आरोग्य आणि कुटुंब कल्याण मंत्रालय

अलिप्त राष्ट्र चळवळीच्या सभासद राष्ट्रांच्या आरोग्यमंत्र्यांच्या बैठकीत डॉ. हर्षवर्धन व्हिडीओ कॉन्फरन्सिग च्या माध्यमातून सहभागी


‘वसुधैव कुटुंबकम’ या भारतीय तत्वाचे मह्त्व अधोरेखित

Posted On: 20 MAY 2020 5:58PM by PIB Mumbai

अलिप्त राष्ट्र चळवळ गटांच्या (NAM) आरोग्य मंत्र्यांच्या बैठकीत आज केंद्रीय आरोग्यमंत्री डॉ हर्षवर्धन व्हिडीओ कॉन्फरन्सच्या माध्यमातून सहभागी झाले होते. अझरबैजानचे आरोग्यमंत्री ओग्ते शिरालीयेव यांच्या अध्यक्षतेखाली ही बैठक झाली.

संपूर्ण जगात कोविड-19 या साथीच्या आजाराने थैमान घातले असतांना आणि जगभरातील नागरिक तसेच त्यांच्या रोजगारावर या आजाराचे विपरीत परिणाम होत असल्याच्या पार्श्वभूमीवर, ही नाम परिषद आयोजित करण्यात आली होती. कोविड-19 च्या रूपाने जगासमोर उभे राहिलेल्या संकटाबद्दल सर्व सदस्यांनी चिंता व्यक्त केली आणि सुनियोजित तयारी, प्रतिबंधक उपाययोजना, प्रतिकारशक्ती वाढवणे आणि  राष्ट्रीय, प्रादेशिक  तसेच आंतरराष्ट्रीय पातळीवर अधिक समन्वय साधून एकत्रितपणे या आजाराचा सामना करण्याचा निश्चय सर्व सदस्यांनी व्यक्त केला.

 

या परिषदेत डॉ हर्षवर्धन यांनी मांडलेले विचार पुढीलप्रमाणे :--

परिषदेचे अध्यक्ष आणि उपस्थित बंधू-भागींनीनो!

मी सर्व प्रथम ही महत्वाची परिषद योग्य वेळी आयोजित केल्याबद्दल अझरबैजानच्या आरोग्यमंत्र्यांचे मी आभार मानतो.

सध्याचा काळ हा आपल्या वसुंधरेच्या इतिहासातील अभूतपूर्व असा काळ आहे, यात शंका नाही. कोविड-19 मुळे आतापर्यंत जगभरात 3,00,000 लोकांचा बळी गेला आहे. चाळीस लाख पेक्षा अधिक लोकांना याचा संसर्ग झाला असून अब्जावधी लोकांचा रोजगार यामुळे गेला आहे. ज्या लोकांनी या आजारात आपल्या जवळच्या माणसांना गमावले आहे, त्या कुटुंबांप्रती मी आपल्या शोक संवेदना व्यक्त करतो.

आपण एकमेकांशी किती जोडले गेले आहोत आणि परस्परांवर किती अवलंबून आहोत, याची जाणीव आपल्याला कोविड-19 मुळे झाली आहे. मानवाने निर्माण केलेली आव्हाने- जशी हवामान बदल आणि सार्वजनिक आरोग्यासारख्या आपतकालीन स्थितीच्या संकटांची जाणीव आपल्याला झाली आहे, आणि अशा संकटांचा सामना आपल्याला वेगवेगळा नाही, तर एकत्रित येऊनच करावा लागेल, हे ही यामुळे अधोरेखित झाले आहे. यासाठी समन्वयाची गरज आहे, बळजबरीची नाही.

या संकटामुळे आपल्याला हे ही कळले आहे, की जागतिक प्रशासकीय संस्थांनी अधिक लोकशाहीभिमुख, पारदर्शक आणि विश्वासार्ह तसेच प्रभावी प्रतिनिधीत्व करण्याची गरज आहे. बहुराष्ट्रीयत्वाच्या संकल्पनेत सुधारणा करण्याची हीच योग्य वेळ आहे.

