शिक्षण मंत्रालय

केंद्रीय मनुष्यबळ विकासमंत्र्यांचा देशभरातील विद्यार्थ्यांशी वेबिनारच्या माध्यमातून संवाद


2020-21 या शैक्षणिक वर्षात आयआयटी, आयआयआयटीज आणि एनआयआयटीजच्या शुल्कात कोणतीही वाढ नाही- रमेश पोखरियाल निशंक

Posted On: 05 MAY 2020 4:08PM by PIB Mumbai

 

नवी दिल्ली, 5 मे 2020

 

केंद्रीय मनुष्यबळ विकासमंत्री रमेश पोखरियाल निशंक यांनी आज देशभरातील विद्यार्थ्यांशी एका वेबिनारच्या माध्यमातून संवाद साधला. या एक तासाच्या चर्चेमध्ये मंत्र्यांनी शाळांच्या परीक्षा, प्रवेश परीक्षा, शैक्षणिक वर्षाचे वेळापत्रक, ऑनलाईन शिक्षण, शुल्क, विद्यार्थ्यांचे मानसिक आरोग्य, आंतरराष्ट्रीय विद्यार्थी, फेलोशिप यांसारख्या विषयांशी संबंधित प्रश्न आणि समस्यांबाबत विद्यार्थ्यांनी विचारलेल्या प्रश्नांची उत्तरं दिली. देशातील विद्यार्थ्याचे कल्याण आणि शैक्षणिक व्यवहारांविषयी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना अतिशय चिंता असल्याचे मंत्र्यांनी यावेळी सांगितले. या पार्श्वभूमीवर मनुष्यबळ मंत्रालय तातडीने उपाययोजना करत आहे, अशी माहिती त्यांनी दिली. विद्यार्थ्यांची सुरक्षा आणि त्यांना दर्जेदार शिक्षण उपलब्ध करून देण्यासाठी मनुष्यबळ विकास राज्यमंत्री संजय धोत्रे करत असलेल्या प्रयत्नांची त्यांनी यावेळी प्रशंसा केली. या वेबिनार संवादाच्या वेळी केंद्रीय मनुष्यबळविकास मंत्र्यांनी प्रलंबित असलेल्या प्रवेश परीक्षांच्या वेळापत्रकाची घोषणा केली. येत्या 26 जुलै 2020 रोजी नीट परीक्षेचे आयोजन होणार असल्याची माहिती त्यांनी दिली. त्याचबरोबर जेईई मुख्य परीक्षा 18,19,20,21,22 आणि 23 जुलै 2020 रोजी घेण्यात येणार असल्याची माहिती देखील त्यांनी यावेळी दिली. यूजीसी नेट 2020 आणि सीबीएसई मंडळाच्या बारावीच्या परीक्षांच्या तारखा लवकरच जाहीर केल्या जातील, असे ते म्हणाले. विद्यार्थ्यांनी मन शांत ठेवावं आणि त्यांच्या अभ्यासावर लक्ष केंद्रित करावं, असं रमेश पोखरियाल यांनी मानसिक आरोग्याच्या मुद्यावर बोलतांना सांगितलं. विद्यार्थ्यांनी त्यांच्या अभ्यासाचे वेळापत्रक तयार करावे आणि मधून मधून थोडी विश्रांती घेत रहावे, असा सल्ला त्यांनी विद्यार्थ्यांना दिला. प्रवेश परीक्षेत उत्तम यश मिळवण्यासाठी विद्यार्थ्यांना अभ्यासक्रमाची आणि परीक्षेच्या स्वरुपाची माहिती असणे गरजेचे आहे, असे ते म्हणाले. विद्यार्थ्यांनी फार अधीर होऊ नये आणि पोषक आहार घ्यावा आणि सुरक्षित राहावे, असा सल्ला त्यांनी दिला. प्रवेश परीक्षेची तयारी करत असलेल्या विद्यार्थ्यांनी नॅशनल टेस्टिंग एजन्सीच्या https://nta.ac.in/LecturesContent या लिंकवर असलेल्या अधिकृत संकेतस्थळावर फिजिक्स, केमिस्ट्री, मॅथेमॅटिक्स आणि बायॉलॉजी या विषयांच्या लेक्चर्सचा वापर करावा, अशी सूचना त्यांनी केली. मनुष्यबळविकास मंत्रालयाच्या विविध प्लॅटफॉर्म्सचा प्रवेश परीक्षेच्या तयारीसाठी उपयोग होऊ शकेल, अशी अपेक्षा त्यांनी व्यक्त केली. स्वयंप्रभा डीटीएच चॅनल, स्वयंप्रभाचे आयआयटी पीएएल, ई पाठशाळा, नॅशनल डिजिटल लायब्ररी, स्वयम, ई- पीजी पाठशाळा, शोधगंगा, ई- शोधसिंधू, ई-यंत्र, स्पोकन ट्युटोरियल आणि व्हर्चुअल लॅब्ज यांचा त्यात समावेश आहे.

