपलब्ध होईल, विद्यार्थ्यांना गुगल प्ले स्टोअर वरून ते निःशुल्क डाऊनलोड करता येईल असे त्यांनी सांगितले. या अॅपवर उपलब्ध असलेल्या चाचणी परीक्षा दिल्यानंतर विद्यार्थ्यांना त्यांनी दिलेल्या उत्तरांचे मूल्यांकन करून मिळणार आहे तसेच प्रश्नपत्रिकेत विचारलेल्या प्रत्येक प्रश्नाचे उत्तर स्पष्टीकरणासह उपलब्ध असल्याने विद्यार्थ्यांना ती उत्तरे समजून घेणे सोपे होईल. या स्पर्धा परीक्षा देऊ इच्छिणाऱ्या सर्व विद्यार्थ्यांना पोखरियाल यांनी शुभेच्छा दिल्या आहेत.

******

B.Gpkhale/Sanjana Chitnis/P.Kor

***

सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा@PIBMumbai   Image result for facebook icon /PIBMumbai    /pibmumbai  pibmumbai[at]gmail[dot]com


(Release ID: 1626365) Visitor Counter : 316