भारत आज एका दृढ इच्छ्शक्तीने कोविडचा लढा देतो आहे. आमचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी ह्या संकटाचा सामना करतांना वेग, व्याप्ती आणि दृढसंकल्प या सर्वांचा योग्य मेळ साधला आहे. या विषाणूचा प्रभाव कमी करण्यासाठी जे जे करणे शक्य होते, ती सगळी पावले भारताने उचलली आहे. कोविड कडे लक्ष देतांना इतर आजारांकडे दुर्लक्ष होणार नाही, याचीही आम्ही दक्षता घेत आहोत.

या दृढ राजकीय इच्छाशक्तीच्या नेतृत्वाखाली 135 कोटी जनतेने एकत्र येऊन लॉकडाऊनचे पालन करुन हा विषाणूचा संसर्ग आणि मृत्यूदर आटोक्यात ठेवला आहे. रुग्ण शोधणे, मोठ्या प्रमाणावर अलगीकरण, त्वरित उपचार अशा सर्व उपाययोजनांमुळे कोविड चे प्रमाण नियंत्रणात आहे.

भारतात चांगली आरोग्य यंत्रणा असूनही कोविड चा संसर्ग सुरु झाल्यावर आम्ही अधिक वेगाने कामाला लागलो आणि देशभरात 10,000  कोविड समर्पित रुग्णालये आणि केअर सेन्टर्स उभारली. 20 लाख पेक्षा जास्त आरोग्य सेवकांची फळी निर्माण केली. आणि आता आम्ही या लढ्यात मागे हटणार नाही.

आम्ही इतर देशांनाही आवश्यक ती सर्व मदत दिली आहे. विशेषतः आमच्या देशातील गरजांचा पुरवठा करुन, संपूर्ण जगात 123 देशात आम्ही औषधांचा पुरवठा केला आहे, यात नामचे 59 सदस्य देश देखील आहेत. लस शोधण्याच्या प्रयत्नातही आमचा मोठा सहभाग आहे.

कोविडच्या लढ्यात आम्ही नामच्या सर्व सदस्य राष्ट्रांसोबत एकत्रित पावले उचलण्यास कटिबद्ध आहोत. 4 मे रोजी झालेल्या नाम च्या बैठकीत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केवळ नामचे सदस्यच नव्हे तर, संपूर्ण जगासोबत या लढ्यात सहभागी असल्याची वचनबद्धता व्यक्त केली होती. “वसुधैव कुटुंबकम” या तत्वावर आमचा विश्वास असून आम्ही ते आचरणातही आणतो. 

विकसनशील देश म्हणून बघितल्यास आपल्या देशातील जनतेला या संकटाचा मोठा फटका बसला आहे. आपले भागधेय आता एकमेकांशी जोडले गेले आहे, याची आपण जाणीव ठेवायला हवी, यापुढचा प्रवास एकत्रितपणे करण्यावर भारताचा विश्वास आहे.

या भाषणाचा शेवट करण्यापूर्वी जगभरात जे कोविडच्या या लढ्यात आघाडीवर उभे राहून लढत आहेत, अशा सर्व कोविड योध्यांचे मी अभिनंदन करतो, त्यांच्याप्रती आणि त्यांच्या कुटुंबियांप्रती कृतज्ञता व्यक्त करतो. त्यांनी आपल्याला एक धडा शिकवलेला आहे, तो धडा म्हणजे—“सर्व आर्थिक विकासाचा पाया मानवकल्याण आहे हे कधीही विसरु नका”.

धन्यवाद !’

****

B.Gokhale/R.Aghor/P.Kor

***

सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा@PIBMumbai   Image result for facebook icon /PIBMumbai    /pibmumbai  pibmumbai[at]gmail[dot]com


(Release ID: 1625577) Visitor Counter : 300