स्वयम, स्वयंप्रभा, व्हर्चुअल लॅब्जफॉसी, ई-यंत्र आणि स्पोकन ट्युटोरियल या प्रमुख ऑनलाईन शैक्षणिक पोर्टलला भेट देण्याऱ्यांची संख्या लॉकडाऊन लागू झाल्यापासून पाच पटीने वाढली असल्याबद्दल त्यांनी आनंद व्यक्त केला. ग्रामीण भागात नेटवर्कमध्ये येणाऱ्या समस्यांशी संबंधित प्रश्नाबाबत बोलतांना त्यांनी सांगितले की स्वयंम प्रभा वाहिनी टाटा स्काय, एयरटेल, डीडी डीटीएच, डीश टीव्ही आणि जियो टीव्ही ऍप या डीटीएच प्लॅटफॉर्मच्या माध्यमातून प्रक्षेपित करण्यासाठी मनुष्यबळ विकास मंत्रालयाने माहिती आणि प्रसारण मंत्रालयाशी समन्वय राखला असल्याची माहिती पोखरियाल यांनी दिली. स्वयंम प्रभा हा अतिशय उच्च दर्जाचे शिक्षण देणाऱ्या 32 डीटीएच वाहिन्यांचा एक समूह असून त्यावर कला, विज्ञान, वाणीज्य, परफॉर्मिंग आर्ट्स, समाजशास्त्र आणि मानव्य शाखेशी संबंधित विषय, अभियांत्रिकी, तंत्रज्ञान, कायदा, वैदयक शाखा, कृषी इत्यादी विषयांची लेक्चर्स उपलब्ध आहेत. सर्व शिक्षक, विद्यार्थी आणि शिक्षणामध्ये रुची असलेल्या सर्व नागरिकांना त्याचा फायदा होऊ शकतो. विविध डीटीएच सेवा पुरवठादारांच्या वाहिन्यांवर त्याचे चॅनल क्रमांक याप्रमाणे आहेत.

एयरटेल टीव्हीः चॅनल # 437,l # 438 आणिl #439

व्हिडिओकॉनः चॅनल # 475,  # 476, # 477,

टाटा स्कायः चॅनल# 756 मध्ये स्वयंप्रभा डीटीएच चॅनलचा समूह असलेली विंडो ओपन होते.   

डिश टीव्हीः चॅनल  # 946, # 947,l #949 आणि # 950.

आकाशवाणी, दूरदर्शन आणि टूजी नेटवर्कचा वापर करून विद्यार्थ्यांना अभ्यासक्रम उपलब्ध करून देण्याचा मंत्रालयाचा प्रयत्न असल्याचे मंत्र्यांनी अधोरेखित केले.

एनआयटीज, आयआयटीज आणि आयआयआयटीज  या संस्थाच्या 2020-21 या शैक्षणिक वर्षासाठी फीवाढीशी संबंधित प्रश्नांवर बोलताना या सर्व संस्थांच्या फीमध्ये या शैक्षणिक वर्षासाठी कोणतीही फी वाढ होणार नसल्याचे त्यांनी स्पष्ट केले.

नवोदय विद्यालयाच्या विद्यार्थ्यांचे त्यांच्या राज्यात आणि घरी स्थलांतर करण्याच्या मुद्यावर ते म्हणाले की ही प्रक्रिया राबवण्यासाठी सर्व शाळांकडून पाठपुरावा केला जात आहे आणि मंत्रालयाकडून राज्यांच्या मुख्य सचिवांना पत्र पाठवल्यानंतर तिला चालना मिळाली आहे. 173 शाळांपैकी 62 पेक्षा जास्त शाळांनी ही प्रक्रिया सुरू केली आहे, अशी माहिती त्यांनी दिली. ज्या शाळांमध्ये स्थलांतरित विद्यार्थी आहेत त्या शाळांवर सातत्याने लक्ष ठेवण्यात येत आहे. बाहेर जाणाऱ्या विद्यार्थ्यांना सॅनिटायजर्स, मास्क, साबणाच्या वड्या आणि जेएनव्हीच्या खाणावळीतून अल्पोपहार दिला जात आहे. सर्व जेएनव्ही प्रवासाला निघणाऱ्या विद्यार्थ्यांना अन्न, अल्पोपाहार आणि औषधांचे पाठबळ देत  आहेत. कोविड आपत्तीमुंळे निर्माण झालेल्या शैक्षणिक पोकळीला भरून काढण्याचे मनुष्यबळ मंत्रालयाचे प्रयत्न असल्याची माहिती पोखरियाल यांनी दिली.

