शिक्षण मंत्रालय

वेबिनारच्या माध्यमातून केंद्रीय मनुष्यबळ विकास मंत्र्यांनी देशभरातील शिक्षकांशी साधला संवाद


नवोदय विद्यालयभरती प्रक्रिया पूर्ण केलेल्यांना लॉकडाऊननंतर नियुक्ती मिळेल - रमेश पोखरियाल 'निशंक'

राष्ट्रीय पात्रता चाचणी (नेट) 2020 च्या परीक्षेची तारीख लवकरच जाहीर होणार - रमेश पोखरियाल निशंक

Posted On: 14 MAY 2020 5:34PM by PIB Mumbai

 

केंद्रीय मनुष्यबळ विकास मंत्री रमेश पोखरियाल 'निशंक' यांनी नवी दिल्लीत आज वेबिनारच्या माध्यमातून देशभरातील शिक्षकांशी संवाद साधतांना ‘आचार्य देवो भव’ हा संदेश दिला. विद्यार्थ्यांमध्ये आणि समाजात मोठ्या प्रमाणात कोविड -19  संबंधित जनजागृती केल्याबद्दल त्यांनी सर्व शिक्षकांप्रति आभार व्यक्त केले. मोठ्या संख्येने शिक्षक वेबिनारमध्ये सामील झाले आणि त्यांनी केंद्रीय मंत्र्यांना प्रश्न विचारले.

या वेबिनार दरम्यान केंद्रीय मंत्र्यांनी दोन मोठ्या घोषणा केल्या. एका प्रश्नाच्या उत्तरात ते म्हणाले की, नेटची परीक्षा तारीख लवकरच जाहीर केली जाईल. ज्यानी नवोदय विद्यालयाची भरती प्रक्रिया पूर्ण केली आहे त्यांना लॉकडाऊननंतर नियुक्ती मिळणार असल्याचेही त्यांनी जाहीर केले.

केंद्रीय मंत्र्यांनी आपल्या वेबिनारद्वारे सर्व शिक्षकांना कर्तव्य बजावण्याचे व लॉकडाऊन परिस्थितीतही विद्यार्थ्यांचे शैक्षणिक कल्याण करण्याचे आवाहन केले. ते म्हणाले की, भारतात  गुरूचे महत्त्व नेहमीच देवापेक्षा अधिक राहिले आहे आणि म्हणूनच आपण आचार्य देवो भव हा भाव ठेवून शिक्षकांचा आदर केला पाहिजे. ते पुढे म्हणाले की, या संकटात शिक्षकांनीही लढवय्या योद्ध्याचे कर्तव्य बजाविले आहे त्यामुळे त्यांच्या कार्याचे विशेष कौतुक आहे.

सध्या देश अभूतपूर्व अशा आरोग्य विषयक आणिबाणीच्या परिस्थितीतून जात आहे. पालक आणि विद्यार्थी दोघांनाही आपापल्या विवंचना आहेत. अशावेळी शिक्षकांची जबाबदारी वाढते कारण ते एकाच वेळी बर्‍याच मुलांचे पालक असतात आणि त्यांना कोणताही पक्षपात न करता प्रत्येकाची काळजी घ्यावी लागते. देशभरातील शिक्षकांनी त्यांची जबाबदारी यशस्वीरीत्या पार पाडल्याबद्दल ते कौतुकास पात्र आहेत असे पोखरीयाल यांनी सांगितले.

शिक्षकांनी केलेल्या प्रयत्नांमुळे देशातील ऑनलाईन शिक्षण व्यवस्था यशस्वी झाली आहे. बरेच शिक्षक तंत्रज्ञानामध्ये तज्ञ नव्हते परंतु तरीही त्यांनी विद्यार्थ्यांच्या हितासाठी स्वत: प्रशिक्षण घेतले आणि ऑनलाइन शिक्षणामध्ये योगदान दिले. संकटाच्या काळात हे सिद्ध झाले आहे की जर देशातील शिक्षक बलवान आणि जबाबदार असतील तर तो देश नेहमीच विकासाच्या मार्गावर जाईल असे संवादादरम्यान पोखरीयाल यांनी सांगितले. कोरोना विषाणूमुळे दिल्लीतील प्राथमिक शाळेतील शिक्षकाच्या मृत्यूबद्दल केंद्रीय मंत्र्यांनी शोक व्यक्त केला.

