पर्यटन मंत्रालय

‘देखो अपना देश’ या मालिकेमध्ये ‘म्हैसूर: क्राफ्ट कारवाँ ऑफ कर्नाटक’ या वेबिनारच्या माध्यमातून म्हैसूरची शतकांपूर्वीची हस्तकला पर्यटन मंत्रालयाकडून सादर

Posted On: 15 MAY 2020 7:58PM by PIB Mumbai

नवी दिल्ली, 15  मे 2020

भारताकडे असलेला समृद्ध हस्तकलेचा वारसा प्रदर्शित करण्यासाठी आणि पर्यटकांना सध्याच्या काळात पर्यटनाचा अनुभव घेता यावा यासाठी पर्यटन मंत्रालयाने ‘देखो अपना देश’ या शीर्षकाअंतर्गत एक मालिका तयार केली आहे. या मालिकेतल्या ‘म्हैसूर: क्राफ्ट कारवाँ ऑफ कर्नाटक’ या वेबिनारच्या माध्यमातून म्हैसूर शहराच्या आजूबाजूला गेल्या अनेक शतकांपासून हस्तकलेच्या वस्तू परंपरागत पद्धतीने बनवल्या जातात, त्याची माहिती अतिशय मनमोहक पद्धतीने सादर केली. यामध्ये चन्नापटना खेळणी, रोजवूडच्या मदतीने बनवलेली हस्तकला, यांचा समावेश होता.

‘देखो अपना देश’  या वेबिनारचे दि. 14 मे, 2020 रोजी 19 वे सत्र पार पडले. याच्या आयोजनामध्ये बंगलोर एनआयएफटीच्या संचालिका सुसान थॉमस, संस्थेचे व्याख्याते डॉ. यतींद्र लक्काना आणि शिल्पा राव यांनी सहभाग घेतला होता. त्यांनी भारतामधल्या  हातमाग आणि हस्तशिल्प यांची  समृद्ध परंपरा अधोरेखित केली. तसेच इथली हस्तकला, हस्तशिल्प परंपरा अधिक लोकांपर्यंत पोहोचवण्यासाठी  याविषयानुरूप पर्यटन योजना बनवण्याची आवश्यकता आहे. पर्यटनाच्या नकाशावर आपल्या देशातल्या प्राचीन हस्तकला, शिल्पकलेला मानाचे स्थान मिळण्यासाठी त्यामुळे मदत होणार असल्याचे त्यांनी सांगितले. या सादरीकरणामध्ये म्हैसूर शहराची यात्रा करणा-या पर्यटकांसाठी, पाहुण्या मंडळींना पडद्यामागच्या कथा, शिल्पकारांची गावे दाखवून गावात जाण्याची संधीही विशद केली. ज्यांनी म्हैसूरसाठी अनेक प्रकारच्या शिल्पांचे जतन आणि संवर्धन करण्यास मदत केली आहे, त्यांच्या भेटी घेण्याच्या संधी असल्याचेही सांगितले.

हस्तकला हा केवळ भारताचा समृद्ध वारसा आणि सांस्कृतिक भाग आहे, असे नाही तर अर्थव्यवस्थेचा मध्यवर्ती भागही बनू शकतो. पंतप्रधानांनी ‘आत्मनिर्भर भारत’ बनवण्याचे आवाहन केले आहे, त्याचे महत्व लक्षात घेवून हस्तकला पर्यटनाचा उद्देश निश्चित करण्याची गरज आहे. मात्र यासाठी पर्यावरणाच्या समस्यांविषयी तडजोड करणे योग्य ठरणार नाही. समाजाला मदत करणे, रोजगाराच्या संधी निर्माण करणे आणि सामाजिक एकात्मता वृद्धिंगत करणे याच बरोबर पर्यटकांना अनोखा अनुभव मिळवून देणे हा उद्देश अशा पर्यटनाचा  आहे, हे स्पष्‍ट केले.  भारतीय पारंपरिक हस्तशिल्पांमध्ये गावांना आणि शहरांनाही आर्थिक महाशक्ती बनवण्याची क्षमता आहे, असं सांगितलं.

‘देखो अपना देश’ या वेबिनार मालिकेला दि. 14 एप्रिल, 2020 रोजी प्रारंभ झाला. आत्तापर्यंत या शृंखलेमध्ये 19 सत्रांचे आयोजन करण्यात आले. त्यामधून संपूर्ण देशभरातल्या विविध पर्यटन उत्पादनांचे आणि वेगवेगळ्या अनुभवांचे प्रदर्शन करण्यात आले. आत्तापर्यंत या मालिकेने 86,456 दर्शकांना  आकर्षित केले आहे.

इलेक्ट्रॉनिक्स आणि माहिती तंत्रज्ञान मंत्रालयाने तयार केलेल्या राष्ट्रीय ई-गर्व्हनन्स विभाग (एनईजीडी) यांनी ‘देखो अपना देश’ या वेबिनारच्या आयोजनामध्ये तंत्रज्ञानाची मदत केली. तसेच या मालिकेला डिजिटल व्यासपीठाचा उपयोग करून देण्यासाठीही  मदत केली आहे.  त्याचबरोबर या वेबिनारमध्ये सहभागी होत असलेल्या दर्शक नागरिकांबरोबर संवाद साधण्याचे कार्य प्रभावीपणे करण्यात आले.

भारत सरकारच्या पर्यटन मंत्रालयाच्यावतीने ‘ देखो अपना देश’ या वेबिनारच्या माध्यमातून नागरिकांशी जोडताना, त्यांनाही काही रचनात्मक सहयोग देता यावा, यासाठी आणि ‘देखो अपना देश’ हा ब्रँड तयार करण्यासाठी एक लोगो डिझाईन करण्याची स्पर्धा आयोजित करण्यात आली आहे. ‘मायगव्हडॉटइन’ वर इच्छुक नागरिकांनी आपण बनवलेल्या प्रवेशिका पाठावयाच्या आहेत. या स्पर्धेत सहभागी होण्याची अखेरची तारीख 16 मे, 2020 आहे.

या वेबिनारची सर्व सत्रे आता https://www.youtube.com/channel/UCbzIbBmMvtvH7d6Zo_ZEHDA/featuredयावर उपलब्ध आहेत.  त्याचबरोबर भारत सरकारच्या पर्यटन मंत्रालयाच्या सर्व समाज माध्यमांच्या ‘हँडल’वर सर्व सत्रे उपलब्ध आहेत.

यापुढचे नवीन वेबिनार दि. 16 मे 2020 रोजी सकाळी 11.00 वाजता आहे. त्याचे शीर्षक ‘‘उत्तराखंडः सिंपली हेवन’’ असे आहे. नागरिकांनी पुढील संकेतस्थळावर नोंदणी करावी. https://bit.ly/UttarakhandDAD

B.Gokhale/S.Bedekar/P.Malandkar

 

 

 

 

सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा@PIBMumbai   Image result for facebook icon /PIBMumbai    /pibmumbai  pibmumbai[at]gmail[dot]com



(Release ID: 1624172) Visitor Counter : 185