शालेय आणि उच्च शिक्षण या दोन्हीसाठी विद्यार्थ्यांनी  अध्ययनाची प्रक्रिया सुरू ठेवावी आणि त्यासाठी ई- लर्निंग स्रोत आणि डिजिटल प्लॅटफॉर्मची मदत घ्यावी यासाठी मनुष्यबळविकास मंत्रालय प्रोत्साहन देत आहे. प्राथमिक, वरिष्ठ प्राथमिक आणि माध्यमिक शिक्षणासाठी देखील पर्यायी कॅलेंडर प्रसिद्ध करण्यात आल्याची माहिती पोखरियाल यांनी विद्यार्थ्यांना दिली.

विद्यार्थ्यांना मनोरंजक, रोचक पद्धतीने आणि मजेत शिक्षण देण्यासाठी विविध प्रकारच्या तंत्रज्ञानाचा आणि सोशल मिडियाचा कशा प्रकारे वापर करता येईल याची माहिती शिक्षकांना या कॅलेंडरमधून मिळेल. घरी असतानाही अध्ययन करणाऱ्यांना, पालकांना आणि शिक्षकांना त्याचा उपयोग होईल. 

विद्यार्थ्यानी बोर्डाच्या परीक्षांसंदर्भात विचारलेल्या प्रश्नाला उत्तर देताना ते म्हणाले की, ज्या विषयांचा वरच्या इयत्तेत जाण्याशी आणि उच्च शिक्षण संस्थांमध्ये प्रवेशाशी संबंध आहे त्याच विषयांच्या परीक्षा बोर्डाकडून घेतल्या जातील. एक एप्रिल 2020 रोजी सीबीएसईने प्रसिद्ध केलेल्या पत्रकामध्ये 29 विषय आणि इतर तपशीलाची माहिती दिली आहे आणि हे पत्रक बोर्डाच्या http://cbse.nic.in/ संकेतस्थळावर उपलब्ध आहे. ईशान्य दिल्लीव्यतिरिक्त देशात सर्वत्र दहावीच्या परीक्षा झाल्या आहेत आणि परीक्षा जाहीर करण्यापूर्वी संबंधितांना दहा दिवसांचा पुरेसा कालावधी दिला जाईल, अशी माहिती त्यांनी दिली. ज्या विद्यार्थ्यांनी या परीक्षा आधीच दिल्या आहेत त्यांना या परीक्षा पुन्हा देण्याची गरज नाही, असे त्यांनी स्पष्ट केले. कायदा आणि सुव्यवस्थेची स्थिती निर्माण झाल्यामुळे ज्या काही मोजक्या विद्यार्थ्यांना या परीक्षा देता आल्या नव्हत्या त्या विद्यार्थ्यांसाठी या परीक्षा घेणार असल्याचे त्यांनी सांगितले. सीबीएसईच्या संकेतस्थावर अपलोड केलेल्या सातत्याने विचारल्या जात असलेल्या प्रश्नांचा देखील संदर्भ विद्यार्थी घेऊ शकतात.

लॉकडाऊन काळात झालेले विद्यार्थ्यांचे शैक्षणिक नुकसान भरून काढण्याचा सरकारचा प्रयत्न आहे, याकडे त्यांनी लक्ष वेधले. 2021 च्या बोर्डाच्या परीक्षांच्या अभ्यासक्रमावरील ताण कमी करण्यासाठी आवश्यक असलेली कपात लक्षात घेण्यासाठी सीबीएसई अध्ययन अवधीचे मूल्यमापन करेल. त्यानुसार बोर्डाच्या कोर्स कमिटीने विविध परिस्थितीमध्ये अभ्यासक्रमात कपात करण्यासाठी काम सुरू केले आहे. विद्यार्थ्यांना त्याबाबत लवकच सूचित करण्यात येईल.

विद्यापीठांच्या परीक्षांसंदर्भात यूजीसी अर्थात विद्यापीठ अनुदान आयोगाने मार्गदर्शक सूचना जारी केल्या आहेत. यूजीसीच्या संकेतस्थळावर त्या उपलब्ध आहेत.

