सुक्ष्म, लघु आणि मध्यम उदयोग मंत्रालय

आयातीस पर्याय निर्माण करणारे धोरण विचाराधीन-नितीन गडकरी


मनोरंजन उद्योगातील असंघटित क्षेत्राचे अधिक औपचारिकीकरण करण्यास श्री.गडकरींनी दिले प्राधान्य

Posted On: 05 MAY 2020 5:42PM by PIB Mumbai

 

नवी दिल्ली, 5 मे 2020

 

कोविड-19 मुळे उत्पन्न झालेल्या आर्थिक परिस्थितीच्या पार्श्वभूमीवर, आयातीस पर्याय निर्माण करणाऱ्या धोरणावर विचार सुरु असल्याची माहिती केंद्रीय MSME (सूक्ष्म, लघु आणि माध्यम उद्योग) आणि रस्ते वाहतूक व महामार्ग मंत्री श्री.नितीन गडकरी यांनी आज दिली. अभिनव कल्पना वापरून ज्ञानाचे रूपांतर संपत्तीत करण्यासाठी व गुणवत्ता उंचावण्यासाठी, तसेच खर्चात कपात करण्यासाठी विचार करण्याचे आवाहन त्यांनीं विविध भागधारकांना केले. नागपुरातील एका MSME ऑरेंज क्लस्टरचे उदाहरण त्यांनी यावेळी दिले. या छोट्या उद्योगाने PPE  म्हणजेच व्यक्तिगत सुरक्षा उपकरणे उत्पादित करण्याची सुरुवात अगदी पहिल्यापासून केली. या PPE ची किंमत 550 ते 650 रुपये इतकीच आहे, तर बाजारात याच उपकरणासाठी जवळपास 1200 रुपये पडतात, व त्यासाठी देश मोठ्या प्रमाणात आयातीवर अवलंबून आहे. आता या क्लस्टरमधून मोठ्या प्रमाणात PPE चा पुरवठा होऊ शकतो.

देशातील महिला उद्योजिकांच्या संघटनेच्या प्रतिनिधींच्या बैठकीला श्री.गडकरी यांनी आज व्हिडिओ कॉन्फरन्सिंगद्वारे संबाधित केले. तसेच, तांत्रिक सेवा पुरवठादारांशी व मनोरंजन क्षेत्रातील कलाकारांशीहि त्यांनी संवाद साधला. यावेळी बोलताना त्यांनी    कोविड-19 च्या साथीचा स्टार्टअप उद्योगांवर, MSME उद्योगांवर होणाऱ्या परिणामांविषयी माहिती दिली. सुप्रसिद्ध गायक श्री.सोनू निगम, श्री.नितीन मुकेश, श्री.तलत अझीझ यांच्यासह अनेकांनी या सत्रात भाग घेतला.

आता निर्यातवाढीवर विशेष भर देणे ही काळाची गरज असून, जागतिक बाजारपेठेत स्पर्धात्मकता टिकवून ठेवण्याच्या दृष्टीने वीजखर्च, उत्पादनखर्च, वाहतूकखर्च यात कपात करण्याचे सर्व उपाय अवलंबिले पाहिजेत, असेही मंत्रिमहोदयांनी नमूद केले. तसेच आयात होणाऱ्या वस्तूंना पर्याय ठरू शकतील अशा वस्तूंच्या देशांतर्गत उत्पादनाची गरज आहे, असेही ते म्हणाले. उद्योगक्षेत्राने अभिनव संकल्पना, विज्ञान-तंत्रज्ञान, उद्योजकता, संशोधन कौशल्य आणि अनुभव- यांचा योग्य उपयोग करून ज्ञानाचे रूपांतर संपत्तीत केले पाहिजे, अशी अपेक्षाही त्यांनी व्यक्त केली.

मनोरंजन उद्योगामध्ये अधिक औपचारिकीकरण करण्याची गरज श्री.गडकरी यांनी बोलून दाखविली. MSME मंत्रालयाच्या विविध योजनांचा लाभ मिळविण्याच्या दृष्टीने, MSME म्हणून नोंदणी करून घेणे उपयुक्त ठरेल, असा सल्लाही त्यांनी दिला.

कोरोनाच्या संकटावर मात करत त्याचवेळी लोकांच्या उपजिविकेचीही काळजी घेण्यासाठी सर्वच भागधारकांनी एकात्मिक दृष्टिकोन ठेवण्याची गरज आहे, असेही ते म्हणाले. या संकटातून बाहेर पाडण्यासाठी उद्योगजगताने सकारात्मक राहून प्रयत्न सुरु ठेवले पाहिजेत, असेही ते म्हणाले.

कोरोना साथीच्या पार्श्वभूमीवर चीनमधून बाहेर पडून अन्यत्र उद्योग स्थापित करण्यासाठी जपान सरकारने जपानी उद्योगजगताला विशेष पॅकेज दिल्याची माहिती देऊन, अशा संधीचा भारतीय उद्योगांनी  उठवला पाहिजे, असे मत त्यांनी व्यक्त केले.

MSME ला भेडसावणाऱ्या विविध अडचणींविषयी उद्योजकांनी या संवादसत्रादरम्यान चिंता व्यक्त केली, व या क्षेत्राला तगविण्यासाठी सरकारकडून मदतीची अपेक्षा असल्याचे सांगितले.

यावेळी महत्वाचे काही मुद्दे व काही सूचना मांडण्यात आल्या. यात लघु व मध्यम उद्योगांना तंत्रज्ञान हस्तांतरित करताना परवाना शुल्क न घेणे, पुरवठा साखळीबाबत औषध क्षेत्रातील लघु व मध्यम उद्योगांना पाठबळ देणे, वस्तू व सेवा करात कपात- वगैरेंचा समावेश होता.

यावेळी, उद्योगक्षेत्राच्या प्रतिनिधींच्या प्रश्नांचे समाधान करत, श्री.गडकरी यांनी सरकारकडून आवश्यक ते सहकार्य मिळेल, असे आश्वासन दिले.

कोविड-19 संकटातून पार झाल्यावर निर्माण होणाऱ्या संधींचा उपयोग करून घेण्यासाठी उद्योजकांनी सकारात्मकपणे काम सुरु ठेवले पाहिजे, असेही श्री.गडकरी यांनी नमूद केले.

*****

M.Jaitly/J. Waishampayan /P.Kor

***

सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा@PIBMumbai   Image result for facebook icon /PIBMumbai    /pibmumbai  pibmumbai[at]gmail[dot]com



(Release ID: 1622074) Visitor Counter : 164