लॉकडाऊन नंतर शाळा सुरू करण्याच्या प्रश्नाला उत्तर देताना मंत्र्यांनी माहिती दिली की शाळा प्रशासन आणि शिक्षक हे शाळा स्तरावर सर्व संबंधितांच्या विशिष्ट भूमिका व जबाबदाऱ्या निश्चित करणे, आरोग्य व स्वच्छता आणि इतर गोष्टी निश्चित करणे यासारखी विविध कामे पार पाडतील. तसेच शाळा उघडण्यापूर्वी आणि नंतर सुरक्षिततेचे नियम किंवा मानक कार्यप्रणाली (एसओपी), शाळेचे वेळापत्रक आणि नव्या अभ्यासक्रमाच्या योजनांची नव्याने व्याख्या किंवा सुधारणा  करणे, लॉकडाऊन दरम्यान विद्यार्थ्यांना घरबसल्या शाळेतून औपचारिक शालेय शिक्षणात सहज संक्रमण आणि विद्यार्थ्यांचे भावनिक कल्याण सुनिश्चित करणे इत्यादी गोष्टींची काळजी शिक्षक आणि शाळा प्रशासनाला घ्यावी लागेल असे त्यांनी सांगितले.

ते पुढे म्हणाले की शाळा सूची तयार करेल जेणेकरुन त्यात काहीही उणीव राहणार नाही. सीबीएसई लवकरच ही सूची सामायिक करणार आहे.

शिक्षकांच्या नेमणुकीवरील  प्रश्नाला उत्तर देताना मंत्री म्हणाले की केंद्रीय विद्यालयांमध्ये 8,000 हून अधिक नेमणुका झाल्या आहेत आणि जवळपास 2,500 नियुक्ती नवोदय विद्यालयांमध्ये केल्या आहेत. ते म्हणाले की, विद्यापीठांमध्ये 1200 हून अधिक शिक्षकांची नेमणूक करण्यात आली आहे. लॉकडाऊन संपल्यानंतर नवोदय विद्यालयाच्या भरती प्रक्रियेत निवड झालेल्या शिक्षकांना नियुक्तीपत्रे मिळतील. पोखरीयाल म्हणाले की शिक्षकांची पदे रिक्त ठेवू नयेत असे आमच्या सरकारचे मत आहे आणि लवकरच रिक्त जागा भरण्यासाठी मंत्रालय सर्व शक्य पावले उचलत आहे.

शिक्षकांना प्रशिक्षण देण्याच्या प्रश्नाला उत्तर देताना पोखरीयाल म्हणाले की, ऑनलाइन शिक्षण प्रणालीसाठी पूर्ण तयारीनिशी प्रशिक्षण सुरु असून लाखो शिक्षकांनी याचा लाभ घेतला आहे. ई-लर्निंग संसाधनांच्या वापरासाठी पंडित मदन मोहन मालवीय राष्ट्रीय शिक्षक प्रशिक्षण अभियानांतर्गत शिक्षकांचे प्रशिक्षण आयोजित करण्यात आले आहे. या प्रशिक्षण कार्यक्रमांमध्ये शिक्षकांचा सहभाग वाढल्याचेही मंत्र्यांनी सांगितले. विद्यार्थ्यांना शिकवण्यासाठी स्वत:ला नवीन तंत्रज्ञानाशी जोडण्याची तयारी शिक्षकांनी दर्शविली आहे.

सुरक्षित शारीरिक अंतर नियमांसंबंधीच्या आरोग्य विभागाच्या मार्गदर्शक सूचनांचे धैर्यपूर्वक पालन केल्याबद्दल आणि विद्यार्थी आणि पालकांना या मार्गदर्शक तत्त्वांचे अनुसरण करण्यास प्रवृत्त केल्याबद्दल या सत्राची सांगता करताना मंत्र्यांनी सर्व शिक्षकांचे आभार मानले. कोविड-19 विरोधातील या लढ्यात प्रामाणिकपणे सहभाग घेतल्याबद्दल त्यांनी शिक्षकांचे आभार मानले. शिक्षणविषयक कोणत्याही महत्त्वाच्या मुद्द्यांबाबत ट्विटर व फेसबुकवर सूचना पाठवाव्यात असे आवाहन त्यांनी सर्व शिक्षकांना केले.

Acharya Devo Bhava : Interacting with teachers from across India #EducationMinisterGoesLive https://t.co/F9dBJlWubP

— Dr Ramesh Pokhriyal Nishank (@DrRPNishank) May 14, 2020

****

G.Chippalkatti/V.Joshi/P.Kor

***

सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा@PIBMumbai   Image result for facebook icon /PIBMumbai    /pibmumbai  pibmumbai[at]gmail[dot]com


(Release ID: 1623893) Visitor Counter : 222