 

परीक्षांसदर्भातील प्रमुख सूचना खालीलप्रमाणे आहेत. -

शैक्षणिक अपेक्षांचे पावित्र्य आणि परीक्षा प्रक्रियेची एकात्मता  टिकवण्यासाठी विद्यापीठांनी कमी कालावधीत परीक्षा प्रक्रिया पूर्ण करण्यासाठी यूजीसीनं वेळोवेळी निर्धारित केलेल्या सूचनांनुसार पर्यायी आणि सोप्या मार्गांचा आणि पद्धतींचा अवलंब करावा

इंटरमिजिएट सत्र/ वर्षातील विद्यार्थ्यांसाठी विद्यार्थ्यांच्या तयारीचे, निवासाच्या स्थितीचे आणि विविध राज्यांमधली कोविड 19 च्या प्रादुर्भावाची स्थिती यांचे सर्वसमावेशक मूल्यमापन केल्यानंतर  विद्यापीठांनी परीक्षा घ्याव्यात

जर कोविड-19 संदर्भात परिस्थिती सामान्य आढळली नाही तर व्यक्तिगत सुरक्षित अंतर आणि विद्यार्थ्यांची सुरक्षा आणि आरोग्य राखण्यासाठी विद्यापीठांनी अंगिकार केलेल्या अंतर्गत मूल्यमापन प्रक्रियेच्या आधारे विद्यार्थ्यांना 50 टक्के गुण देता येतील आणि उर्वरित 50 टक्के गुण त्यापूर्वीच्या सत्रामधील कामगिरीच्या (उपलब्ध असल्यास) आधारे देता येतील. अंतर्गत मूल्यमापन म्हणजे सातत्यपूर्ण मूल्यमापन, प्रिलिम, सहामाही, अंतर्गत मूल्यमापन किंवा विद्यार्थ्याच्या प्रगतीच्या चाचपणीसंदर्भात जे नाव दिले असेल ते असू शकेल.

जर विद्यार्थ्याला त्याच्या गुणांच्या दर्जात सुधारणा करण्याची इच्छा असेल तर तो/ ती पुढील सत्रात आयोजित होणाऱ्या त्या विषयांच्या विशेष परीक्षा देऊ शकतात..

परीक्षांचे वेळापत्रक -  परीक्षांचे स्वरुप:

(i) टर्मिनल सेमिस्टर/ वर्षr   - 01.07.2020 ते 15.07.2020

(ii) इंटरमिजिएट सेमिस्टर/ वर्ष - 16.07.2020 ते 31.07.2020

2020-21 या सत्रात पदवीपूर्व आणि पदव्युत्तर अभ्यासक्रमांसाठी प्रवेश प्रक्रिया 31-8-2020 पूर्वी पूर्ण करता येईल, असे मनुष्यबळ विकासमंत्र्यांनी अधोरेखित केले आहे. गरज भासल्यास पर्यायी प्रवेश देता येतील आणि त्यांच्या पात्रता परीक्षांची कागदपत्रे 30-09-2020 पर्यंत स्वीकारता येतील.

जुन्या विद्यार्थ्यांसाठी 2020-21 चे शैक्षणिक सत्र 1-8-2020 पासून आणि नव्या विद्यार्थ्यांसाठी 1-9-2020 पासून सुरू होईल. याबाबतचा तपशील यूजीसीच्या संकेतस्थळावर उपलब्ध आहे.

या विद्यार्थ्यांबरोबर झालेल्या संवादाबाबत मनुष्यबळ विकासमंत्री यांनी समाधान व्यक्त केले. विद्यार्थ्यांनी अगतिक होऊ नये, असे आवाहन त्यांनी केले. विद्यार्थ्याचे शैक्षणिक कल्याण आणि त्यांची सुरक्षा टिकवण्यासाठी मंत्रालय वचनबद्ध आहे. परीक्षा, शैक्षणिक कॅलेंडर इत्यादीची माहिती मंत्रालयाच्या आणि त्याच्या स्वायत्त संस्थांच्या संकेतस्थळावर उपलब्ध आहे, असे पोखरियाल यांनी सांगितले.

*****

B.Gokhale/S.Patil/P.Kor

***

सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा@PIBMumbai   Image result for facebook icon /PIBMumbai    /pibmumbai  pibmumbai[at]gmail[dot]com



(Release ID: 1622077) Visitor Counter : 198