सुक्ष्म, लघु आणि मध्यम उदयोग मंत्रालय

एमएसएमई क्षेत्रासाठी अर्थमंत्र्यांचे आर्थिक पॅकेज स्वदेशी उद्योगाला उर्जितावस्था देईल-गडकरी

Posted On: 13 MAY 2020 10:58PM by PIB Mumbai

 

केंद्रीय एमएसएमई आणि रस्ते वाहतूक आणि महामार्ग मंत्री नितीन गडकरी यांनी  अर्थमंत्र्यांनी आज  एमएसएमई क्षेत्रासाठी जाहीर केलेल्या मदतपर पॅकेजचे स्वागत केले. नागपुरातून दिलेल्या व्हिडिओ संदेशात ते म्हणाले की, हे पॅकेज स्थानिक स्वदेशी उद्योगाला नवसंजीवनीसह उर्जितावस्था प्राप्त करून देईल.

ग्रामीण उद्योगाची उलाढाल सुमारे 88 हजार कोटी रुपये झाली असून पुढील दोन वर्षांत ती  5 लाख कोटी रुपयांपर्यंत नेण्याची आमची महत्वाकांक्षा आहे असे गडकरी म्हणाले. आज घोषित केलेले प्रोत्साहन  पॅकेज हे लक्ष्य साध्य करण्यात मोठ्या प्रमाणावर मदत करेल असे ते म्हणाले. खादी उद्योग निर्यातीमध्ये प्रवेश करत असल्यामुळे खादी क्षेत्र यात मोठी भूमिका बजावेल.

एमएसएमई क्षेत्राची व्याख्या बदलल्याबद्दल त्यांनी आनंद व्यक्त केला. या क्षेत्रातील गुंतवणूकीची मर्यादा 100 कोटी रुपयांपर्यंत वाढवल्यामुळे तसेच आता बँकांकडून सुलभ वित्त पुरवठा मिळणार असल्यामुळे या उद्योगाला मोठी चालना मिळेल. या क्षेत्राकडून दीर्घकाळापासून या दुरुस्तीची मागणी केली जात होती, असे ते म्हणाले. 10 हजार कोटी रुपयांचा निधी असलेल्या फंड ऑफ फंड्सचा 25 लाखांहून अधिक तणावग्रस्त एमएसएमईंना फायदा होईल. त्याचप्रमाणे जागतिक निविदा निकषांमध्ये आणलेली सुलभता हे एक उल्लेखनीय पाऊल आहे, असे ते म्हणाले.  आता गणवेश वगैरेंसाठी  संरक्षण आणि पोलिसाकडून नवीन ऑर्डर्स  प्राप्त होतील अशी आशा त्यांनी व्यक्त केली.

11 कोटी पेक्षा अधिक लोकांना रोजगार देणाऱ्या आणि जीडीपीमध्ये जवळपास 29 टक्के योगदान असणार्‍या या क्षेत्राला मिळालेले हे आर्थिक पाठबळ या क्षेत्राचे भागधारक कधीच विसरणार नाहीत.  या पॅकेजच्या सहाय्याने एमएसएमई, ग्रामोद्योग आणि कुटीर उद्योग क्षेत्र नवी उंची गाठेल असा विश्वास त्यांनी व्यक्त केला.

 

M.Jaitly/S.Kane/P.Kor

***

सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा@PIBMumbai   Image result for facebook icon /PIBMumbai    /pibmumbai  pibmumbai[at]gmail[dot]com



(Release ID: 1623765) Visitor Counter : 187