रेल्वे मंत्रालय

पंधरा दिवसांहून कमी कालावधीत “श्रमिक विशेष” गाड्यांच्या वाहतुकीद्वारे एकूण 10 लाखांपेक्षा जास्त प्रवाशांना त्यांच्या मूळ  राज्यांमध्ये पोहोचवून भारतीय रेल्वेने पार केला अत्यंत महत्त्वाचा टप्पा


भारतीय रेल्वेने 14 मे 2020 पर्यंत देशभरात कार्यान्वित केली 800 “श्रमिक विशेष” गाड्यांची वाहतूक सेवा

“श्रमिक विशेष” गाड्यांमध्ये प्रवाशांसाठी रेल्वे विभागाकडून मोफत जेवण आणि पाण्याची सोय

जे राज्य प्रवासी पाठविणार आणि ज्या राज्यात प्रवासी पोहोचणार अशा दोन्ही राज्यांच्या संमतीनंतरच रेल्वे विभागाकडून या श्रमिक गाड्यांची वाहतूक सुरु

Posted On: 14 MAY 2020 5:01PM by PIB Mumbai

 

कोविड-19 विषाणू संसर्गामुळे देशभरात जारी करण्यात आलेल्या लॉक डाऊनमुळे स्थलांतरित मजूर, यात्रेकरू, पर्यटक, विद्यार्थी आणि इतर अनेक नागरिक काही कारणांनी  देशाच्या विविध भागात अडकून पडले आहेत. त्या सर्वांना त्यांची मूळ गावे असलेल्या राज्यांमध्ये  पोहोचविण्यासाठी विशेष रेल्वे गाड्यांची व्यवस्था करावी या  केंद्रीय गृह मंत्रालयाने जारी केलेल्या आदेशानुसार भारतीय रेल्वे विभागाने “श्रमिक विशेष” गाड्या चालवण्याचा निर्णय घेतला आहे.

त्यानुसार सुरु झालेल्या गाड्यांच्या वाहतुकीद्वारे आज 14 मे 2020 पर्यंत  देशाच्या विविध राज्यांमधून एकूण 800 “श्रमिक विशेष” गाड्यांची सेवा कार्यान्वित झाली. या विशेष गाड्यांमधून प्रवास करून आतापर्यंत 10 लाखांपेक्षा जास्त प्रवासी आपापल्या मूळ राज्यांमध्ये परतले आहेत. जे राज्य प्रवाशांना पाठविणार आणि ज्या राज्यांमध्ये प्रवासी पोहोचणार अशा दोन्ही राज्य सरकारांचे प्रवासी पाठवण्याच्या मुद्द्यावर एकमत होऊन त्यांनी प्रवासाला संमती दिल्यानंतरच रेल्वे विभाग या विशेष गाड्यांची वाहतूक सुरु करत आहे.

मूळ गाव असलेल्या राज्यात पोहोचू इच्छिणाऱ्या प्रवाशांना घेऊन या 800 “श्रमिक विशेष” गाड्या  आंध्रप्रदेश, बिहार, छत्तीसगड, हिमाचल प्रदेश, जम्मू आणि काश्मीर, झारखंड, कर्नाटक, मध्य प्रदेश, महाराष्ट्र, मणिपूर, मिझोरम, ओदिशा, राजस्थान, तामिळनाडू, तेलंगणा, त्रिपुरा, उत्तरप्रदेश, उत्तराखंड आणि पश्चिम बंगाल अशा विविध राज्यांमध्ये पोहोचल्या असून तेथे त्यांचा प्रवास संपूर्ण झाला आहे.

श्रमिक विशेष गाड्यांनी प्रवास करू इच्छिणाऱ्या सर्व प्रवाश्यांची व्यवस्थित तपासणी झाली आहे याची खात्री केल्यानंतरच त्यांना या  गाडी मध्ये प्रवेश देण्यात येतो आहे. प्रवासादरम्यान या  प्रवाश्यांना रेल्वे विभागाकडून मोफत भोजन आणि पाणी पुरविले जात आहे.

****

B.Gokhale/ S.Chitnis/P.Kor

***

सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा@PIBMumbai   Image result for facebook icon /PIBMumbai    /pibmumbai  pibmumbai[at]gmail[dot]com


(Release ID: 1623809) Visitor Counter : 269